उपोद्धात - ८

Parent Category: मराठी पुस्तके Category: मराठे व इंग्रज - न. चिं. केळकर Written by सौ. शुभांगी रानडे

फौजेची संख्या वाढविण्याखेरीज असल्या स्वारांचा दुसरा कांहींच उपयोग नव्हता. छाती करून तरवार मारावी, इंग्रजांची पलटणें कापून काढावी त्यांच्या तोफा घ्याव्या, त्यांची रसद बंद करावी, हा हुरूप एवढ्या मोठ्या फौजेत फारच थोड्या सरदारांच्या अंगी दिसून येत होता. ज्याला त्याला माझें घोडे माणूस कसें बवावेल हीच काळजी!

मराठी फौजेची ही स्थिती लक्षांत आली म्हणजे इंग्रजांचे गतिस्वातंत्र्य कायम राहिलें, ते दोनदां मराठ्यांच्या फौजेस न जुमानता पुण्याहून चालून आले, त्यांनी अनेक वेळां त्यांवर हल्ले करून त्यांस हुसकून लावलें, त्यांची दहशत न बाळगता मुंबई, अहमदाबाद, वसई इत्यादि किल्ले घेतले, याचें काहींच आश्चर्य वाटत नाहीं. वडगावच्या लढाईत इंप्रजांचा पराजय झाला. जनरल गॉडर्ड याचे लष्कर लुटून व त्याचे शिपाई मारून मराठ्यांनी त्यास हैराण केलें, नापारच्या लढाईत त्यांनी इंग्रजांच्या पलटणांत शिरून कत्तल केली, हे मराठ्यांचे पराक्रम त्यांच्या संख्येच्या व पूर्वीच्या लौकिकाच्या मानानें कांहीच नव्हते,

माधवराव पेशव्यांचा अकाली मृत्यु पानपतच्या युद्धाप्रमाणेंच मराठ्यांस घातक झाला असें इतिहासलेखक ग्रँट डफ्‌ म्हणतो तें अगदी खरें आहे. कारण की, तो पेशवा मरण पावल्यापासून राज्यांत अव्यवस्था आणि लष्करी कारभारांत ढिलाई जे बेकैदी जी एकदा उत्पन्न झाली ती अखेरपर्यंत कधी नाहीशी झालीच नाही सवाई माघवरात प्रौढ वयाचा असता आणि तो माधवरावाप्रमाणें तरतरीत बुद्धीचा आणि हिय्याचा माणूस असता तर ही अस्वस्थता व बेकैदी मुळींच उत्पन्न झाली नसती. पण तो बाल्यावस्थेत आहे, त्याच्या घरांत भाऊबंदकी सुरु झाली आहे, व इंग्रजांसारखें परचक्र राज्याला ग्रासू पहात आहे, असें दृष्टीस पडतांच चोहोंकडे दंगेखोरांनी उचल खाल्ली. हे दंगेखोर म्हणजे कोणी भुरटे चोर नसून त्यांपैका कांही संस्थानिक होते. त्यांच्या पदरी हजार पाचशे जमाव असून शिवाय कित्येकांच्या ताथ्यांत किल्ले व ठाणी होती. बारभाईनी राघोबाचें उच्चाटन केल्यापासून सालवाईंचा तह ठरेपर्यंत सात आठ वर्षे या संस्थानिकांत व इतर दंगेखोर जातींच्या नाईकांनी सर्व राज्यांत बेबंदशही माजवून रयतेस त्राहि त्राहि करून सोडलें. कृष्णेपलीकडे कोल्हापूर राममंडळाचे दंगे, कित्तुर शिरहट्टी डंबळ येथील देसायांचे दंगे, पूर्वेकडे सुरापूरच्या बेरडांचा दंगा, सातारा प्रांती रामोशांचा दंगा, पुर्णे-जुन्नरकडे कोळ्य़ांचा दंगा, नाशिक व खानदेश प्रांती भिल्लांचा दंगा असे एक ना दोन किती सांगावे. त्या दंग्यांच्या वावटळीत पटवर्धन, रास्ते, धायगुडे, विंचुरकर राजेबहादुर होळकर या सर्वाच्या सरंजामाचे मुलुख सांपडले होते ब त्यामुळें त्यांची फार दुर्दशा झाली होती. मुलखांतून वसूल येईना, आणि फौजा तर ठेवावयाला पाहिजे आणि तिचें पोट चालवायला पाहिजे. अशी स्थिती झाल्यसुळें सरंजामी सैन्यास कांही सुचेनासे झालें. इंग्रजांशी लढतांना जो तो सरंजामी आपापल्या ठिकाणी विचार करी की, या इंग्रजांच्या पलटणांवर मी हल्ला केला तर, तो कापून काढीन अथा हटून मागे येईन. तें कसेंही होवो, पण या घटकेच्या खेळांत माझी पांचशे घोडी पडली तर त्यांची वाट काय? पांचशे घोड्यांचा पैका तीन लाख रुपये होतो. एका घटकेच्या जुगारांत मी हे तीन लाख रुपये घालविले तर सरकार कांही मला ते देत नाही. कारण, सरकारचीच मुळी अन्नान्नगत झाली आहे, तें मला काय देणार? सरंजामांतून तर दंग्यामुळे पैका येत नाही; मग हा पैका भरून निघायचा कसा ? उद्या शिलेदार आमचा घोडा तरी द्या, नाई तर त्यांची किंमत तरी द्या, म्हणून घरांत धरणें देऊन बसले तर प्राण देण्याची पाळी घेईल ! याकरितां हिय्या करण्याच्या भरीस न पडतां मागे रहाण्यात सुरक्षितपणा आहे. ज्या दंग्याघोप्यांमुळे क्षात्रवृत्तीस काळिमा आणणारा हा प्रसंग या मानी सरंजामदारांवर ओढवला ते दंगेधोपे सरंजामी पद्धतीमुळेंच उत्पन्न झाले होते.

शाहूने ब पेशव्यांनी सरदारांस मोठमोठाले प्रांत व तालुके देण्याची वहिवाट सुरू केली त्यामुळें सरदारांचे सरकारी कामावरचें लक्ष्य उडून आपल्या सरंजामांकडे वेधले गेलें. ते मगरूर होऊन धन्यास उलट्या गोष्टी सांगू लागले आणि स्वतंत्र होण्याची संधी पाहूं लागले. त्यामुळें राज्यांतलें ऐक्य नाहीसें होऊन राज्य बुडाले असे पुष्कळ लोक म्हणतात, तें सर्वांशी खरें नाही; तसेच सरंजामी पद्धत सुरू केल्यास दोष एकट्या शाहूवर अथवा पेशव्यांवर लादणे वाजवी नाही. मध्यवर्ती सत्ता खंबीर असली म्हणजे सरंजामी काय आणि इतलाखी काय, सर्वच नोकर नम्र व कर्तव्यतत्पर असतात. शिवाजीनें आपल्या सरदारांस सरंजाम दिले नसले तरी देशसुखीसारखी वतने दिली होती; आणि त्या वतनांबद्दळ सरकारी चाकरी करावी लागे. ही वतने म्हणजे लष्करी सरंजामच नव्हेत काय? त्या वेळी सर्व हिंदुस्थानांत कमी जास्त मानानें ही सरंजाम देण्याची पद्धति प्रचलित होती. गुजराथ माळवा बुंदेलखंड यांतले संस्थानिक आपणांस दिल्लीच्य! बादशहांचे सरंजामच म्हणवीत होते. रोहिले पठाण व शीख यांचे सरदार सर्व सरंजामीच होते मग शाहूने अगर पेशव्यांनीं रोख पैका देण्याची सोय नसल्यामुळें आपल्य़ा सरदारांना सरंजाम तोडून दिले यांत काय बिघडले?

Hits: 97
X

Right Click

No right click