उपोद्धात - ७
यांवरून हे लक्षांत येईल की, परचक्राचें निवारण करण्याकरितां व परमुलुखावर स्वारी करण्याकरितां गायकवाड व भोसले इत्यादि सरदारांच्या फौजा चाकरीस बोलावण्याचा पेशव्यांस अधिकार मिळाला होता, आणि जर ते त्याचा अधिकार न मानतील, परचक्रास मिलाफी होऊन बंड अथवा फंदफितूर करतील, तर त्यांचे शासन करून त्यांचे सरंजाम खालसा करण्याचा अधिकारही पेशव्यांच्या हाती आला होता. शाहूच्या सनदेप्रमाणे राज्यावर हुकमत चालविण्याचा द्दा अधिकार नानासाहेब व माधवराव यांनी आपल्या सामर्थ्यांप्रमाणे चालविला. परंतु तोच अधिकार कारभारी या नात्यानें नाना फडणवीस यांस चालविण्याचा प्रसंग आला तेव्हां त्यांना कोणी जुमानेसें झालें! आमचा राज्यकारभार व्यक्तिप्रधान असल्याचें पूर्वी सांगितलेंच आहे. ज्या त्या व्यक्तीचें कर्तृत्व त्या त्या व्यक्तीपुरतें !
शाहूचा दरारा नानासाहेबांस नव्ह्ता आणि नानासाहेबाचा माधवरावांस नव्हता; मग माधवरावांचा दरारा नानासारख्या कारभाऱ्यांत कोठून असणार इंग्रजांशी लढाई सुरू झाली तींत गायकवाडांनीं त्यांशी निराळा तह करून आपला बचाव करून घेतला. आंग्रे व सावंत उदासीनच होते. भोसले गोड बोलत होते तरी आंतून इंग्रजांस अनुकूल होते. त्या वेळीं त्यांनी पेशव्यांस काडीचीहि मदत केली नाही. कोल्हापुरकर तर सांगून सवरून विरुद्ध होते. सचिवांना नोकरीची माफीच होती. अक्कलकोटकर ब प्रतिनिधि हे चाकरीवर धाकदपटशामुळें कां होईना, पण हजर रहात; तरी त्यांची पथके लहान आणि अर्थात उपयोगही थोडाच ! ज्याचे सरंजाम पेशव्यांना उत्पन्न केले, असे सरदार विंचुरकर राजेबहादूर रास्ते, पटवर्धन, धायगुडे, बिनीवाले इत्यादी होत.
या सर्वांची मिळून पंथरापासून वीस हजारांपर्यंत फौज होती. शिवाय हुजुरातीचे जुने मानकरी सरदार थोरात, घोरपडे, पाटणकर, दरेकर वगैरे होते; त्यांची किरकोळ पथके चाकरीवर होती. त्या साऱ्यांची संख्या पांचसहा हजार होई. ही पेशव्यांची दक्षिणेतील फौज झाली. उत्तरेकडल्या फौजेत शिंदे व होळकर हेच मुख्य होते. होळकरांचा सरंजाम साडेचौऱ्याहत्तर लक्षांचा आणि शिंद्याचा साडेपांसष्ट लक्षांचा. या दोघांची मिळून चाळीसपासून पंचेचाळीस हजारपर्यंत फौज होती.
त्यांतली निम्मी तिकडच्या मुलखाच्या संरक्षणार्थ ठेवून बाकीची निम्मी वीसबावीस हजार त्यांस दक्षिणेंत आणतां येण्याजोगी होती. शिवाय पेशवेसरकारच्या पागा पुण्याच्या आसपास असत. ते तीनपासून चार हजारपर्यंत स्वार होते. ही पेशवे सरकारची खडी फौज झाली. एवढ्या फौजेच्या बळावर म्हटले तर पेशव्यांना त्या वेळची इंप्रज फौज जेरीस आणणे फारसें कठिण नव्हते. पण नानाच्या कारकीर्दीत एवढ्या मोठ्या फौजेला इंग्रज आवरतां आवरतां पुरे वाट झाली ! याचें कारण नानासाहेबांच्या वेळच्या वीस इजार स्वारांचा दम या वेळच्या पन्नास हजार फौजेत उरला नव्हता हेंच होय.
आधी मुळा पुरंदरचा तह ठरेपर्यत वर्ष दीड वर्षांच्या अवधीत शिंदे होळकर यांनीं स्वस्थ बसून मौज पाहण्याखेरीज कांहींच केलें नाही. ते पुणें दरबारशी फटकून
होते इतकेंच नव्हे, तर राघोबास साधेल त्या तऱ्हेने मदत करण्यास तयार होते! पुरंदरचा तह ठरल्यानंतर मात्र महादजी शिंद्याने पेशवाईच्या संरक्षणाचा जो बाणा
धरला तो मरेपर्यंत सोडला नाही. वडगांवच्या लढाईत, गुजराथच्या स्वारीत, माळव्यातल्या लढायांत त्यानें फारच चांगली मर्दुमकी केली व इंग्रजांवर आपला दरारा
बसविला. नानांस त्यांची आर्जवें करावी लागत, लहर संभाळावी लागे, तो मागेल तें द्यायला लागे हें खरे; पण त्यानें मन घालून सरकारचें काम केलें हे कांही खोटे नाही.
'होळकराकडे पहावें तर त्यानें बोरघाटासाठी लढाई झाली, त्याखेरीज दुसरी कांही नांव घेण्यासारखी कामगिरी केली नाही एवढेंच नव्हे, तर मध्यंतरी मोरांबादादास
मिळून पेशवाईवर मोठेंच संकट आणण्याचा त्यानें घाट घातला होता. दक्षिणच्या फौजेत पटवर्धनाची व हुजुरातवाल्य़ांची फौज बर्यापैकी होती व त्यांनी कामकाजही
चांगलें केलें. बाकीचे सरंजामी होते, त्यांचें लक्ष टाकभाड्याचें काम करून कसें तरी दिवस काढण्याकडे होते, असेंच म्हणावें लागते. दक्षिणेतल्या पुष्कळ पथकांत व होळकरांच्या फोजेत निकृष्ट प्रतीच्या स्वारांचा भरणा फार झाला असल्याचा बोभाटा झाला होता. सरकारचे लांचखाऊ कारकून असल्याही स्वाराची गणती घेत! त्या
गणतीचें वर्णन कोणी थट्टेखोरानें असें केलें आहे की, घोड्याचे चार आणि माणसाचे दोन असे सहा पाय दिसले की घाला त्याचें घोडेस्वारांत नांव ! गणतीच्या कारकुनाची मूठ दाबली म्हणजे घोडें दहा रुपयांचें असो की वीस रुपयांचें असो, स्वार म्हणवणारा लष्करचा भडभुंजा असो की भिस्ती असो, तें कशास ते पहातो आहे!
घोडे म्हणने घोडे आणि स्वार म्हणजे स्वार! हें वर्णन थट्टेचें असले तरी खऱ्या वस्तुस्थितीहून भिन्न नव्हते.