उपोद्धात - ९
सरंजामी पद्धत जारीने अंमलांत आल्यामुळें तिच्यायोगानें परिणामी राज्यास बळकटी यावी ती न येतां दुबेळपणाच आला अर्से मीहि म्हणतों. पण माझ्या म्हणण्याचा अर्थ मात्र निराळा आहे ! अजमासें १७२०-२५ पासून १७६० पर्यंत मराठ्यांच्या परमुलखी स्वाऱ्या होत होत्या. जो मुलुख ज्या सरदाराने काबीज करावा तोच मुलुख त्या सरदारास महाराजांनी सरंजाम करून द्यावा. पुन्हा त्या सरदाराने आणखी मुलुख़ घेतला तर तोहि फौजेच्या खर्चाकरिता महाराजांनी सरंजाम म्हणून नेमून द्यावा, असें होऊं लागलें; तेव्हा शूर व उत्साही सरदारांत महत्त्वाकांक्षा उत्पन्न होऊन परमुलखावर स्वाऱ्या कराव्या , लढाया माराव्या, लुटीवर पोट भरावे, आणि प्रदेश काबीज करावेत तो महाराजांकडून सरंजाम म्हणून मिळवून आपली सरदारी कायम करावी, आपलें घराणें कीर्तिमंत व वैभवसंपन्न करावें, असें ज्या त्या सरदाराच्या मनांत येऊं लागलें. नंतर हजारों स्वारांच्या झुंडी गोळा करून हे सरदार यंदा माळवा, पुढच्या वर्षी दुसराच एखादा प्रांत, याप्रमाणें निरनिराळ्या प्रांतांत मोहिमा करूं लागले. शाहूमहाराजांनी आपल्या हयातीत जें हे मोहिमांचे सत्न सुरू कराविले तेंच पुढें नानासाहेब पेशव्यांनी चालू ठेविले. त्याचा परिणाम असा झाला का, दक्षिणेकडे म्हैसूर अकोट त्रिचनापल्लीपर्यंत आणि उत्तरेस दिल्ली, पंजाब, आग्रा, अयोध्या, रोहिलखंडापर्यंत सर्व देशांतून मराठ्यांचा व्याप पसरला. पण मराठ्यांनी जर हे एवर्ढे राज्य १७२० पासून १७६० पर्यंत मिळविले तर ते पुढच्या चाळीस वर्षांत घालवूनही टाकलें. ईस्ट इंडिया कंपनीने इ. स. १६०८ पासून १८०० पर्यंत २०० वर्षांत जेवढे राज्य मिळवले तेवढे राज्य मराठ्यांनी चाळीस वर्षात कमावले. मात्र मराठ्यांचे राज्य थोड्याच काळांत नष्ट झालें आणि कंपनीचे राज्य अद्यापि कायम असून उत्तरोत्तर त्याचा उत्कर्ष होत आहे. महापूर आला म्हणजे नदीचे पाणी आसपास पांचचार कोसपर्यंत पसरते आणि मग ओसरतां ओसरतां अखेरीस उन्हाळ्यांत पात्रांत सुद्धां पाण्याचा बिंदु रहात नाही, त्याप्रमाणे मराठी राज्याची स्थिति झाली.
सरंजाम मिळविण्यासाठाी परमुलुख जिंकून राज्य वाढविण्याची सरदारांना हाव सुटली नसती, किंवा महाराज छत्रपतींनी तसें न करण्याविषयी त्यांस उत्तेजन देण्याऐवजी 'आहे तेंच राज्य प्रथम चिरस्थायी करा, त्यांतले बंड मोडा, शिस्त बसवा, कायदेकानू चालू करा, हाच मुलुख भरभराटीत येऊं द्या, मग दुसऱ्या प्रांताला हात घाला,' अशी सक्त ताकीद दिली असती, तर राज्य इतकें वाढले नसतें हें खरे; परंतु त्याला बळकटी आली असती यांत कांही संशय नाही. जिकडे सर लागेल तिकडे मोहीम करून भालेराई माजवण्याच्या फंदांत पडडेल्या मराठे सरदारांना लाहोरावर स्वारी करण्यास फावले, आणि बालेघाटाचा मुलुख-ज्याला साधुसंतांची जन्मभूमी व सर्वार्थाने खरोखरीच महाराष्ट्र म्हणतां येईल तो पैठण, औरंगाबाद नांदेड, जालना, बीड बगेरे मुलुख-ताब्यांत घेण्याची फुरसत मिळाली नाही. शांततेच्या काळांत मराठयांर्चे राज्य सर्वंत्र होतें आणि अस्वस्थतेच्य़ा काळांत कुठेच नव्हतें अशी दशा होण्याचें कारण कोणताही प्रांत मराठ्यांच्या ताब्यांत पूर्णपणे आला नव्हता हेच होय.
पूर्वी मुसलमानी राज्यांत हकदार च वतनदार: लोकांचें मोठें प्राबल्य असे व वसुलाच्या कामांत त्यांनी सरकारच्या आहारी पडण्याऐवजी सरकारच त्यांच्या आहारी पडलेले असे. हे देशमुख, देशपांडे, देसाई, सरदेसाई, सरदशपाडे वगेरे प्रत्येक प्रांताचे मुलकी आधिकारी गांव, किल्ले व गढ्या बळकावून बसले होते व आपापल्या वतनाचा वसूल सरकारास न विचारतां परभारें करण्याची त्यांस सवय लागली होती. कर्नाटकाच्या बाजूस मराठ्यांनी ज्या ज्या परगण्यांत स्वाऱ्या केल्या त्या त्या परगण्यांत असल्या बखेडेखोर देसाई वगेरे लोकांचा बंडे तशीच राहूं दिली; आणि भिल्लाणांत ब गोंडवनात भिल्लांची गोंडांची आणि बुंदेलखंडांत बुंदेल्यांची संस्थाने निर्वेध राहूं दिली, ती राज्यांत नेहमी अस्वस्थता उत्पन्न होण्यास कारणीभूत होत असत. तुगभद्वेपलीकडे टिपूचे राज्य होतें तेथेंही पूर्वी असेच देसाई वगैरे प्रबळ पाळेगार होते. परंतु टिपूने त्यांचा बिमोड करून आपले सर्व राज्य निष्कंटक करून टाकलें होतें, त्यामुळे मराठे, मोंगल व इंग्रज यांशी वर्षानुवर्ष त्याचे युद्धप्रसंग होत असतांही त्याच्या राज्यांत कधी दंगा झाला नाही. अश्या निष्कंटक राज्याचा उपभोग मिळत असल्यामुळें टिपूच्या एकतंत्री एकसूत्री राज्याचे सामर्थ्य इतकें वाढलें की तो वर सांगितलेल्या तिघांहि शत्रूस म्हणजे मराठे, मोंगल व इंग्रज यांस आवरेनासा झाला.
Hits: 107