धामधुमीचा काळ आणि ग्रामराज्याची जबाबदारी - ३
शिरसगाव व सानकिरे ही कुंडल तालुक्यातील दोन खेडी. एका सकाळी राजसाहेबांनी शंकरभाऊंना तातडीची तार पाठवून, ''त्या दोन गावांचा बखेडा मिटवावा'' असे कळविले. २-२॥ मैल अंतरावर डोंगरमाळावरच्या सपाटीवरची ही गावे. दोन्ही खेड्यांचा कारभार चांगला चालला होता. केव्हाही गेले तरी मोटार थांबताच रामरामच्या फेरी व्हायच्या. शंकरभाऊ सोनकिऱ्याला पोचले, तर शिवेवर कोणीच नाही. काही मंडळी पुढे आली. त्रस्त चेहरा, कपड्यावर डाग, जखमांच्या खुणा त्यावरून मारामारी झाली असावी असे वाटले. ता एक म्हातारी बाहेर रडत ओरडत येऊन लोटांगण घालीत आली. तिच्या मुलाला शिरसगावच्या लोकांनी बेदम मारले म्हणून ती शिव्याची लाखोली घालत होती.
शंकरभाऊ काय झाले आहे हे समजून घेण्यासाठी जोतिबाच्या देवळात आसन घालून बसले. सरपंच एकदम म्हणाले, ''शिरसगावच्या सगळ्या लोकांवर खटला भरायचा आहे!'' ''अगोदर काय झाले आहे ते तर सांगा'' एक बोलणारे म्हणाले, ''नागपंचमीच्या दिवशी जेवण झाल्यावर दोन्ही गावकरी कुत्री घेऊन शिकारीला जाण्याची प्रथा आहे. शिकार झाली को पुढचे वर्ष गावाला चांगले जाते; पण सारा माळ, डोंगर पालथा घातला तरी त्या दिवशी एकही शिकार मिळाली नाही. टोळकी परतू लागली. तेवढ्यात एक कोल्हा गोंडेदार शेपटी लोंबवीत तीरासारखा आला. मग सारी कुत्री त्याच्या मागे लागली; पण तो धावत सुटला. माणसं मागे पडली. अखेरीस कुत्र्यांनी कोल्ह्यास लोळविले. शिकार झाली, पण सोनकिऱ्याच्या कुत्र्यानी शिकार केली ती पडली शिरसगावच्या हद्दीत. शिकार कोणाची यावर तोंडातोंडीची मारामारी झाली. पाऊस आला म्हणून पानीपत आटोपलं.'' 'या दुर्घटनेला शिरसगावचे लोक जबाबदार आहेत.' शंकरभाऊ म्हणाले, ''सोनकिऱ्याचे १०-१५ गडी जायबंदी झाल्यावर शिरसगावचे लोक सारे निसटले वाटेत!'' '' आम्ही काय बांगड्या भरल्या नाहीत. त्यांचेबी १०-१५ गडी आम्ही लोळवले.'' ''छान! म्हणजे तुमची फिटंफाट झाली तर!'' सरपंच जर पुढे येऊन म्हणाले, ''सकाळपासून आपण आला, सूर्य वर आला. दूध-केळी काहोतरी घ्या."
शंकरभाऊ म्हणाले, ''सारा गाव दु:खी कष्टी. एकमेकांचा जीव घ्यायला निघालेला, माझी अट तुमच्या हिताचीच आहे. महात्मा गांधीच्या आशीर्वादाने औंध संस्थानाला स्वराज्य मिळाले. इंग्रज सरकार चळवळीतील लोकांना तुरुंगात टाकतंय. औंधची प्रजा भराभरा सुधारणा करतीय, सुखी होतीय. आज तर तुम्ही भाऊबंदकी करून एकमेकांवर कुऱहाडी चालविल्या, तर राजेसाहेबांना काय वाटेल? या गावाला का त्या गावाला शकुनाची कोल्ह्याची शेपटी, यात शौर्य कसलं आणि शहाणपण तरी काय?'' हळूच मागून शिरसगावची लोकं ऐकत होती.
''तुम्ही दोन्ही पंचांनी समेटाच्या कागदावर सह्या केल्या तर मी तोंडात पाणी घेईन.'' शंकरभाऊ म्हणाले. सह्या करून लोक पाया पडू लागले आणि राजेसाहेबांना बखेडा मिटल्याची तार शंकरभाऊंनी पाठवून दिली.
वरच्यासारखे काही भांडण-तंटे मधून मधून झाले, तरी ग्रामपंचायतीचा उपक्रम ठौक चालत होता. ग्रामराज्य स्वयंशासनाने चालविण्याचे ध्येय समोर ठेवून शंकरभाऊंनी एका वेगळ्या पातळौवरच्या कामाची जबाबदारी घेतली होती. याबद्दल औंधाचे युवराज व ग्रामराज्याचे पंतप्रधान अप्पासाहेब पंत लिहितात, ** औंध संस्थानात ग्रामराज्य करण्याचा विचार पुढे आला, तेव्हा शंकरभाऊंनी त्या विचारांचे नेतृत्व केले. दहा वर्षे ग्रामराज्याचा प्रयोग यशस्वी करण्यासाठी त्यांना तोंड द्यायचे होते, ते खेड्यांतील पाताळयंत्री व जबरदस्त गुंडा-पुंडांना; पण अशाही माणसांना शंकरभाऊंनी सहजलीलेने आपल्या कुशीत घेतले. लोकसंग्रहाची त्यांची जी खुबी होती त्यामुळेच हे शक्य झाले.'' आणि शंकरभाऊ म्हणतात, '१९३९ ते ४६ ही माझी सहा-सात वर्षे मोठ्या गर्दीत गेली. मला या कामात खऱ्या भारताचेअगदी जवळून दर्शन झाले. ज्ञानात व अनुभवात त्यामुळे फार मोठी भर पडली. शेकडो ग्रामीण बांधवांचा परिचय घडून मला जीवा-भावाचे मित्र मिळाले.''
Hits: 89