धामधुमीचा काळ आणि ग्रामराज्याची जबाबदारी - ४
ती वेळच मोठी विलक्षण होती. १९३९ मध्ये युरोपखंडामध्ये लोकशाही विरुद्ध हुकुमशाही असे युद्ध सुरू झाले होते. जर्मनीचा हुकुमशहा हिटलर हा शक्तीच्या बळावर युरोपांतील लहान राज्ये एक दोन दिवसांत बळकाव् लागला होता आणि त्यानंतर इंग्लंड व फ्रान्स या मोठ्या देशांवरही त्याने बॉम्ब वर्षाव सुरू केला होता. या युद्धासाठी भारताने ब्रिटिशांना मदत करावी अशी अपेक्षा होती; परंतु भारताला स्वातंत्र्याचे ठोस आश्वासन द्यावे या काँग्रेसच्या मागणीकडे सतत दुर्लक्ष झाले. तेव्हा ८ ऑगस्ट ४२ रोजी गांधीजींनी 'भारत छोडो' ' Quit India' अशी घोषणा केली. सरकारने एका रात्रीत सर्व पुढाऱ्यांना पकडून तुरुंगात टाकले. 'करा किंवा मरा' असा संदेश लोकांना मिळाल्यामुळे देशभरच्या तरुण मंडळींनी कचेरीवर मोर्चे, रेल्वे अडविणे, खजिन्यावर हल्ले करणे अशा रीतीने आंदोलन सुरू केले आणि फरारी होऊन खेड्यांत लपून राहणे सोईचे झाले. एकीकडे पोलिस पार्ट्या फिरू लागल्या, तर दुसरीकडे दहशतवादी पत्री सरकारच्या कचाट्यांत सापडून खेड्यांची दुर्दशा झाली. शेवटी १९४८ मध्ये औंध संस्थान भारतीय शासनात विलीन होऊन सातारा कलेक्टरनी संस्थानचा ताबा घेतला.
४२ ची चळवळ देशभर पसरली. साऱ्या काँग्रेस पुढाऱ्यांना स्थानबद्ध केल्यामुळे सर्वत्र असंतोषाची लाट पसरली होती. किर्लोस्कर कारखान्यातील कामगारांना या देशव्यापी चळवळीपासून अलिप्त ठेवणे शक्य नव्हते. त्यांनीही तासगावच्या तालुका कचेरीवर मोर्चा नेला.
१६ मार्च १९४३. सकाळी नेहमीप्रमाणे कारखान्यात कामाला सुरुवात झाली तोच शस्त्रधारी पोलिसांनी भरलेले ट्रक किर्लोस्करवाडीत घुसताना दिसले. ट्रक थांबताच त्यातून पोलिस व ऑफिसर भराभर बाहेर आले. त्यांनी वाडीला व कारखान्याला गराडा देऊन सगळीकडे नाकेबंदी केलो. सर्वांच्या कंबरेला पिस्तुले लटकलेली. शंकरभाऊ ऑफिसमधून बाहेर आले. तो डी. एस.पी. दिसले, शंकरभाऊनी पुढे होऊन विचारले, ''तुम्ही हे काय चालवलं आहे?'' एरवी शंकरभाऊंशो मिठ्ठास बोलणारा व कारखान्याची वाखाणणी करणारा येट्स तिरसटणपणे म्हणाला, ''ते आम्हाला माहीत आहे, तुम्ही लुडबुड करू नका.'' तरी शंकरभाऊ त्याला म्हणाले, ''तुम्हाला काय हवे ते मला सांगितलेत तर दोघांनाही सोयीचे नाही का होणार?'' '' आम्हाला काही माणसं हवी आहेत, कारखान्याची झडती घ्यायची आहे.'' ''एवढेच ना? खुशाल घ्या झडती! '' ''तुम्ही नावे कळवाल तर मीच त्या माणसांना तुमच्यापुढे उभे करीन.'' ''मग घ्या ही यादी'' असे म्हणताच शंकरभाऊंनी पाहिले तर ती सर्व नाव मोल्डिंग शेडच्या कामगारांची होती, तेव्हा सर्वांनी मोल्डिग शेडकडे मोर्चा वळविला. त्या खात्यात २००-२५० कामगार होते. पोलिसांनी शेडला वेढा घातला; पण शंकरभाऊंनी सर्व कामगारांना एकत्र करून खाली बसवले. कोणी थोडीशीही गडबड केली, तर सर्वांवर भयंकर प्रसंग ओढवेल याची कल्पना दिली. सर्वजण स्वस्थ बसले. ज्याचे नाव पुकारले तो उठून एका बाजूस आला की त्याला पोलिस ताब्यात घेत. कामगारांच्या पेट्या खोलल्या, तर ३-४ काँग्रेस बुलेटीन एक लहान सुरा एवढेच निघाले. मग एक इन्स्पेक्टर दारांतील वाळूच्या पिपाकडे जाऊन त्यातील वाळू उपसू लागला. मग त्याने त्यातून एक गाठोडे काढले, तेव्हा त्यातून एक गावठी पिस्तुल निघाले. हा कोणाचा तरी चावटपणा असावा हे ओळखूनही समारंभाने त्या पिस्तुलाचा पंचनामा झाला. त्याकडे एक गंमत म्हणूनच सारे पाहत होते. ते उरकल्यावर लक्ष्मणरावांच्या घराची झडती घेतली आणि फौंड्रीचे मुख्य अधिकारी अंतोबा फळणीकर यांच्या घरात सारे सामान अस्ताव्यस्त करून सोवळ्याच्या लोणच्याच्या बरण्या ओतून घेऊन बंदुकीच्या संगिनीने घराचे आंगण उकरून हाती काहीच न लागल्याने पोलिसांनी काम थांबवले.
शंकरभाऊ घरी गेले तो थोड्यावेळाने फळणीकरांचा मोठा मुलगा बाळकृष्ण त्यांच्याजवळ येऊन म्हणाला, ''सकाळी मी दारात उभा होतो. एक मुलगा सायकलवरून येऊन बरोबर आणलेले पुडके माझ्या हातात देऊन घरात ठेवण्यास सांगू लागला व निघून गेला. मी संशयाने पुडके उघडले तर ते एक गावठी पिस्तुल होते.'' ते घेऊन तो वडिलांच्या ऑफिसात गेला. ' तेथे ते नव्हते म्हणून शंकरभाऊंच्या ऑफिसात गेला. तिथे शंकरभाऊ नव्हते म्हणून ते पुडके त्यांच्या ड्रॉवरमध्ये ठेवून दिले असे बाळकृष्णाने सांगितले. शंकरभाऊंनी रात्रीच ऑफिसमध्ये जाऊन ड्रॉवर उघडला तर जप्त केलेल्या पिस्तुलासारखेच दुसरे पिस्तुल होते. किर्लोस्कर कारखान्यात बेकायदेशीर पिस्तुले, हत्यारे करतात असे सिद्ध करण्यासाठी रचलेल्या या नाटकाचा प्लॅन लक्षात आला. त्यांनी दुसऱ्या दिवशी पिस्तुलासह औंधास जाऊन राजेसाहेबांना हकीकत सांगितली. पुढे कोर्टात काहीही सिद्ध झाले नाही व येट्स मात्र बडतर्फ झाला.
Hits: 109