धामधुमीचा काळ आणि ग्रामराज्याची जबाबदारी -१
त्या काळात ब्रिटिशांची सत्ता असली तरी पूर्वापार चालत आलेली राजेरजवाड्यांची लहान-मोठी संस्थाने देखील होती. स्वातंत्र्याची चळवळ सुरू झाल्यावर संस्थानी प्रजेतही जागृती होऊन औंध संस्थानातील आटपाडीच्या शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या प्रचंड मोर्चा काढून राजेसाहेबांना सादर केल्या.
भारताच्या ब्रिटिश मुलुखात औंध संस्थानचे राजे बाळासाहेब पंत प्रतिनिधी हे उदारमतवादी होते. त्यांचे चिरंजीव अप्पासाहेब पंत हे विलायतेत बॅरिस्टर होऊन आले होते. गांधी, नेहरू यांच्याही भेटी ते घेत व तेथील विचार राजेसाहेबांपर्यंत पोहोचवत. साहजिकच आपल्या संस्थानात जबाबदार राज्यपद्धती सुरू करून प्रजेला स्वराज्याचे अधिकार देणारे ते पहिलेच संस्थानिक झाले असावेत. महात्मा गांधीच्या कानावर ती वार्ता जाताच त्यांनी औंध संस्थानासाठी दोन पानात मावणारी सुटसुटीत राज्यघटना करून दिली. प्रजेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींचे एक कायदेमंडळ बनवून, त्यांच्याकडे कायदे तयार करण्याचे व अंदाजपत्रक कण्याचे अधिकार द्यावेत; प्रत्येक तालुक्यातील जमिनीचा सारा त्या तालुका समितीला परत द्यावा ब त्या पैशातून तालुका समितीने खेड्यांच्या शिक्षण, आरोग्य, न्यायदान, संरक्षण इत्यादी बाबी ग्रामपंचायतीमार्फत पार पाडाव्या. अशी तरतूद होतो. थोडक्यात, 'स्वयंशासित खेडे' हे घटनेचे प्रमुख वैशिष्ट्य होत.
१९३९ च्या एप्रिलमध्ये एक दिवस कारखाना सुटल्यावर शंकरभाऊ घरी येत असताना चौकातील नोटीस बोर्डासमोर गर्दी दिसली. सारेजण निवडणुकोचा जाहिरनामा व वाडीतील मतदारांची यादी पहात होते. निवडणूकीस उभे राहणारांनी कुंडलच्या मामलेदारांकडे अर्ज महिना अखेसपूर्वी करायचे होते. त्याबद्दल बोलायला शंकरभाऊ लक्ष्मणरावांकडे गेले, तेव्हा त्यांनी शंकरभाऊंकडेच ग्रामपंचायत स्थापन करण्याचे, निवडणुकीसाठीचे अर्ज पाठविण्याचे वगैरे सर्व कामे सोपविली. साहजिकच, किर्लोस्करवाडीच्या ग्रामपंचायतीचे शंकरभाऊ सरपंचझाले.पुढे कुंडल तालुक्यातील खेड्यांच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पाडल्या व तालुका समितीचे अध्यक्ष निवडण्याचे बाकी राहिले. तिथे जमलेला तो ग्रामीण प्रतिनिधींचा समाज व त्यांच्यावर येणारी जबाबदारी याची कल्पना मनात येताच समितीत गट राहू नयेत यासाठी सर्वांनी शंकरभाऊंचे नाव अध्यक्ष म्हणून बहुमताने मान्य केले. त्यावेळो भाषणात शंकरभाऊ म्हणाले, ''तालुक्याच्या खऱ्या हिताचा विचार करावयाचा तर सर्वांनी एकोप्याने तालुक्यातील जनतेची सुधारणा करावयाची आहे. आपण त्यासाठी झटू या आणि औषध संस्थानच्या स्वराज्याचे खरे चीज करून दाखवू या.''
आपोआपच तालुका समितीमध्ये खेळीमेळीचे स्नेहाचे वातावरण उत्पन्न झाले. दुसऱ्या दिवशी शंकरभाऊ औंधास जाऊन राजेसाहेब व अप्पासाहेबांना भेटले. त्यांना फार आनंद झाला. ' तुम्ही हे काम पत्करले आहे. ते पार पाडायला जगदंबा तुम्हाला मदत केल्याशिवाय राहणार नाही!'' असे म्हणून राजेसाहेबांनी त्यांना आशिर्वाद दिला.
मासिकातील सहकाऱ्यांनीही नव्या कामासाठी वेळ देण्यास शंकरभाऊंना संमती दिली. पहिले काम, तालुक्यातील सर्व खेडी प्रत्यक्ष पाहण्याचे. एक जुनी मोटरगाडी डागडुजी करून घेतली. खेड्यांतोल लोकांना सोयीची वेळ म्हणजे रात्रीची. शेतातील कामे आटोपून गावात आल्यावर शंकरभाऊ येईपर्यंत तिथले जुने पंच लोकांना जमवून त्यांच्याशी गोष्टी करीत. गावचा इतिहास, आजची स्थिती याचे तपशील मिळत. शंकरभाऊ त्यांना प्रथम सांगत की, ''मी तपासणी करणारा सरकारी अंमलदार नाही. गावासाठी काही करावे म्हणून तुम्हाला भेटायला आलो आहे. सगळ्यासारखे ते जमिनीवर पसरलेल्या बस्करावरच बसत. त्यामुळे खेड्यातील मंडळींशी स्नेह जमविणे सोपे झाले. रात्री माणसे जमल्यावर शंकरभाऊ आपल्या भाषणात देशात सुरू असलेल्या स्वातंत्रय चळवळीची थोडी माहिती देऊन ' औंध संस्थानाला महात्मा गांधींच्या आशीर्वादाने स्वराज्य मिळाले आहे. गावाचा सर्व कारभार आपणच पाहणार आहोत; जमिनसारा आपल्यालाच मिळणार आहे. मात्र आपण एकविचाराने, एकजुटीने वागायला हवे. आपल्याला कोणत्या सुधारणा करायला हव्यात त्याचा विचार करून मी आठ दिवसांनी येईपर्यंत काय हवे ते ठरवून ठेवा.'' असे सांगून परत जात.
अशाप्रकारचा दौरा सर्व गावातून काढल्यावर, प्रत्येक गावाला थोड्या सवडीने २-३ भेटी दिल्या. त्यामुळे तिथल्या खेड्याचे वैशिष्ट्य, त्याची परंपरा, त्यांच्या अडचणी यांची चांगली कल्पना शंकरभाऊंना आली. साऱ्या मंडळींची जानपछान झाली. त्यांची मते व त्यांची वितुष्टे लक्षात येण्यास वेळ लागला नाही. खेड्यांमध्ये कसली लपवाछपवी चालत नसते. त्यामुळे खरे कार्यकर्ते कोण, रिकामा डौल दाखवणारे कोण, कर्जात बुडालेले, मदिराभक्त, भजनाची आवड असणारे, नियमित पंढरीची बारी करणारे, कुस्त्यांचा शौक असणारे, अशा सर्व माणसांची रूपे समजून येत गेली.
खेड्यात सुधारणा करायची ती गावातल्या लोकांच्या मताप्रमाणे हे तत्त्व स्वीकारले गेले होते. अशी सार्वजनिक कामे पार पाडण्यासाठी खरे भांडवल म्हणजे जनतेची हौस आणि उत्साह हीच होत. चर्चा करून ठरविल्याप्रमाणे कोणाला शाळा, कोणाला विहीर, काहीना रस्ते, कुठे जुन्या देवळाचा जीर्णोद्धार, काहीना तालीमखाना अशा निरनिराळ्या गावांच्या मागण्या होत्या. पैशाची कमतरता गावकऱ्यांची श्रमशक्ती भरून काढीत असे. सारे गाव पडेल ते कष्ट करायला कंबर बांधून उभे राही. मंगलौरी कौले, खिळे, फरशी, सिमेंट अशांना लागेल तेवढाच काय तो रोख खर्च. तो ५००० झाला तरी इमारत पंधरा-सोळा हजारांची उभी राही.
शाळेच्या इमारती बांधून होताच त्या भराभर भरून जाऊ लागल्या. १५-२० मुलांचा बर्ग ज्या खेड्यातच रखडत चाले, तिथे दीड-दोनशे मुले शाळेत नियमित जाऊ लागली. फिरतीवर असताना ज्या खेड्यात शंकरभाऊ जात तेथील कामाचे कौतुक तर करायचेच; पण इतर खेड्यांतून कोणती कामे चालली आहेत हेही सांगून गावकऱ्यांना नव्या कल्पना देत असत. एक वर्षाच्या आत सर्व तेरा खेड्यांत नवे चैतन्य व उत्साह खेळू लागला.
खेड्यांतील बिकट प्रश्न म्हणजे तिथले भांडण-तंटे, जमिनीवरून, विहीरीवरून, पैशाच्या व्यवहारावरून, दत्तक प्रकरणावरून अनेक खेकटी सुरू होतात; पण खेड्यातील न्यायदानाचे अधिकार ग्रामपंचायतीला मिळाले. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय सुकर व कमी खर्चाचा झाला. शक्यतो तडजोडीने प्रकरण मिटविले जाई.
कुंडल पंचायतीचा कारभार अध्यक्ष म्हणून शंकरभाऊंकडे आला. त्यामुळे किर्लोस्करवाडीमधोल त्यांचे ऑफिस ही पाटलाची चावडी बनत चालली. निरनिराळ्या खेड्यांतून अर्ज घेऊन बायाबापड्या, म्हातारे-कोतारे, स्पृश्य- अस्पृश्य त्यांच्याकडे दाद मागायला येत. त्यांचे काम म्हणजे बरेचवेळा चार युक्तीच्या गोष्टी सांगून समाधान करण्याचे असं; पण खेड्यातील भांडणे व अडाणीपणा यामधून उभे राहणारे विषय अदभृत असत.
Hits: 89