उत्कर्षाकडे वाटचाल
निरनिराळ्या पुरोगामी लेखकांचे साहित्य हे तरुणांमध्ये आत्मविश्वास वाढवू शकते, महाराष्ट्राला पुढे जायचे असेल, तर थोर विद्वान लेखकांचे विधायक-प्रेरक विचार तरुणांना समजले पाहिजेत' त्या दृष्टीने शंकरभाऊंचे प्रयत्न सुरू झाले. विठ्ठल रामजी शिंदे म्हणाले, ' 'तरुणपिढीने आपण केवळ हिंदी आहोत हे ध्यानात ठेवावे. एकी करायचो ती महाराष्ट्रापुरतीच न करता प्रांतिक भद व मत्सर यांना थारा देऊ नये. महात्मा गांधीनी विश्वकुटुंबी होण्याचे ध्येय ठेवले आहे. ब्राह्मण-ब्राह्मणेतर असे सटरफटर भेद का लक्षात आणावे? तरुणांनी त्यापासून सावध रहावे.''
डॉ. धनंजयराव गाडगीळ आर्थिक स्थितीबद्दल विवेचन करताना म्हणतात, ' 'ब्राह्मण समाजास मुत्सदेगिरी आणि लढाई फार आवडे, मराठे आपली मुले शेतावर अथवा लढाईवर पाठवीत, त्यामुळे लोकांचा विचार उद्योगधंद्याकडे गेला नाही. येवल्याला जरतारी धंद्यासाठी गुजराथी कारागीर, जुन्नरच्या कागदासाठी उत्तरेतील मुसलमान, मालेगावची पेठ बसवायला मोमिन आणि सोलापूर-नागपुर हातमाग धंद्याला आंध्रातील कोष्टी मंडळी बोलावली. हाती राज्यसत्ता असूनही औद्योगिक उन्नतीचे बीज राज्यकर्त्यांना महाराष्ट्रात पेरता आले नाही. इंग्रजी आमदानी आली व आम्ही नोकरी व वकिली करीत राहिलो.
दुसरे अर्थशास्त्रज्ञ वामनराव काळे म्हणतात, ''पूर्वीपासून आम्ही व्यापाराकडे अक्षम्य दुर्लक्ष केले, त्याचे परिणाम आम्ही अद्याप भोगत आहोत. आम्हाला द्रव्यासाठी वेळोवेळी परप्रांताकडे पाहावे लागते. हा प्रकार बंद करण्यासाठी, तरुणांनी कंबर बांधली पाहिजे. अनेक शतकांच्या उपेक्षेमुळे व्यापारीदृष्ट्या जे अवगुण आमच्यात शिरले आहेत त्यांचा त्याग करून, आत्मविश्वास, परस्पर सहाय्य, सचोटी वं पद्धतशीरपणा हे गुण संपादिले तर हा हा म्हणता आपला उत्कर्ष होईल.'
विद्वान प्राध्याक महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार म्हणाले, 'ज्या महाराष्ट्राची उन्नती करायची म्हणता तो महाराष्ट्र मुळात आहे कोठे? वरावीण वऱ्हाडी अशी आपली स्थिती आहे. मुंबई इलाख्यातील दहा-बारा जिल्हे म्हणजे महाराष्ट्र नव्हे. महाराष्ट्राची संस्कृती, भाषा, परंपरा असलेले विदर्भ मराठवाडा इत्यादी भाग आहेत. काही वैशिष्ट्य आहे. आपण त्याकडे ऐक्यात्मक भावनेने बघतो. त्यांची एकी झाली पाहिजे. प्रथम एकी मगच उत्कर्ष! ' डॉ. वासुदेवराव किर्लोस्कर हे नामवंत डॉक्टर. जन्मजात इंजिनियर व सुधारणेचे कळकळीचे पुरस्कर्ते. त्यांनी सुधारणावादी इंग्रजी विद्वानांचा (डार्विन, स्पेन्सर, मिल) तसेच मार्क्सवादावरील ग्रंथांचा अभ्यास केला होता. आपल्याला
नवी घडी बसवायची तर, त्याविषयीचे शास्त्रोक्त पृथक्करण करून त्यांनी मुद्देसूद विवेचन केले होते. 'नवे-जुने : एक सामाजिक पृथ:करण' या लेखांत ते म्हणतात, ''समाजात जे वेगवेगळे थर पडतात ते अर्थोत्पादनाच्या अगर उपजिविकेच्या साधनसाम्यावरून, प्रत्येक समाजात चार वर्ग असतात.
१) संपत्ती उत्पन्न करण्याच्या साधनावर ताबा ठेवून, संपत्ती ब सत्तेचा उपभोग घेणारा अर्थजीवी वर्ग,
२) बुद्धीचा उपयोग करून प्रत्यक्षपणे अर्थजीवी वर्गावग अवलंबून असणारा बुद्धिजीबी वर्ग,
३) समाजाच्या अंधश्रद्धेचा फायदा घेऊन, त्याला परमार्थाची भुरळ पाडून जगणारा परमार्थजीवी वर्ग.
४) शरीरश्रमाखेरीज जगण्याचे अन्य साधन नसलेला व केवळ शरीरकष्टावर जगणारा श्रमजीवी वर्ग म्हणजे शेतकरी-कामकरी.
समाजातील सर्व ऐहिक संपत्ती श्रमजीवी वर्ग निर्माण करीत असला, तरी या संपत्तीचा सर्वात मोठा वाटा अर्थजीवी वर्गाच्या पदरात पडतो व त्याच्याकडून तो बुद्धिजीवी ब परमार्थजीवी वर्गात वाटला जातो, त्यामुळे अशाप्रकारे नाडलेला श्रमजीवी वर्ग व सुखवस्तू वर्ग या वर्गामध्ये संघर्ष सुरू होतो. जगाचा इतिहास म्हणजे या वर्गातील स्पर्धा ब झगडे. शिवाजी महाराजांचे नाव महाराष्ट्रात नेहमीच आदराने घेतले जाते; पण त्यांचे कार्य पाहता रयतेच्या कल्याणासाठी खोलवर विचार करण्याचे होते. म्हणून रयतेने
त्यांना भरपूर पाठबळ दिले. शिवाजीने मुसलमानांचा चढेलपणा उतरवला, तशीच मस्त वतनदार हिंदूंची मस्ती आणि रग जिरवली. गोबधबंदी जरूर केली; पण सर्वांचा प्रतिपाळ केला तसा ब्राह्मणांचाही प्रतिपाळ केला. त्यांची मोहिम जमिनदाराविरोधी क्रांतिकार्याची होती. हे सत्य लालजी पेंडसे यांनी अभ्यासपूर्वक लिहिलेल्या किर्लोस्कर मासिकातील 'शिवाजी धर्मरक्षक का क्रांतीकारक' या लेखमालेने लोकांच्या नजरेस आणले आणि त्यांच्या मनातील संभ्रम नाहीसा केला. त्यामुळे या लेखांचे स्मरण वाचकांच्या मनात दृढ झाले.
असे विचार मासिकांत येऊ लागल्यावर प्रा. फडके यांचे मन साशंक झाले, तेव्हा शंकरभाऊं त्यांना घेऊन सोलाप्रला गेले. समाजाच्या विविध थरांत वावरून त्यांचे अंतरंग पाहता येईल तितके पाहण्याची अप्पासाहेबांनाही उत्कंठा होती. सोलापूरमध्ये कम्युनिस्ट कार्यकर्ते तेथील कामगारांचे प्रश्न सोडविण्यात मगन होते. त्यामध्ये शंकरभाऊंची भाची मीनाक्षी साने हिने बिडी कामगार बायकांच्या प्रश्नाचा अभ्यास करून ते प्रश्न सोडविण्याची खटपट चालवली होती. तिथे या शेकडो विडी कामगार बायकांच्या मागण्या समाजाच्या कानावर घालण्यासाठी काढलेली मिरवणूक मुख्य रस्त्यावरून जाताना त्या स्त्रियांचा आवेश, धैर्य, आत्मविश्वास पाहून अप्पासाहेब प्रभावित झाले. त्यांनी, पाहिलेल्या या कामगार स्त्रियांवर ' आगलावी' ही एकांकिका लिहिली. जाने. १९३८ मध्ये ती 'स्त्री' मासिकात प्रसिद्ध झाल्यावर अनेक ठिकाणी तिचे प्रयोगही झाले.
१९३७ च्या ऑगस्ट महिन्यात किर्लोस्कर मासिकाचा १९ वा वाढदिवस आला. त्यासाठी एखाद्या सभागृहात जमून भाषण करण्यापेक्षा, आपल्या सर्व सहकारी मंडळोंना उत्साह व आनंद वाढविणारा कार्यक्रम हवा. म्हणून किर्लोस्करवाडी शेजारच्या पारसनाथाच्या डोंगरवर ऑफिसबॉयपासून संपादकापर्यंत मासिकाच्या कार्यालयातले सर्व लोक खेळीमेळीने एकत्र आले. हुतूतू, लंगडीसारखे खेळ झाले. गाणी-पोवाडे, म्हटले गेले. चहा-फराळाचा आस्वाद घेत गप्पासणा रंगू लागल्या. ४ तास निसर्गाच्या सान्निध्यात मोकळ्या वाऱ्यावर कसे गेले ते समजलेही नाहो. कोल्हापूरचे शि. आ. स्वामी हे लेखक त्यादिवशी मुद्दाम आले होते. ''किर्लोस्कर मासिकांची संस्था' एक मोठ्या कुटुंबाप्रमाणे आपुलकोने आणि आस्थेने चालविलेली संस्था आहे' असे पाहुण्यांना वाटत होते. अशा कार्यक्रमानंतर सारेजण नव्या उत्साहाने व कार्यक्षमतेने कामे करणारच.
पुढे दरवर्षी ऑगस्टमध्ये डोंगरावर, ओढ्याकाठी, वनराईत अशा जागी हे वाढदिवस अनेक वर्षे होत राहिले. त्यावेळी कोणी लेखक, लेखिकाही मुद्दाम येत असत. वाडीचे पोस्टमास्टर खंडोपंत कुलकर्णी रसिकतेने सामील होत आणि किर्लोस्करवाडी वृत्तांतातून वाढदिवसाची गंमत वाचकांपर्यंत पोहोचविली जाई.