बुवा बाजीवर हल्ला - ६
बेळगावचे विक्रेते मणूरकर सांगतात, 'माझे एक ग्राहक एक तारखेला 'किर्लोस्कर तारीख' म्हणतात. बॅरिस्टर सावरकर लिहितात 'लेखकाच्या मानधनाबद्दल संपादकाची खळखळ ही सर्वांचा अनुभव आहे; पण किर्लोस्करांची खळखळ अंकापाठोपाठ डाकवाला आणून देतो.'
२०० व्या अंकाच्या प्रकाशनामुळे किर्लोस्कर मासिकांचा बोलबाला इतर वृत्तपत्रांतून पुष्कळ होऊ लागला; त्याबरोबर परंपराप्रिय सनातनी लेखकांची टीका जोरात सुरू झाली. त्यामध्ये 'पुरुषार्थ' व 'केसरी' आघाडीवर होते; पण एक दिवस काशीबाई कानिटकर यांच्या कन्या इचलकरंजीच्या राजस्नुषा अनुताई वहिनीसाहेब घोरपडे या स्त्री मासिकेच्या लेखिकेने 'किर्लोस्कर' मासिकाच्या संपादकांना लिहिलेले अनावृत्त पत्र 'केसरीत' प्रसिद्ध झाले. ''तुम्ही मासिकावर स्त्रियांची चित्रे देता हे गैर आहे. मोबदल्याचे आमिष देऊन तुम्ही समाज अधोगतीस नेत आहात.
आपल्या उज्वल संस्कृती व पवित्र हिंदुधर्माबाबत तुम्ही चालविलेला हीन प्रचार थांबवा. अशा मासिकांच्या प्रसाराला पायबंद घातला पाहिजे, इत्यादि,'' आपल्याच लेखक भगिनीशी वाद घालणे शंकरभाऊंना आवडणार नव्हते; पण या ठिकाणी त्या समाजातील सुधारणाविरोधी सनातनी वर्गाच्या प्रतिनिधी होत्या. या भूमिकेतील दोष व लपंडाव उघड केल्यावाचून गप्प बसणे शंकरभाऊंना योग्य वाटत नव्हते.
वहिनीसाहेबांच्या पत्राला शंकरभाऊंनी १६ पानी सचित्र सविस्तर उत्तर दिले. आमच्या मासिकावर आपण केलेल्या आक्षेपांना उत्तर देण्यापूर्वी मी असे विचारतो की, समाजात ज्या नीतिकल्पना परंपरागत चालत आल्या आहेत त्या समाजाला सदैव कल्याणकारक असतात काय?
तसे असेल तर १) बालविवाह २) विधवांचे केशवपन ३) हुंड्यांची चाल ४) पतीने केलेला छळ पत्नीने निमूटपणे सहन करणे
या गोष्टी इष्ट व नौतिमय आहेत असे आपणास म्हणावे लागेल. याउलट, प्रौढ विवाह, संततिनियमन, स्रियांचे अर्थार्जन, घटस्फोट या गोष्टी निषिद्ध व चुकीच्या मानाव्या लागतील. हिंदू स्त्रियांची करुणाजनक स्थिती दूर व्हावी म्हणून त्यांच्या दु:खाचे खरे चित्र समाजापुढे मांडणे ही त्यांची विटंबना आहे आणि त्यांना सर्वप्रकारे जाचात ठेवणे ही विटंबना नाही, असे आपण म्हणता काय? सर्व स्रिया सुंदर दिसण्यासाठी केश-वेशभूषेची काळजी घेतात ना?
मुखपृष्ठावरील स्रियांच्या चित्रातून स्त्रीसौदर्य दाखविले तर ती मनाला आनंद देणारी आकर्षक गोष्ट व कलेचा एक महत्त्वाचा विषय आहे. आजपर्यंतच्या लेखकांनी शब्दांतून, चित्रकारांनी कागदावर आणि शिल्पकारांनी दगडांत रेखलेल्या स्रीच्या कलाकृती निषिद्ध व चुकीच्या म्हणायच्या काय? चित्राबद्दल काहूर उठवणे हे सनातन्यांचे ढोंग आहे. रामाच्या मांडीवर बसलेली सीता, भिल्लिणीच्या मागे लागलेला शंकर आणि गोपींची लुगडी पळवून त्यांना विवस्त्र करून गंमत पाहणारा कृष्ण यांच्या तसबिरी घराघरात असताना मासिकात शेजारी तरुण-तरुणी बसलेली पाहून सनातन्यांचा मस्तकशूळ उठतो हा निव्वल दांभिकपणा आहे.
मोबदल्याच्या आमिषाबद्दल आपण लिहिले त्यापूर्वी क्षणभर विचार करावला हवा होता. आपण स्वत:च स्री मासिकासाठी लिखाण करता. त्यात आमिष दाखवून सहकार्य मिळविण्याचा आमच्याकडून कधी प्रयत्न झाला हे सांगता का! आम्ही मागासलेल्या धर्मकल्पनांची उत्क्रांती होऊन नवा विचार पुढे आणण्याचा प्रयत्न करतो, तो समाजाच्या विकासासाठीच. समाजाच्या वैचारिक जागृतीचे कार्य करीत असताना मला सनातन्यांच्या रोषाला पात्र व्हावे लागले याला माझा नाईलाज आहे. आज मासिकांच्या निषेधाच्या सभा आपण घेत आहात; पण भविष्यकाळी तेथेच मासिकांच्या गौरवसभा भरण्याचा योग येईल अशी मला खात्री आहे.
या बिनतोड व समतोल उत्तराबद्दल वाचकांनी शंकरभाऊंवर अभिनंदनाचा वर्षाव केला. त्यातील एक नमुना म्हणजे माधवराव बागलांचे पत्र 'शाब्बास शंकररावजी! आपली ओजस्वी लेखणी, करारी बाणा आणि तत्त्वनिष्ठाही, आपण या पत्राने असंख्य वाचकांना पटवून दिली आहे. आपले पत्र म्हणजे साहित्याचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून राहील!'' मराठीतील इतर नियतकालिकांनीही या कामगिरीबद्दल किर्लोस्करचे अभिनंदन केले. 'प्रतिभा' साप्ताहिकात, ''ही तीन मासिके म्हणजे पुराणमतवादाच्या तटाला किर्लोस्करांनी लावलेले तीन सुरुंगच आहेत'' असे म्हटले. अकोला, अमरावती, मुंबई अशा ठिकठिकाणी स्त्रियांनी व साहित्यिकांनी सभा घेऊन त्यामध्ये किर्लोस्कर मासिकास आपला पाठिंबा जाहोर केला. त्यामुळे मासिकांचा नावलौकिक समाजात वाढला.
Hits: 104