पुरोगामी विचाराकडे - ४

Parent Category: मराठी पुस्तके Category: शंकरराव किर्लोस्कर - पुस्तक Written by सौ. शुभांगी रानडे

कोणतेही काम करावयाचे ते केव्हा व कसे करायचे याचा पूर्ण विचार आणि पद्धतशोरपणा व शिस्त पाहिजे. आळस व चालढकल न करता प्रत्येक गोष्ट प्रमाणशीर वेळेतच पूर्ण करण्याची दक्षता पाहिजे. काम करणाऱ्याला अडचणी व निराशा यांना तोंड द्यावे लागते. परंतु रागाच्या भरात कार्यनाश न करता, विवेकाने व धीराने प्रत्येक गोष्टीचा विचार केला पाहिजे. निदेने खचून जाणे किंवा स्तुतीने फुगून जाणे दोन्हेही चुकीचेच.

कामासाठी अनेक माणसांशी आपला संबंध येतो. प्रत्येकाबरोबर काय बोलावे व कसे बोलावे याबद्दल काळजी घेतली पाहिजे. मनुष्याच्या वाट्याला जे क्लेश व त्रास येतात. त्यांचा उगम शोधण्यास निघालोच तर बहुधा तो त्याच्या जीभेतच सापडेल. भाषण चातुर्य हा गुण सर्व काळी व सर्वस्थळी उपयोगात येतो व त्यामुळे माणसांची भरभराट विशेष झपाट्याने होऊ शकते. मात्र श्रोत्याबद्दल सहानभूती ब कळकळ असावी लागते.

उत्तम आरोग्य, स्वच्छ व व्यवस्थित पोशाख, व्यसनापासून दूर राहणे, सभ्यतेची वागणूक या गोष्टी साध्या असल्यातरी आत्मप्रभावाच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत.

जगात पैसा ही मोठी शक्ति आहे आणि पौरुष दाखवून श्रीमंत होण्यास प्रत्येकास मुभा आहे. आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी सांपत्तिक पाठबळ आवश्यक असते. पण पैसा हे साध्य नाही, साधन आहे. तो मिळविताना त्याच्या विनियोगाकडेही लक्ष पुरविले पाहिजे. गरिबीशी टक्कर देऊन एकेक पाऊल पुढेजाण्याचा काळ माणसाला जसे समाधान देतो ते पैशाच्या ढिगावर बसून मिळत नाही. पोकळ मोठेपणा, मित्रांची भीड, व्यसने ही पैशाच्या धुरातूनच वाढतात. त्यापासून सांभाळावे. आपण जेथे आहोत तेथूनच उन्नतीला पोचणाऱ्या पायऱ्या सुरू होतात. आपला प्रभाव वाढवित तुम्ही त्या सहज चढून जाल.

स्वतःचा धंदा यशस्वी करण्यासाठी अनेक चढउतारातून आणि खाचखळण्यातून वाटचाल करावी लागते. यशस्वी उद्योगासंबधी शंकरभाऊंनी मांडलेले हे विचार म्हणजे जणू या अवघड वाटेवर भेटलेला वाटाड्याच. ते म्हणतात-

'"कोणताही व्यापार, उद्योग अगर व्यवसाय करणाऱ्या मनुष्याला उच्च प्रकारचे यश मिळावे अशी महत्त्वाकांभषा असणे अगदी स्वाभाविक आहे; परंतु धंदा यशस्वी करणे हे सुद्धा एक शाख् आहे व त्याच्या नियमांच्या पायावरच यशाची इमारत उभो राहू शकते.''

याप्रमाणे विषय प्रवेश करून, यश मिळविण्यास लागणारे धोका पत्करण्याचे साहस, कष्ट करण्याचे सामर्थ्य, हाती घेऊ ते तडीस नेऊ हा आत्मविश्वास आणि कामावर लक्ष स्थिर करण्याची एकाग्रता या चार गुणांचे महत्त्व ते सांगतात.

''यश म्हणजे स्पृहणीय परंतु दु:साध्य अशी एखादी गोष्ट आपल्या गुणांच्या जोरावर साध्य करणे. त्यासाठी आपले ज्ञान, अबलोकन व कर्तृत्वशक्ती यामध्ये प्रत्येक दिवशी काही ना काही भर टाकण्याची गरज सांगितली आहे. आपल्या कामात मनोवृत्ती बावरण्याचे अनेक प्रसंग येतात. त्यावेळी धीर न सोडता खंबीरपणे मनाचा तोल जाऊ न देण्याची खबरदारी घेतली पाहिजे. यश मिळवायचे असेल तर आपले निश्चित उद्दोष्ट एकच असले पाहिजे. काम आपण करू शक्‌ असा विश्वास मनात असला को त्या कामास जरूर असा बुद्धीचा, शक्‍तीचा प्रवाह आपल्यामध्ये सुरू होतो. तुमच्या कामावर तुमचे प्रेम असले म्हणजे चैनीचा वा इतर आवडत्या गोष्टींचा त्याग सहज करता येतो. कालच्या पेक्षा आज अधिक चांगले काम करीत गेल्यास, अधिक जबाबदारीची कामे अंगावर घेऊन ती पार पाडण्याची पात्रता येत जाते. वाढत्या धंद्याबरोबर स्वत:ची पात्रताही वाढविण्याची जागरुकता ठेवली पाहिजे. कामाच्या नव्या पद्धती व सुधारणा अवलंबिल्या पाहिजेत. आपले काम म्हणजे आपल्यावरील बोजा नसून, ती आपल्याला मिळालेली एक उत्कृष्ट संधी आहे, आपल्या उपजिविकेचे साधन, कर्तृत्व शक्तिचा विकास करण्याचे साहित्य व मित्र मिळविण्याचा मार्ग आहे असे समजले पाहिजे.

आपण धंद्याचे मालक असल्यावर चिकाटीने व हुषारीने यश मिळविणे, सातत्याने ते टिकविणे व नवनव्या अडचणी दूर करून व्यवसाय वाढवित नेणे अशा जबाबदाऱ्या येतात. त्यामध्ये उत्तम व्यवस्थापनासाठी दुसऱ्याचे मत ऐकून घेणे, सहकाऱ्यांच्या गुणांना दाद देऊन माणसे तयार करणे इत्यादी गोष्टी येतात. कुठल्याही अडचणींनी गोंधळून न जाता त्या अडचणींवर मात करणे, ही एक महत्त्वाची गोष्ट आहे.

व्यापारधंद्यातील यश म्हणजे पैसा मिळविणे, स्वत:ची चैन व बडेजाव वाढविणे नव्हे, तर समाजाची सेवा करण्याचे ते एक साधन आहे हे समजणे. ही सेवा तुम्ही जितक्या उत्कृष्टतेने व तप्तरतेने पार पाडाल तितक्‍या मानाने तुमचे सौख्य ब यश वाढत जाईल.

जी गोष्ट उद्योगाची तीच व्यापार उदीमाची कुठलाही उद्योग, मग ती कारखानदारी असो वा व्यापार, तो यशस्वी होण्यासाठी शाखशुद्ध अभ्यासाचा पाया मजबृत असणे अतिशय आवश्यक आहे. शंकरभाऊंच्या मते- ''केवळ वरकरणी माहितीने चालविलेल्या उद्योगात वारंवार ठेचा लागण्याचा फार संभव असतो. नवीन भाषा शिकताना आपण तिच्या व्याकरणाचा अभ्यास करतो. तीच गोष्ट व्यापाराची. मनुष्याची सुखसंपत्ती वाढविण्यासाठी व देशाची स्थिती सुधारण्यासाठी आपला व्यापार वाढविणे हा एक तरुणोपाय आहे. पण सशास्त्र ज्ञानाच्या अभावी केलेल्या व्यापाराची स्थिती सुकाणू नसलेल्या जहाजासारखी होते. यासाठी या व्यापार शास्त्राच्या सिद्धांताची माहिती करून घेतली पाहिजे.

Hits: 93
X

Right Click

No right click