पुरोगामी विचाराकडे - ३

Parent Category: मराठी पुस्तके Category: शंकरराव किर्लोस्कर - पुस्तक Written by सौ. शुभांगी रानडे

वाचकांचे आत्मसामर्थ्य वाढवावे यादृष्टीने शंकरभाऊंनी 'उत्कर्ष मंडळाची' कल्पना काढली. खबरच्या वर्गणीदारापैकी ज्यांना आज आपण आहोत त्या जागेपासून आणखी प्रगती करून घ्यायची आहे व जे यश मिळवू इच्छितात अशा मंडळींनी 'उद्धेरेत आत्मनात्मानं' हे ब्रीदवाक्य ठेवून १) स्वत: प्रयत्न करणे २) मन आनंदी, उत्साही ठेवणे (उद्धरावा स्वयें आत्मा) ३) मनात सामर्थ्यवान विचार करणे ४) प्रामाणिकपणा व नीती न सोडणे ५) एकमेकांस सहाय्य करणे ६) वेळेचा सदुपयोग करणे ७) उद्योग करताना स्वत:बरोबर समाजाची सेवा घडण्याकडे लक्ष ठेवणे अशा वर्तनाची प्रतिज्ञा घेऊन तसे वर्तत करायचे असे 'उत्कर्ष मंडळाचे' नियम होते.

अशा उत्कर्षपरेरित व्यक्‍तींच्यासाठी विशेष श्रेय मिळविणारास चांदीचा 'उत्कर्ष पेला' देण्याची योजनाही जाहीर करण्यात आली. खबरचा वाचकवर्ग प्रयत्नवादी, उद्यमशील असल्याने आपण कसकसा प्रयत्न करून स्वत:चा उत्कर्ष केला, याबद्दलची हकीगत लिहून पाठवावी असे वाचकांना आवाहन करण्यात आले. त्यात ४९ जणांचे लेख आले, त्यामध्ये नाशिकचे किसनलाल चक्रपाणी यांना 'उत्कर्ष पेला' देण्यात आला. याखेरीज दहा मंडळोंचे विशेष अभिनंदन करण्यात आले. अशा उपक्रमातून वाचकांशी साक्षात व्यक्‍तिगत संपर्क होत असल्यामुळे, बंधुत्वाच्या स्नेहभावनेची परिणती खबर व त्याचे वाचक यांचा एक परिवार बनण्यात झाली.

मे मध्ये खबरचा १०० वा महोत्सव-अंक प्रसिद्ध झाला. त्यामध्ये या परिवाराचा व्याप व परस्पर लोभ यांची चांगलीच कल्पना आली. त्रिचनापल्ली, हैद्राबाद, म्हैसूर, मद्रास अशा दूरदूरच्या वाचकांपासून इंग्लंड, युरोप, आफ्रिका, ब्रह्मदेश अशा परदेशांतील वाचकांचेही फोटो या विशेषांकात छापले होते. 'मनोरंजन' च्या संपादिका मालती मित्र म्हणतात, '*खबरने उत्साहरहित तरुणात नवी उमेद, नवे धैर्य निर्माण केले व उत्साहाची वाट दाखवली. स्मरणपूर्वक 'स्रियांचे पान' राखून ठेवले याबद्दल कौतुक वाटते.'' पंडित सातवळेकर, देवदत्त टिळक, वा. म. जोशी. न. चि. केळकर, धों. के. कर्वे, रा. ब. धुरंधर, बाब्राव पेंटर, ना. सी. फडके या सर्वांनी खबरे मराठी माणसांना धैर्य व उत्साहाची वाट दाखविली या मुद्याचा पुन: पुन्हा उल्लेख केला होता.

१९२८ मध्ये खबरची पाने २४ होऊन वर्गणी सव्या रुपयावरून २ रुपये झाली. १९२१ पासून सहसंपादक म्हणून काम करणारे ना. ह. आपटे स्वत:च्या *मधकर'
मासिकाकडे अधिक लक्ष देण्यासाठी जुलै २८ मध्ये निवृत्त झाले. आपट्ययांचा विचार लक्षात आल्यावर संपादनात कोणाचे सहाय्य होईल यासाठी बोलताना विजापुरे यांनी इचलकरंजीचे ना. धों. ताम्हनकर यांचे नाव सुचवले. त्यांनी नाटके लिहिली होती. गणपतरावांमुळे ताम्हनकरांना खबरची माहिती होतीच. 'किर्लोस्कर' मध्ये त्यांच्या कविता व शंकरभाऊंच्या सांगण्यावरून कर्तबगार पुरुषांचे परिचय-लेखही त्यांनी लिहिले होते. तेव्हा शंकरभाऊ व गणपतराव यांच्या निमंत्रणाप्रमाणे ताम्हनकर किर्लोस्करला येऊन मिळाले. उद्योग, उत्साह, आत्मोन्नती या खबरच्या ब्रीदाला शोभतील अशा कल्पना इंग्रजी व अमेरिकन मासिकांत सापडत. त्यांना मराठी पेहराव चढविण्याचे बरेचसे काम प्रथम ताम्हनकरांनी केले. पुढे मुलाखती, परिचय इ. मासिकाच्या गरजेप्रमाणे अनेक प्रकारचे लेखन केले. त्या सुमारास १९२५ ते ३० या काळातल्या मंदीचा परिणाम सर्वत्र पसरत होता. नोकऱ्या कमी होऊ लागल्या, म्हणून विक्रीच्या व दुकानदारीच्या क्षेत्राकडे तरुणांचे लक्ष वेधणे आवश्यक होते. तरुणांनी स्वत:चा आत्मप्रभाव वाढवून, यशस्वी उद्योजकतेचा मार्ग व्यापाराचे योग्य व्याकरण वापरून, आणि विक्रीची हमखास सूत्रे राबवून कसा चोखाळावा याबाबतीत शंकरभाऊंनी जे मार्गदर्शन केले आहे, ते आजच्या पिढीलाही लागू पडेल असेच आहे.

स्वत:चा आत्मप्रभाव वाढवून होणारा व्यक्तिविकास ही यशस्वी उद्योजकतेकडे नेणारी पहिली पायरी होय. या विषयी शंकर भाऊ म्हणतात, ''नुसते पुस्तकी ज्ञान अगर हुषारी घेऊन काय करायची? मनुष्याच्या अंगात पाणी असेल तरच त्याची मातब्बरी'' असे कुणीतरी बोललेले तुम्ही ऐकले असेलच. हे अंगातले पाणी किंवा त्याची प्रभावशक्ती ही काय चीज आहे, हे आत्मसामर्थ्य उत्कट इच्छाआणि त्या दिशेने खटपट करणाऱ्यास साध्य होण्यासारखे आहे. आपला आयुष्यक्रम अधिक यशस्वी, सुखसंपन्न व परोपकारी करण्यास या अभ्यासाचा उपयोग होईल.'' अशी प्रस्तावना करुन आत्मप्रभाव कसा वाढविता येईल यासंबंधी शंकरभाऊ लिहीतात मनुष्याच्या मनात वाईट वासना, मत्सर, द्वेष भय असे क्हणविचार आणि पैर्य, उत्साह, प्रेम असे धनविचार असतात. त्यांना योग्यप्रकारे वळण देऊन आपला प्रभाव वाढविता येतो. या कामात भीति हा माणसाचा सर्वात '' दुष्ट शत्रू आहे. आपण डरलो की आपली बाजू घसरलीच. म्हणून निर्भय वृत्ती वाढविण्याची गरज ते सांगतात, कोणतीही गोष्ट करताना चारी बाजूची माहिती गोळा करणे, इतरांचा अनुभव ऐकणे हे महत्त्वाचे असले तरी कोणते काम करावयाचे याचा निर्णय व ते करण्याचा दृढनिश्चय ही यक्षिणीची कांडीच आहे. भोवतीच्या अनेक यशस्वी माणसांची नक्कल करण्यापेक्षा आपले स्वत:चे विशिष्ठपण प्रगट करण्याचा प्रयत्न असला पाहिजे. आपल्या मनाची, शरोराची व इतर साधनांची सर्व शक्ति त्या कामी लावावी.

Hits: 77
X

Right Click

No right click