पुरोगामी विचाराकडे - २
मुलांच्या भावी उत्कर्षासाठी शंकरभाऊंनी हायस्कूलच्या शिक्षणासाठी मालतीस हिंगण्याला व मुकुंदास सोलापुरला पाठवले. शंकरभाऊंना विरंगुळ्याचा एक विषय होता, तो म्हणजे क्रिकेट. उन्हाळा संपला व पावसाळ्याची सुरुवात झाली म्हणजे वाडीतले क्रिकेटचे सामान बाहेर निघायचे आणि प्रॅक्टिसला उत्साहाने आरंभ व्हायचा. टीममध्ये शंकरभाऊंसारखे पाच-सहा जुने खेळाडू होते. शिवाय यंत्रकला शिकायला आलेले टिळक महाविद्यालयाचे पदवीधर खरे, हरोळीकर, गोगटे आणि वाडीतच लहानाचे मोठे झालेले सदु व संभु चाबुकस्वार, पांडू मोहिते यांसारखे खेळाडूही सामन्यात आपली चमक दाखविल्याशिवाय राहिले नाहीत.
कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजची टीम फार नामांकित होती. तथापी वाडीच्या टीमशी खेळताना कोठे तरी माशी शिंकायची आणि कोल्हापूरला हार खायची पाळी यायची. १९२७ सालच्या सप्टेंबरमध्ये प्रो. ना. सी. फडके राजाराम कॉलेजच्या टीमचे कप्तान म्हणून वाडीला आले ब त्यांची आणि शंकरभाऊंची भेट क्रिकेटच्या मैदानावर झाली. किर्लोस्करवाडीच्या दोन दिवसांच्या वास्तव्यात त्या दोघांची बरीच दोस्ती झाली. कोल्हापूरच्या मंडळींना कारखाना दाखवला, त्याचबरोबर किर्लोस्कर खबरचे ऑफिसही प्रा. फडक्यांना दाखविण्यास शंकरभाऊ विसरले नाहीत. 'तुमचे लेखनाचे सहकार्य मिळाले तर फार आनंद वाटेल.' अशी सूचनाही त्यांनी केली.
पुढे दोघांची दोस्ती वाढतच गेली. ना. सी. फडके यांनी 'मानसमंदिर' या लेखमालेत माणसाचे प्रकट आणि अप्रकट मन यांचे सुलभ विवेचन करून विचार, विकार व संकल्प यांच्या शक्ती व त्यावर माणसाचा ताबा कसा राहील याची मानसशास्त्रीय चर्चा केली. 'बाबा वाक्य प्रमाणंनुसार' पूर्वापार चालत आली म्हणून कोणतीही गोष्ट आम्ही मानणार नाही. विसावे शतक हे नव्या शास्त्रीय ज्ञानाच्या प्रकाशात जुन्या संगतीची तपासणी करण्याचे आहे. त्यासाठी फडक्यांनी तरुण पिढीने कोणत्या श्रद्धांतून आपली शांती, समाधान व विसावा मिळवावा यासंबंधी जगविख्यात झालेल्या विल ड्युरांटच्या पुस्तकाचा रसाळ परिचय ' आधुनिक गीता' या नावाने केला. पुढच्या काळात लेख, कथा, कादंबरी अशा विविध प्रकारांमधून किर्लोस्कर, मनोहर मासिकामध्ये त्यांनी अनेक वर्षे लिखाण केले.
किर्लोस्कर खबरला थोर लेखक, विचारवंत आणि सामान्य वाचकांनीही दिलेल्या प्रोत्साहनामुळे आपण योग्य दिशेने चालतो आहोत असा आत्मविश्वास येऊन किर्लोस्कर खबरची वाटचाल अधिक जोमाने होऊ लागली. या कामात आधुनिक विचारांचे आणि प्राज्ञ पाठशाळेत अध्ययन केलेले पुरोगामी लेखक महादेवशास्त्री दिवेकर यांची कामगिरी फार मोलाची झाली. 'हिंदू समाजाची उन्नती का होत नाही?' याचे कारण आपल्यात भिनलेला फाजील दैववाद; विटाळ चांडाळाच्या कल्पना असे टीकासत्र सोडून, शास्त्रीबुवांनी आपल्या जहाल विचारांचा सुरुंग लावून वाचकांच्या मनाला हादरवून सोडले. देव पावसाप्रमाणे सहाय्य करतो; पण नांगरणी-पेरणीचे प्रयत्न माणसांनीच केले पाहिजेत. दैव म्हणून जगात काही नाही, उद्योग करणे न करणे यामुळेच माणूस आपले दैव ओढवून घेतो, असे म्हणून अपशकुन, फलज्योतिष असल्या कल्पनांची त्यांनी भंबेरी उडवली. कर्त्या व्यक्तींचे अवतार बनविण्याची हिंदू समाजाची मानसिक गुलामगिरी त्यांनी भेदकपणे उघडकीस आणली. शिवाजी, टिळक यांना अवतार समजून, त्यांचे पुतळे उभे केले म्हणजे आरती आणि भजन करण्यापलीकडे आपण स्वत: देशोद्धाराचे काही कार्य करावयास नको अशा समजुतीवर त्यांनी परखड टीका केली. त्यामुळे पुढच्या अंकात शास्त्री बुवांचा सणसणीत लेख कोणत्या विषयावर येणार याची वाचक वाट पाहू लागले.
Hits: 84