नांगर विक्री ते समाजमंदिर - २
त्या काळात स्थळी, काष्ठी पाषाणी 'किर्लोस्कर नांगर' विकणे इकडेच त्यांचे सारे लक्ष. शंकरभाऊंच्या ऑफिसातून स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर उतरणारी माणसे दिसत. एखादा व्यापारी, शेतकरी कारखान्याच्या दिशेने येऊ लागला की 'या पाहुणे' असे स्वागत करून शंकरभाऊ पुढे जायचे, पण एक दिवस कोट-रुमाल, उपरणे पेहेरलेले गृहस्थ आले असताना त्यांच्याशी नांगराबद्दल बोलू लागल्यावर ते शंकरभाऊना म्हणाले, ''मला नांगर नको आहे. कारखान्यात अनंतराव फळणीकर आहेत ना ! त्यांना माझी मुलगी दाखविण्यासाठी मी आलो आहे.'' ते ऐकून शंकरभाऊ हादरलेच. कारण त्या दोघांनी ''लग्न करायचं नाही'' असे पक्के ठरवले होते; पण काका-काकrxच्याकडे अंतोबा गेला, तो लग्नाची तिथी ठरवूनच आला. किर्लोस्करवाडीतले ते पहिले लग्न थाटात साजरे झाले; पण आता शंकरभाऊंना फारच एकटे एकटे वाटू लागले.
शंकरभाऊंची आई नुकतीच गेली होती, त्यामुळे आता घरात सून आणावी अशी सर्वांना उत्सुकता होती. त्यावेळी शंकरभाऊच्या बाबांच्याबरोबर मेडिकल कॉलेजात शिकलेले डॉ. लक्ष्मणराव पुरोहित, हे त्यांची कन्या-मुक्ता-हिच्यासाठी स्थळे शोधत होते. डॉ. पुरोहितांच्या बोलबण्याबरून शंकरभाऊ मुंबईस गेले. मुक्ताचे वय १३ वर्षांचे होते. नाक-डोळे ठसठशीत, गोरा रंग, शिक्षण मराठी तिसरीपर्यंत. मुंबईस भेटल्यावर मुक्ताने गाणे म्हणून दाखविले. त्याला शंकरभाऊंनी पेटीवर साथ केली. त्या प्रसंगाने त्यांचीही उत्सुकता वाढली. तडकाफडको मुहूर्त ठरून मुंबईतच लग्न झाले. मुक्ताची पार्वतीबाई झाली.
किर्लोस्करवाडीत काकांनी शंकरभाऊंच्या संसारासाठी आवडीप्रमाणे वाडीतील सर्वांत उंच जागेवर एक चिमुकले घर बांधून ठेवले होते. तेथे बाहेरच्या ओसरीवर उभे राहिले की कृष्णा खोऱ्याचा मोठा टापू दिसत असे. घरात दोघेच राहणार होते. जरुरीपुरते सामानही लागले होते. भिंतीवर शंकरभाऊंनी काढलेली दोन-चार चित्रेही लावली होती. एक ग्रामोफोन, बाजाची पेटी असे व्यवस्थित मांडलेले होते. बाहेरच्या अंगास ''शांती निवास'' या नावाची छोटी पाटीही लावली होतो.
एके दिवशी ऑफिसात आल्यावर काकांचे बेळगावपासूनचे हरकामी सहाय्यक के. के. कुलकर्णी बोलताना सहज म्हणाले, ''या भूमीत येऊन पाच वर्षे झाली आपल्याला.'' शंकरभाऊंनी विचारले, ''कोणता दिवस होता?'' ''के के म्हणाले, '' अहो, ४ दिवसांनी येणारा धूलिवंदनाचा दिवस! बघा दिवस कसे भरभर गेले.'' एकीकडे हे सारे ऐकताना शंकरभाऊंच्या मनात आले, ' धुलवडीच्या दिवशी लोक घाणेरडेपणा करतात; पण आपल्या कारखान्याच्या या स्थापनादिनाच्या निमित्ताने आपण उत्सव का करू नये?' केकेना, हा विचार सांगताच त्याला काकांची परवानगी घेण्यासाठी दोघे काकांना भेटायला गेले. कोणतीही चांगली कल्पना काकांना सांगितली व त्यामध्ये आपल्या कामगारांची सुधारणा होईल अशा कामास ते नेहमीच उत्तेजन देणार हे ठरलेले. मग मंडळी कार्यक्रम ठरवू लागली.या निमित्ताने ''शिमगा स्पोर्टस'' म्हणून कामगार व नागरिकांच्या साठी कुस्ती व रस्सीखेचपासून काही खेळांच्या स्पर्धा ठेवण्यात आल्या. त्यामध्ये स्रियांनी डोक्यावर भरली घागर घेऊन पळण्याची शर्यतही ठरली. ही एक छोटी सामाजिक क्रांतीच होती. डोळे बांधून गाढवाला शेपूट लावण्याचे हसवणारे खेळही घेतले आणि दोन दिवस मजेत गेले आणि १९१५ पासून हा उपक्रम दरवर्षीच करायचे ठरले.
Hits: 81