नांगर विक्री ते समाजमंदिर - ३
१९१७ मध्ये इनप्ल्युएन्झाच्या साथीने साऱ्या देशांत हा:हा:कार उडवला होता. ही साथ पसरत चालली आणि आठ-दहा दिवसांत तिने किर्लोस्करवाडीला घेरले.
एकामागून एक ऐंशी कामगार तापाने फणफणून गेले. वाडीत घरोघरी आजाऱ्यांची अंथरूणे पसरली. त्यावेळी लक्ष्मणराव, अंतोबा, शंभोराव यापैकी कोणीच वाडीत
नव्हते. होता होता पॅटर्न खात्यातील संतू सुतार उन्माद चढून बडबडू लागला. शंकरभाऊ त्याला आवरायला गेले पण त्याच्या नाडीला हात लावताच ती बंद आहे
असे आढळले. श्वासही बंद झाला. वाडीतला हा पहिला मृत्यू. त्याची पुढील व्यवस्था कशी करायची याचा विचार आजवर झालाच नव्हता. पण आता वाडीपासून थोडे लांब, रेल्वे पुलाच्या पलीकडील जागेत, शेते तुडवीत निवडुंगातून चालत जाऊन तेथे त्याला अग्नी दिला. एकाला पोचवून यावे तर तेवढ्यात दुसरे प्रेत तयार, असा प्रकार ८-१० दिवस चालला.
एव्हाना पहिले महायुद्ध सुरू होऊन तीन वर्षे झाली होती. भारतातले खडे सैन्य परदेशात पाठवता पाठवता अशी वेळ आली, की भारतावरच परचक्र आले तर त्याला तोंड द्यायला लष्करी सामर्थ्यच येथे उरले नाही. हा आणीबाणीचा प्रश्न सोडवायचा असेल, त॑र तातडीने जादा सैन्य उभे करायला हवे होते. या गंभीर प्रसंगात लोकमान्य टिळकांनी महाराष्ट्रातल्या तरूणांना सैन्यात दाखल होण्यासाठी कळकळीचे आबाहन केले. ''केसरी''तील त्यांच्या स्फूर्तिदायक लेखाने वाडीतील चाळीस कामगारांनी प्रादेशिक फौजेत दाखल होण्यासाठी नावे नोंदवली; पण साताऱ्यास वैद्यकीय तपासणीतून फक्त सातजणांची निवड झाली. शंकरभाऊ, अंतोबा, शंभोराव जांभेकर, करजगीकर, मंगेशराव रेगे, मडूरकर, पागे ही मंडळी १९१८ साली फेब्रुवारी १५ला घोरपडी स्टेशनवर उतरली आणि कॅँपच्या राहुट्यांत त्यांनी बिस्तारा ठेवला.
लष्करी शिस्तीत सकाळ-संध्याकाळ तीन तास घामाघूम करणारे ड्रिल; दुपारी उन्हात तासभर मार्चिग; फायरिंगची सवय करताना खांदा निखळायचा. त्यांच्याबरोबर शिक्षणाधिकारी, वकील, इंजिनियर असे सारे जण लाज सोडून सर्व कामे आपली आपण करण्यासाठी तयार झाले. या मंडळींचा काटकपणा खूप वाढला आणि कुठलेही काम संघटितपणे कसे पार पाडावे, याची शिस्त शिकायला मिळाली. तेवढ्यात युद्धच संपले. आणि वाडीची मंडळी परत कारखान्यात येऊन पोचली, तेव्हा आपल्या सर्व कामगारांना ड्रीलची शिस्त लावण्याचा विचार त्यांचे मनात आला. कामावर येताच परस्परांना ''गुडमॉर्निंग'' म्हणायचे येथपासून, उभे कसे राहावे, चालतांना पावले कशी टाकावी, यासाठी ७५० कामगारांची परेड दर आठवड्यास घेण्याचे काम शंकरभाऊंवर सोपवले गेले. त्यातूनच वाडीच्या संरक्षणासाठी रात्री गस्त घालण्याचे काम नागरिकांच्या पाळ्या लावून आठवड्यातून एकदा रात्री १० ते पहाटे ४ करण्याची पद्धत सुरू झाली.
या साऱ्या व्यापात शंकरभाऊ मनापासून गुंग झाले आणि किर्लोस्कर मासिकाचे काम थोडे विस्कळीत झाले.
Hits: 75