नांगर विक्री ते समाजमंदिर - १
दर मंगळवारच्या ''केसरीत'' किर्लोस्कर नांगरांची जी जाहिरात द्यायची ती जाहिरात नबी असली पाहिजे असा काकांचा कटाक्ष होता; पण केसरीच्या संपादकांना ते पटेना. शेवटी केसरीचे ज्येष्ठ विश्वस्त तात्यासाहेब केळकर यांच्यापर्यंत तक्रार नेल्यावर ती एकदाची दूर झाली. दर आठवड्याला नव्या कल्पना काढायचे काम सोपे नव्हते. विलायती मासिकातून येणाऱ्या जाहिराती पाहूनही शंकरभाऊंना नव्या कल्पना सुचत. नांगरांचा हंगाम ऑक्टोबर ते फेब्रुवारीअखेर, बाकीचे सात महिने कारखान्याला काम काय द्यायचे होते. त्यासाठी बिडाचे नक्षीदार कठडे, खलबते, लोखंडी खाटा, तवे असा विविध प्रकारचा माल केला जायचा. जाहिरातीसाठी मजेदार ओव्या केल्या होत्या.
'किर्लोस्कर बंधुनी लोखंडाचं चाक केलं, पाणी शेंदायचं सोप झालं.'
'किर्लोस्कर बंधूकडे होतो आंबोळ्याचा तवा, आपल्या घरी एक हवा दादाराया॥'
अशा आकर्षक जाहिरातींचा खूप उपयोग होऊन चौकशीची पत्रे येत. त्या चौकशीचे मागणीमधे रुपांतर करणे हे दुसरे काम. त्यासाठी पत्रव्यवहाराने पाठलाग करणे आवश्यक असे आणि तेही एका पत्राने काम झाले नाही तर दुसरे-तिसरे अशी कधी सात-आठ सुद्धा पत्रे जात. ग्राहकांच्या आळसाने, बेफिकीरपणाने अथवा अविश्वासाने ज्या मागण्या मिळू शकल्या नसत्या त्या सर्वही फिरून हाती येत.
तरी नुसत्या जाहिराती व पत्रव्यवहारानेच धंदा कसा वाढणार? त्यावेळी पिढ्यान् पिढ्या चालत असलेल्या लाकडी नांगराशीच नव्हे, तर सरकारी शेतकी खात्यामार्फत जोराने पुरस्कार केलेल्या विलायती नांगरशीही गाठ होती. यासाठी केव्हा केव्हा परगावी जाऊन किर्लोस्कर नांगर कशी खोलवर नांगरट करतो हे शेतकऱ्यांना नांगर चालवुन दाखवावे लागे. ते पाहण्यास एक जत्राच भरत असे. या कामासाठी भाऊराव पाटील यांना नेमण्यात आले होते. गावोगाव जाऊन-तेथे प्रत्यक्ष दाखवून लोखंडी नांगराची उपयुक्तता ते पटवून देत असत. या त्यांच्या फिरतीवर शंकरभाऊही कधी कधी त्यांच्यासोबत जात असत. त्यावेळी खेड्यातील जनतेचे दारिद्र्य, अज्ञान आणि रूढी सोडून नवा विचार पटणे अवघड ही स्थिती पाहून त्यांचे आपआपसात बोलणे होई. हे भाऊराव म्हणजे मागासलेल्या वर्गाना शिक्षणाचो दारे उघडून देणारे सातारचे कर्मवीर भाऊराव पाटील होत !
कारखान्याच्या मालाचा प्रसार होण्यासाठी स्वदेशी उद्योगाची माहिती नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झाली, तर लोकांच्या मनावर विशेष प्रभाव पडेल असे शंकरभाऊंना वाटू लागले. एकदां बेळगावचे अण्णासाहेब लठ्ठे यांनी किर्लोस्करवाडीस भेट दिली, तेव्हा कारखान्यासंबंधी त्यांनी एक लेख लिहावा असे त्यांना सुचवून, शंकरभाऊंनी त्यासाठी कारखान्याचे फोटोही काढून दिले. त्या काळातील लोकप्रिय मासिक ''मनोरंजन*' यामध्ये तो लेख प्रसिद्ध होताच शंभर जाहिरातींनी झाली नसती एवढी प्रसिद्धी किलॉस्कर कारखान्यास मिळाली. पुढे इतरही नामवंत वृत्तपत्रांमध्ये कारखान्याबद्दल गुणग्राहक लेख यावे अशी खटपट शंकरभाऊंनी केली. त्याला फारसे यश आले नाही.
लक्ष्मणराव अमेरिकन कंपन्यांचे कॅटलॉग, माहितीपत्रक तसेच इतर औद्योगिक साहित्य मागवीत असत. ब्रिटिशांची हुकमत झुगारून अमेरिकेने स्वतंत्रपणे आपल्या उद्योगधंद्याची प्रगती चालविली होती. याचे भारतीय उद्योजकांना त्यावेळी बिशेष अगत्य वाटे.«
एके दिवशी अमेरिकेच्या टपालातून ''फोर्ड टाईम्स''चा अंक आला. मोटारी तयार करणाऱ्या फोर्ड कंपनीचे हे प्रकाशन दरमहा प्रसिद्ध होते असे दिसले. ते पाहून आपल्या कारखान्यांची प्रसिद्धीही आपणच का करू नये असा विचार शंकरभाऊंनी लक्ष्मणरावांपुढे मांडला आणि ''किर्लोस्कर खबर'' हे नाव त्यांना सुचविले. स्वावलंबनावर लक्ष्मणराबांची विशेष श्रद्धा असल्याने, ''चांगली आहे. तुझी कल्पना, लागा उद्योगाला !' ' असा पाठिंबा त्यांनी दिला.
स्वदेशी उद्योगाचा विकास करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे लक्ष्मणराव आणि समाजमनाची जाण व त्याला प्रभावित करण्याची जाणीव व कौशल्ये ज्यांच्या मनात बालपणीच रुजली होती. असे शंकरभाऊ, या दोघांच्या एकवाक्यतेने 'किर्लोस्कर खबर'चा जन्म झाला. १९१६ चा पहिला अंक दुसऱ्याच्या छापखान्यात छापून घेतला; परंतु आता नियमित मासिक काढायचे तर ते आपणच छापायला हवे, हे त्यांनी पक्के ध्यानात घेतले, पण त्याची वेळ यायला अवकाश होता.
Hits: 80