लाहोरचे दिवस - २
त्यांनी ''बडी खुषीसे'' म्हटल्यावर शंकरने त्याला हवी तशी पोज देवून, कॅमेऱ्याने त्यांचा फोटो घेतला. त्या फोटोचे शंकरला अतिशय भूषण वाटू लागले. चित्रकलेमध्ये शंकरची जरुरीपुरती प्रगती झाल्यावर दोन वर्षे त्याने मुंबईच्या आर्ट स्कूलमध्ये घालवावी असा सल्ला सोनबांनी दिला. घर सोडून दीड वर्ष झाले होते. हळूहळू घराची आठवण येऊ लागली होती; पण उत्तर हिंदुस्थानातील प्रेक्षणीय ठिकाणे आपण अजून पाहिलीच नाहीत हे मनात आल्यावर दिल्ली, आग्रा, हरिद्वार, लक्ष्मण झुला, ऋषिकेश अशा ठिकाणी जाण्याचे शंकरने ठरविले. शिवाय काकांनी दोन लेन्सचा स्टिरिओ कॅमेरा शंकरसाठी इंग्लंडहून मागवून लाहोरला पोचवला होता. सर्व स्थळांचे फोटो घेतल्यावरच घरी पोचायचे त्याने ठरवले.
इतक्या दूर प्रांतात राहून शंकर सुखरूप घरी आला याचा आईला अत्यंत आनंद झाला. शंकरची चित्रकलेतील प्रगती पाहून वडिलांना समाधान झाले- भावंडांनी त्याला गराडा घातल्यावर त्याला प्रेमाचे भरते आले ते अवर्णनीय होते., चार दिवस शंकरचे विविध अनुभव ऐकून सर्वांची खूपच करमणूक झाली; पण आर्ट स्कूल सुरू व्हायची वेळ झाल्यामुळे सोलापूरचा मुक्काम आवरून शंकर मुंबईला हजर झाला.
मुंबईच्या आर्ट स्कूलचे त्यावेळचे प्रिन्सिपॉल मि. फर्न नावाचे एक अँग्लोइंडियन गृहस्थ होते. त्यांनी शंकरच्या कामाचे नमुने पाहून त्याला एकदम पेंटिंगच्या वरच्या वर्गात बसायची परवानगी दिली. कोल्हापूरचे दत्तोबा दळवी हेही त्या वर्गात होते. त्याशिवाय नारायणराव सरदेसाई, रावळ, पानवळकर, केतकर, चाफळकर इत्यादी अनेक मित्र आर्ट स्कूलमध्ये शंकरला मिळाले. वासरात लंगडी गाय शहाणी म्हणतात, त्याप्रमाणे शंकरइतके शिक्षण झालेला, इतका प्रवास केलेला, त्यावेळी क्वचितच कोणी आर्टस्कूलमध्ये असेल, त्यामुळे शंकरला थोडा शिष्टपणा मिळाला. वर्गावर येणारे तासकर, धुरंधर, आगासकर अशा शिक्षकांपुढे विद्यार्थी नमून वागत. शंकरला मात्र तसा संकोच वाटत नसे. प्रसंग पडला तर या शिक्षकमंडळीबरोबर तो चित्रकलेबद्दल मोकळेपणाने चर्चा करीत असे.
मुंबईत त्याचे मेहुणे गणपतराव सरदेसाई (आबा) यांच्याकडे शंकर गिरगावात राहू लागला. शंकरची वडील बहिण कृष्णाबाई क्षयाने दोन वर्षापूर्वी दिवंगत झाली असली, तरी आबांनी त्याच्याविषयीच्या आपुलकीत अंतर पडू दिले नाही. तसे घडणे त्या काळात सहसा होत नसे. तेव्हाचे घराणे म्हणजे कोळ्याचे एकेक जाळे; अशी काही जाळी एकमेकाशी चिकटल्यामुळे एक मोठे जाळे तयार होत असे. त्याप्रमाणे किर्लोस्कर-जांभेकर-टेंबे-टिकेकर-सरदेसाई-पुरोहित-सातवळेकर अशा घराण्यांचे एक विशाल जाळे होते.
आर्ट स्कूलमध्ये, एक गोष्ट शंकरच्या लक्षात आली, ती म्हणजे त्याच्यापेक्षाही चांगला हात चालणारे विद्यार्थी आर्ट स्कूलमध्ये होते; पण समोर मांडलेल्या वस्तूचे किंवा व्यक्तीचे आकर्षक चित्र काढता आले म्हणजे तो उत्कृष्ट चित्रकार होऊ शकेल असे नाही, तर त्याच्या कल्पनाशक्तीचीही वाढ होणे जरूर आहे. तशी वाढ झाली नाही, तर चित्र नेमके कशाचे काढायचे हा प्रश्न त्याला सोडवता येणार नाही. चित्रकलेविषयी शंकरला इतके प्रेम वाटे ते डोळ्यांना आनंद देण्याचे एक साधन म्हणून नव्हे, तर शिक्षणाचा अभाव असलेल्या आपल्या देशात समाजाला जागृत व सुसंस्कृत करण्यासाठी चित्रकला हे मोठे प्रभावी साधन ठरेल, अशी त्याची प्रांजळ भावना होती. म्हणून शंकरच्या परीक्षा झाल्या. शंकरला काही बक्षिसे मिळाली; पण त्यापेक्षा विशेष म्हणजे टाऊन हॉलमध्ये भरणाऱ्या बाँबे आर्ट सोसायटीच्या वार्षिक प्रदर्शनात त्याची तीन लॅडस्केप्स (निसर्गचित्रे) निवडून त्यांना '"कमेंडेड'' असा परीक्षकांचा शेर मिळाला, त्यामुळे शंकर खूप खूष झाला.
चित्रकाराला कोणताही सौंदर्याचा प्रत्यय मनाला भुरळ पाडतो. निसर्गाची अद्भूत करामत पाहून मन थक्क होते. एकीकडे डोळे त्या सौंदर्यावर खिळून राहतात आणि हे सौंदर्य कागदावर कसे उतरविता येईल अशा आतुरतेने चित्रकार अतिशय अस्वस्थ होतो. त्याला दुसरा विचार स्पर्श करत नाही. मुंबईतले शंकरचे वर्ष कलेच्या उपासनेत सरले, त्याबरोबर पुढील शिक्षणासाठी इटलीला जाण्याचे बेत त्याच्या मनात घोळू लागले.
दरम्यान चार वर्षांत कुंडलरोडच्या कारखान्याची बरीच वाढ झाल्यामुळे त्या वस्तीचे रुपांत आता किर्लोस्कर वाडीत झाले होते. वाडीतल्या झोपड्यांपुढे झाडांची रांग लावली होती. काका लक्ष्मणराव यांना पाहून शंकरला आनंद झाला. घरी जाताच त्याला बाबांशी आपल्या इटलीच्या बेताबद्दल स्वस्थपणे बोलायचे होते; पण बाबांनीच त्याला बोलावणे पाठविले. ते खोलीत एकटेच होते. ते म्हणाले, ''शंकर! तू आलास हे फार चांगले झाले. तुझी आई सारखी तुझी वाट पाहात होती. ती कशाने आजारी आहे हे तुला कदाचित माहिती नसेल. तिला क्षय झाला आहे!'' ते ऐकून शंकरची छाती धडधडू लागली. त्याने विचारले, ''इथल्या हवेने तिला बरं वाटत नाही का?'' ते म्हणाले, ''छे, आजार सारखा वाढत आहे, त्यामुळे असं दिसतयं, की ती आता थोड्या दिवसांची सोबती आहे!''
Hits: 91