आईचा आदेश
बाबांनी गंभीरपणे उच्चारलेले ते शब्द ऐकून शंकरच्या अंगातून एक विजेचा झटका निघून गेल्यासारखे झाले. खरे सांगायचे तर शंकर आता मोठा झाला होता. तो आता विचार करू लागला. आईचे प्रेम कशाला म्हणतात याची त्याला थोडीफार कल्पना होती. तो काळच फार निरळा. '' आई थोर तुझे उपकार'' ही कविता तो लहानपणी शिकला होता; पण तिचा मूळ नीट अर्थ समजला नव्हता. त्याकाळी बडील माणसे मुलांना फारसे जवळ येऊ देत नसत, त्यामुळे त्यांचेबद्दल भीतीचा पगडा मुलांच्या मनावर असे. आई म्हणजे शाळेला जाताना जेवायला वाढणारी व हट्ट केला, की रागाने कान उपटणारे माणूस यापेक्षा तिच्याकडे पाहण्याची मुलांची निराळी दृष्टी नसे. तशात लहानपणी त्याची बेळगावला रवानगी झालेली, पण वयपरत्वे आता त्याचे डोळे उघडले होते. त्याला दिसू लागले.
आईचा जन्म कर्नाटकातला. दहाव्या वर्षी तिचे लन झाले. शंकरचे वडील सुधारक-पुरोगामी विचाराचे. त्यांनी तिला लिहायला-वाचायला शिकवले आणि समाजसेवेची आवड निर्माण केली. त्याच्या आईला घरातच नव्हे, तर बाहेरही सर्वजण इतका आदर, मान का देतात याचा त्याला आता उलगडा होत चालला. ती आपल्याच संसारात गढून न जाता गोरगरीब-अनाथ स्त्रियांना शक्य ते सहाय्य देण्यासाठी झटत असे. सोलापूरच्या स्त्रियांना शिक्षण देणारे सरस्वतीमंदिर तिने सुरू केले होते. बालविधवांची हिंगण्याला सोय लावून देणारी, गरीब बायांचे वेळ पडली तर त्यांच्या घरी जाऊन बाळंतपण करणारी, पुरुषांच्या सभेत भाषण करणारी सोलापुरातील ती पहिली खरी होती.
शंकर हायस्कूलमध्ये असताना बायजाबाई नावाची एक महार कोर्तनकार सोलापुरात आली होती. तिला आईने घरी बोलावून तिचा पाहुणचार केला व स्वत: पुढाकार घेऊन ठिकठिकाणी तिची किर्तने केली होती. ह्या सर्व गोष्टी आठवून आपली आई केवढ्या योग्यतेची आहे ते जाणून-शंकरच्या मनात तिचेबद्दल फार आदर उत्पन्न झाला.
आणि ही आपली आई लवकरच हे जग सोडून जाणार या कल्पनेने त्याच्यामनात काहूर उठले. त्याला काही सुचेनासे झाले. त्या भरात बाबांचा निरोप घेऊन शंकर तडक आईच्या खोलीकडे गेला. तिच्यासाठी एक स्वतंत्र झोपडी बांधून दिलेली होती. तेथे त्याने पाऊल ठेवले तेव्हा ती शांतपणे पलंगावर पहुडलेली दिसली. किंती नि:स्तेज व फिक्कट झाला होता तिचा चेहरा! त्यांची नजरानजर होताच तिची मुद्रा प्रफल्लित झाली. तिच्याजवळ एक खुर्ची घेऊन शंकर बसला व तिच्या अंगावरून हलकेच हात फिरवू लागला. जरा वेळाने तिने क्षीण स्वरात विचारले, ''बरा आहेस ना तू शंकर?'' त्याने नुसती मान हलवली. ''तुझ्याबद्दल मला फार काळजी वाटते रे! कुठे कुठे तू फिरतोस! काय काय करतोस! तुझं पुढं होणार काय, काही कळत नाही!'' ''पण आई! आता तुला बरं वाटेल असंच मी वागणार आहे. तू मात्र लवकर बरी हो!'' आईच्या डोळ्यांत एक निराळीच चमक दिसू लागली. ती म्हणाली, ' 'खरंच का हे? खरंच का तू माझ्या मनासारखं वागणार आहेस? किती बरं होईल असं केलंस तर!''
''तुझ्या इच्छेबिरुद्ध काहीही करायचं नाही असं मी ठरवलंय आता.''
''देवाने तुला किती चांगली बुद्धी दिली ही! आता मी सांगते ते नीट ऐक. तुझ्या डोक्यातलं चित्रांचं वेड काढून टाक आणि भावोजींच्या इच्छेप्रमाणे त्यांच्याजवळ इथेच रहा. त्यांना तू हवा आहेस. तुझ्या वडिलांनाही यामुळे समाधान लाभेल. म्हण हो''.... आईच्या शब्दांमुळे शंकर गोंधळलाच. ती असा एखादा विलक्षण पेच त्याच्यापुढे टाकील अशी पुसटही कल्पना त्याला नव्हती. काहीतरी पळवाट काढायची म्हणून तो म्हणाला '' आई, कारखान्यात माझा काय उपयोग? मी इंजिनियर थोडाच. आहे? कारखान्याला उगीच एक अडगळ व्हायची?''
''तुझा कसा उपयोग करून घ्यायचा हे सारं भावोजींना माहित आहे. तुला नको ती काळजी!'' तिने शंकरला निरुत्तर केले, ''“ठिक आहे, तू सांगतेस त्याला मी तयार आहे.'' शंकर म्हणाला. त्यांचे संभाषण तेथेच संपले. थोड्याच वेळात काका शंकरच्या आईची प्रकृती कशी आहे हे पहायला आले. त्यांना पाहताच आई म्हणाल्या. ''हं, भावोजी! घ्या या शंकरला तुमच्या ताब्यात. यापुढे त्याने तुमच्याजवळ राहांच कबूल केलं आहे. सांभाळा तुम्हीच आता त्याला!'' काकांनी नुसते शंकरकडे पाहिलं. त्याची नजर खाली वळली. आईशी इकडच्यातिकडच्या गोष्टी बोलून त्याने तिचा निरोप घेतला.
थोड्या वेळातच काकांचे त्याला बोलावणे आले म्हणून तो ऑफिसात गेला. तिथे कारखान्याचे सारे कामगार व कारकुन एक अर्थवर्तुळ करून उभे होते. हा काय प्रकार असावा, असा शंकर विचार करतो आहे, तेवढ्यात काकांनी हाक मारून त्याला सर्वांपुढे उभे केले व भोवतीच्या समुदायाला उद्देशून ते म्हणाले ''हा माझा पुतण्या शंकर! आजपासून तोही तुमच्याप्रमाणेच कारखान्यात कामाला लागणार आहे हे सांगायला मला फार आनंद वाटतो. पत्रव्यवहार, जाहिराती ही न कामे तो पाहिल. त्याचे हस्ताक्षरही फार सुवाच्च वळणदार आहे. इंग्रजीही सुरेख लिहितो. यासाठी मी त्याला ऑफिसात नेमणार आहे. त्याला नव्या नव्या कल्पना काढण्याची आवड आहे, त्यामुळे आपल्या कारखान्याला त्याचा पुष्कळ उपयोग होईल, याचा मला विश्वास वाटतो. आजपासून हा आपला सर्वाचा ''शंकरभाऊ''.
सर्वांनी टाळ्या वाजवून शंकरभाऊंचे सहर्ष स्वागत केल्यावर तो परत आईच्या झोपडीकडे आला. तोपर्यंत बाबाही तेथे आले होते. त्या दोघांनाही ही हकrगत कळल्यावर पराकाष्ठेचा आनंद झाला व त्यांनी मोठ्या प्रेमाने शंकरची पाठ थोपटली.
ही १९१४ च्या मे महिन्यातील गोष्ट. अंतोबा फळणीकरांची व शंकरची पुन्हा जोडी जमली, म्हणून त्या दोघांनाही आनंद झाला. मात्र तो ताबडतोब कामाला लागला नाही.
वाडीतले पुढचे दिवस आईजवळ राहून तिचे जेवढे मनोरंजन करता येईल तेवढे त्याने करावे असे शंकरला वाटे; पण त्याने तिच्याजवळ बसू नये म्हणून ती वरचेवर ताकीद द्यायची पण ते मात्र त्याने ऐकले नाही. वाडीला राहून गुण येण्याची शक्यता संपल्यावर तिला घेऊन शंकरचे बाबा व शंकर सोलापुरास आले. तिला कळून आले की आपले थोडेच दिवस आता उरले आहेत; पण तिची शांत वृत्ती किंचितही ढळली नाही. अनंत चतुर्दशीच्या सुमारास एका सायंकाळी तिने या नश्वर जगाचा निरोप घेतला. शंकरला आईच्या चिरवियोगाचे फार दु:ख झाले; पण निदान शेवटच्या दिवसांत आईला सुखी करून आपलं कर्तव्य केलं एवढेच समाधान त्याला होते. थोड्याच दिवसांत सोलापूरला सर्वांचा निरोप घेऊन तो किर्लोस्करवाडी येथे दाखल झाला.
सोलापुराहून किर्लोस्करवाडीस येऊन शंकरभाऊ कामावर रुजू झाले त्यावेळी ऑफिसमध्ये जुनी मंडळी बरीच होती. त्यांचे सहकार्य मिळविण्यासाठी आपण एक शिकाऊ उमेदवार आहोत अशो त्यांच्याशी वागण्यातील भूमिका शंकरभाऊ घेत होते. गोड व नम्र भाषेला किंमत पडत नाही, पण तिचा फायदा फार होतो हे शंकरभाऊ जाणून होते.
Hits: 92