चित्रकलेचे प्रेम - ३

Parent Category: मराठी पुस्तके Category: शंकरराव किर्लोस्कर - पुस्तक Written by सौ. शुभांगी रानडे

लाहोरमधील मूठभर मराठी मंडळी जमायचे ठिकाण म्हणजे शहराबाहेरचे "गांधर्व महाविद्यालय' पंडित विष्णु दिगंबर पलुस्करांनी त्या चिमुकल्या जागेत संगीताच्या प्रसारासाठी आपल्या संस्थेची स्थापना केली होती. त्यांचे कार्य लवकरच लोकप्रिय झाले. पंजाब व उत्तर हिंदुस्थानात त्यांच्या शाखा निघाल्या.

पंडित सातवळेकर रविवारी आर्य समाजात प्रवचनासाठी जात, त्यावेळी फोटो काढून घेण्यासाठी जे ग्राहक स्टुडिओवर येत त्यांच्याशी बोलण्यासवरण्याचे काम शंकरलाच करावे लागे. ग्राहकांशी कसे वागावे ही कला त्यामुळे त्याला स्वाभाविकपणेच जमत गेली. सोनबांची परवानगी घेऊन त्यांच्या फोटोग्राफिक स्टुडिओची जाहिरात तेथल्या *'ट्रिब्युन*' या इंग्रजी वर्तमानपत्रामध्ये द्यायला शंकरने सुरुवात केली. पंजाबमध्ये गोषांची चाल असल्याने स्वत:च्या कुटुंबाचे फोटो काढून घेण्यास लोक कचरत. तथापि सातवळेकरांची लाहोरमधील प्रतिष्ठा समाजात मोठी होती. आपले दक्षिणी लोक विश्वासाला पात्र ठरल्यामुळे फोटोग्राफीचा धंदा खूप वाढला.

धोपटमार्गापेक्षा काहीतरी नाविन्य काढण्याच्या शंकरच्या स्वभावामुळे फोटोग्राफीच्या मासिकांतून वाचून शंकरने 'पंजाब कॅमेरा क्लब' सुरू केला हौसेने फोटो काढणाऱ्या मंडळींनी एकत्र यावे, निवडक फोटोंचे प्रदर्शन भरवावे, परस्परांचा परिचय व्हावा, स्नेहसंबंध जुळावे हे त्यांचे उद्दिष्ट होते. ते सातवळेकर स्टुडिओच्या प्रसिद्धीला पोषक होते; पण स्थानिक लोकांत त्याचे स्वागत झाले नाही. मात्र विलायतेच्या फोटोग्राफिक मासिकात ही बातमी आल्यावर इंग्लंड, अमेरिका,
ऑस्ट्रेलिया अशा दूरच्या देशांतून इतकी पत्रे येऊ लागली, की त्यांना उत्तरे देणेच पंचायतीचे झाले.

ह्या खटाटोपात शंकरला सचदेव हा मेडिकल कॉलेजचा विद्यार्थी मित्र मिळून गेला. तो अँबाटाबादला राहणारा. एकदा त्याच्या गावी जाऊन सरहद्दीवरील निसर्ग पाहण्याचा आग्रह सचदेव सारखा करीत होता. शेवटी मुष्किलीने सोनबांची परवानगी मिळविली आणि शंकर प्रवासाच्या तयारीला लागला.

लाहोर सोडताच प्रथम रावी नदी व पुढे चिनाब व झेलम नद्या गाडीने ओलांडल्यावर अटक स्टेशन आले. मराठ्यांनी ज्या अटकेपार आपले घोडे नाचवून दिगंत कोर्ती मिळवली, त्या अटकेच्याहीपुढे शंकर निघाला. तिथले स्टेशन म्हणजे गढीसारखे मजबूत. लुटारूंचा तेथे सुळसुळाट फार. ते कुठल्या स्टेशनवर किंवा गाडीवर कोणत्यावेळी हल्ला करतील त्याचा नेम नसे. रावळपिंडी मागे टाकून रात्री ११॥ ला हसन अबदल या स्टेशनवर उतरून पुढे अबाटाबादचा तीस मैलांचा प्रवास टांग्याने करायचा होता. तिकडे जाणारे दोन उतारू भेटले. तिघे टांगा ठरवून रस्त्याला लागले. सगळीकडे गडद अंधार, शुकशुकाट, आकाशात उत्तरेस ध्रुव व भोवती फिरणारे सप्तर्षीचे तारे दिसत होते. प्रवासी गुपचूप बसले होते; पण टांगेवाला गप्प नव्हता. तो हातातल्या चाबकाची काठी निरनिराळ्या दिशांकडे वळवून, 'परवा इथे पठाणाचा मुडदा पडला.' तिथे अमक्याला लुटलं, तर तमक्याची बायको पळवली'' असे सांगत होता; पण तसल्या भयाण ठिकाणी त्या गोष्टी ऐकताना शंकरच्या छातीचे ठोके जोरजोराने पडू लागले. अखेरीस पूर्वेकडील आकाश उजळू लागल्यावर प्रवाशांच्या जिवात जीव आला. पहिला मुक्काम हरीहर येथे झाला. टांग्याची घोडी तेथे बदलली. पुढे सगळीकडे हिरवीगार शेती. आकाशाला लटकवल्यासारखे सभोवताली पहाड. नवाच्या सुमाराला अँबाटाबाद आले. शंकरचा मित्र सचदेव व त्याचा भाऊ त्याची वाट पहात होते. त्यांना विलक्षण आनंद झाला.

Hits: 99
X

Right Click

No right click