चित्रकलेचे प्रेम - २
त्याकाळात लोक प्रवास फार थोडा करीत. ''परमुलुखात जायचे कसे काय?'' हा विचार न करता तो तयार झाला, कारण चित्रकला शिकण्यासाठी जगाच्या दुसर्या टोकाला जायची सुद्धा त्याची तयारी होती.
सतत अडतोस तासांच्या प्रवासाने शंकर अगदी थकुन गेला. त्यात उत्तर हिंदुस्थानच्या थंडीने त्याची पुरती परीक्षा घेतली. लाहोर स्टेशनवर नारायणराव वीरकर त्याला उतरून घ्यायला आले. त्यांच्यासह टमटममधून जाताना महाराष्ट्रापेक्षा तिथला सारा देखावा व वातावरण अगदीच भिन्न होते. सगळीकडे दाढीवाले मुसलमान, बुरखा घेतलेल्या स्त्रिया; पण सर्वांचे हाडपैर मोठे, रंग गोरा, कौलाची घरे नाहीत. घरी पोचले, सोनबांचे बिऱ्हाड माडीवर हाते. सोनबा आणि त्यांच्या पत्नी सरस्वतीबाई यांनी शंकरचे हसत मुखाने स्वागत केले. घरची चौकशी केली. व त्याला दूध दिले. शंकरच्या आधी थोडे दिवस वीरकर सोनबांच्याकडे फोटोग्राफी शिकायला आले होते. त्यांच्याच खोलीत आणखी एक चौपाई टाकून शंकरची सोय लावण्यात आली. तिसऱ्या मजल्यावर फोटो काढण्याचा स्टुडिओ आणि डार्करुम होती.
दुसऱ्या दिवशी शंकरचे शिक्षण रीतसर सुरू झाले. त्याच्याप्रमाणे रुपकिसन व गुरुदत्त असे आणखी दोन विद्यार्थी तळमजल्यावरील वर्गात येत होते. प्रथम चारकोल आणि जलरंगाची चित्रे काढण्याचे धडे शंकर घेऊ लागला. पुढे तैलरंगात (ऑईलकलरमध्ये) निसर्गचित्रे काढण्यासाठी त्याला एक स्केचिंग पेटी घेऊन देण्यात आली. तेव्हा त्याच्या अभ्यासाला खरा हुरुप चढला. कारण चित्रित करायचा देखावा पहात, कुंचल्याचे भराभर तडाखे देऊन ते दृश्य फलकावर उतरवताना जो आनंद वाटे तो खरोखर अवर्णनीय असे. त्यात वेळ कसा जायचा याचा पत्ताही लागायचा नाही. एकदा शहराबाहेर शंकर असे चित्र काढीत असता त्याला वेळेची शुद्ध राहिली नाही, त्यामुळे घरी परतायला फार उशोर झाला, म्हणून सोनबा आणि सरस्वतीबाई मोठ्या काळजीत पडले.
सोनबा म्हणायचे, ''ज्याला उत्कृष्ट चित्रकार व्हायचे असेल त्याने डोळ्याला दिसेल त्या वस्तुचे अगर व्यक्तींचे पेन्सिलीने झटपट चित्र काढायला शिकले पाहिजे.'' त्यांनी कुत्रे, झाडाची फांदी, रस्त्यावचचा ओझेवाला अशी रेखाटने एक-दोन मिनिटात करून दाखविली, म्हणजे त्यांचे विद्यार्थी चकित होत असत.
पंडित सातवळेकर नुसते चित्रकारच नव्हते; तर वैदिक वाडमयाचे गाढे अभ्यासू व अभिमानी होते. त्यामुळे ते आर्य समाजाचे मोठेच आधारस्तंभ मानले जात. वैदिक धर्माचा पुरस्कार करणारे अनेक लेख व पुस्तके त्यांनी लिहिली होती. रात्रोचे जेवण झाल्यावर ते शंकरला उपनिषदाची सूत्रे समजावून सांगत. त्यात गोवलेले विचार मोठे तेजस्वी व स्फूर्तिदायक असत. तथापि हे विचार परमेश्वराच्या मुखातून बाहेर पडले असे मानायला शंकरच चिकित्सक मन तयार व्हायचे नाही.
स्वामी दयानंद सरस्वतींनी लिहिलेले, 'सत्यार्थ-प्रकाश' हे पुस्तकही शंकरने वाचून पाहिले. त्यांनी परधर्मीयांना सडेतोड उत्तरे दिली होती; पण धर्मग्रंथात किती उदात्त तत्त्वे आहेत यापेक्षा लोक त्या तत्वांचे आचरण प्रत्यक्ष व्यवहारात कसे करतात, यावरूनच त्या धर्माची प्रतिष्ठा ठरणार असते. आपल्या समाजात बोकाळलेला जातीभेद, अस्पृश्यता, विधवा स्रियांच्या बाबतोत अमानुषपणा व अनिष्ट रूढी ह्या सर्व दूर झाल्याशिवाय धर्माची थोरवी कोणापुढे मिरविणे योग्य होणार नाही असे शंकरला त्याही वयात वाटत असे.
Hits: 86