चित्रकलेचे प्रेम - १
दुसरी टर्म पार पाडल्यावर शंकर परीक्षसाठी मुंबईस गेला. स्वत:वरील जबाबदारीची जाणीव होऊ लागल्याने शंकरने अभ्यासाकडे जास्त लक्ष दिले होते.त्याचे पहिले दोन पेपरही चांगले गेले. तिसर्या दिवशी मात्र इतिहासाच्या पेपरची त्याला धाकधुक वाटू लागली परीक्षेच्या मंडपाकडे जाण्यासाठी ग्रँट रोड स्टेशनवर- लोकलमध्ये बसून मरिन लाईन्सला उतरायचे; पण काहीतरी निमित्ताने घरातून निघायला उशीर झाला तथापि धावत धावत ग्रॅंट रोड स्टेशनमध्ये आलेल्या लोकलमध्ये तो चढला, पण ती गाडी मरिनलाईन्सला न थांबता पुढे कुलाब्याला गेली. भांबावलेला शंकर मरिन लाईन्सला कसा आला, मंडपात जाऊन त्याने पेपर कसा लिहिला की नाही, याचा पत्ता लागला नाही. तो मुंबईहून सोलापूरला परत आला ते परीक्षेची गाडी चुकली हे पक्क ओळखूनच.
थोड्याच दिवसात तो पुन्हा हैद्राबादला गेला त्यावेळी देऊसकरांच्याबरोबर सोनबा सातवळेकरही त्याला तेथे भेटले ते दोघेही स्कूल ऑफ आर्टचे समकालीन विद्यार्थी. अलीकडं सातवळेकर मात्र आर्य समाजाच्या चळवळीत अधिक लक्ष घालू लागले होते. 'वैदिक- धर्माची तेजस्विता' या त्याच्या लेखामुळे ते राजद्रोहाच्या खटल्यात सापडले होते त्यामुळे त्यांना हैद्रावाद सोडावे लागले. पुढे देऊसकर पेटिंगचे अधिक शिक्षण घेण्यासाठी इटलीला रवाना झाले.
या दोघा चित्रकारांच्या इतक्या जवळ रहावयाला मिळाल्यावर शंकरच्या कलाप्रेमाला जोराची भरती आल्यास नवल काय? देऊसकराना हैद्राबादचे राजे निजामसाहेब आणि सर सालारजंग यांची मोठमोठी चित्रे काढण्याचे काम मिळाले होते. डाव्या हातात रंगाची पॅलेट व उजव्या हातात ब्रश घेऊन त्यांचे चित्रकाम सुरू झाले म्हणजे ते पाहण्यात शंकर तल्लीन होऊन जाई त्यांच्या उत्तोजनाने शंकरने काही चित्रे काढून त्यांना दाखवली, त्यांनी त्याचे फार कौतुक करीत म्हटले, "शंकर! तृ इतको चांगली चित्रे काढतोस, तू आर्टिस्टच (चित्रकारच) का होत नाहीस? ''
एखाद्या धरणाचे पाणी दार वर उचलताच मोठ्या वेगाने कालव्यात शिरते त्याचप्रमाणे देऊसकरांच्या वाक्याने आपण चित्रकारच व्हायचे या एकाच दिशेने शंकरच्या मनाची दौड सुरू झाली. शंकरने बाबांना आपला निश्चय पत्राने कळविला. जगातल्या इतर वडिलधाऱ्या मंडळींप्रमाणेच शंकरचे वडील असते तर मुलाचे असले पत्र वाचून त्यांचे मस्तक फिरले असते आणि आपल्या चिरंजीवांची त्यांनी शेलक्या शब्दात खरडपट्टी काढली असती, पण त्यांचे वडील अत्यंत विचारी व शांत वृत्तीचे गृहस्थ होते. त्यांनी त्याच्या चित्रकलेच्या प्रमाचे कौतुक केले. एवढेच नव्हे, तर 'माणसाचे आयुष्य सफल व्हायचे असल्यास, एखादी कला त्याला अवश्य यायला हवी.' हे आपले मत त्यांनी शंकरला कळवून त्याच्या विचारांना त्यांनी पाठिंबा दिला. त्यांचे म्हणणे एवढेच होते, ''तुला चित्रकला आवडते तर तू तिचा अभ्यास अवश्य करावा; पण चित्रकाराचा धंदा तृ पत्करू नये. कलेपासून जो आनंद मिळवायचा तो स्वत:ची हौस म्हणून. धंदा करायचा म्हटला की स्वत:ची आवड-निवड बाजूस ठेवून, ग्राहकाच्या मर्जीप्रमाणे वागावे लागेल इतरांच्या तंत्राप्रमाणे वागणे कलावंताला फार जाचक होते!''
बाबाचे मार्गदर्शन अत्यंत योग्य होते, पण देऊसकरांच्या स्टुडिओतील कलामय वातावरणात वावरणाऱ्या शंकरच्या मनावर त्या उपदेशाचा काही परिणाम होऊ शकला नाही. बाबांनी संमती दिलो, तरी पण चित्रकलेचे शिक्षण घेण्यासाठी इटलीला पाठवावे हे त्यांनी अमान्य केले. '' आधो हिंदुस्थानात थोडा अभ्यास कर, मग पुढचे पाहू.'' असे बाबा म्हणाले. तेव्हा शंकरला वाटले, आपण लाहोरला सोनबा सातवळेकरांच्याकडे जावे. बाबांनी त्यांना पत्र पाठविले त्यावर सोनबांनी आनंदाने शंकरला शिकण्यासाठी लाहोरला बोलावले.
Hits: 105