पैशाचे झाड - ३

Parent Category: मराठी पुस्तके Category: शंकरराव किर्लोस्कर - पुस्तक Written by सौ. शुभांगी रानडे

शाळेत असताना देशभक्ती म्हणत केलेल्या पोरकटपणाचे शंकरला आता हसू यायचे. तारुण्यात आल्यावर शंकरला देशाच्या स्थितीची व पास्तंत्र्याची खरोखरची कल्पना लक्षात यायला लागली. बंगाल प्रांतात क्रांतीकारकांनी चळवळ सुरू करून काही गोऱ्या अधिकाऱ्यांचे खून केले. त्यासाठी खुदीराम बोससारख्यांना फांसावर चढावे लागले, अशा वार्तांनी शंकर व त्याचे मित्र यांच्या अंत:करणात खळबळ उडे; पण त्याचबरोबरच असाही विचार मनात येई, की एखादं दुसऱ्या साहेबाला गोळी घालून देश स्वतंत्र होईल का? खरे पाहता आपण किती दुबळे व अजागळ लोक आहो. स्वातंत्र्य मिळवायचे तर आमची स्वत:चीच सुधारणा आम्ही अगोदर करायला नको का? आपले काय चुकते ते अगोदर तपासून, आपल्या जुनाट चालीरीती आपण बदलल्या पाहिजेत. शंकरला शिवाजी महाराजांबद्दल जसा आदर वाटे, तसाच स्वामी रामदासांबद्दलही, 'यत्न तो देव जाणावा', 'केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे.' अशा आवेश चढवणाऱ्या ओजस्वी वचनांनी रामदास यांनी समाजाच्या उत्कर्षाचा राजमार्ग दाखवला, तसेच पंजाबमधील स्वामी रामतीर्थ यांनी वैचारिक क्रांती आणि व्यक्तिमत्वाचा विकास याचे राष्ट्राला बाळकडू पाजले. त्यांच्या व्याख्यानांचे भाषांतर मराठीत होऊन तो
संग्रह प्रकाशित झाला होता. ते पुस्तक शंकरला फार आवडे. क्रांतीकारक चळवळीशी सबंध असलेल्या डेक्कन कॉलेजमधील बापट नावाच्या देशभक्त विद्यार्थ्याने कॉलेजात अशीच खळबळ उडवून दिली. त्याला अटक करायला पोलीस कॉलेजात आले. त्याचा सुगावा लागताच बापट जे तेथून निसटले ते देशांतर करून बऱ्याच वर्षांनी राष्ट्राची सेवा करायला भारतात आले. हेच ते सेनापती पा. म. बापट.

शंकर कॉलेजात असताना त्याला असे समजले को, बेळगाव शहराच्या विस्तारासाठी तेथील किर्लोस्कर कारखान्याची जागा बेळगाव म्युनिसिपालटीने आपल्या ताब्यात घेतली होती आणि त्यामुळे कारखाना बेळगावहून औंध संस्थानात कुंडलरोड स्टेशनजवळ हलवला होता. त्याचा बालमित्र अंतोबा फळणीकर देखील कारखान्यात काम पत्करून कुंडलरोडला आला आहे, म्हणून नवीन ठिकाणी सुरू होणारे काम पाहण्यासाठी दोन दिवस तिकडे जाऊन येण्याचा बेत शंकरने केला.

कुंडल रोड स्टेशनवर तो उतरला तेव्हा रात्रीचे तीन वाजले होते. दुसरा कोणीही उतारू तेथे उतरला नाही. शंकरने स्टेशनवरच्या गड्याला कारखाना कुठे आहे असे विचारल्यावर त्याने पूर्वेकडे बोट केले! गाडी हलताच त्या दिशेने ओसाड माळावरून तो चालू लागला. कुत्र्यांचे जोराजोराने भुंकणे व ''कोन हाय तिकडं?'' असे दरडावलेल्या स्वरातले शब्द त्याला एक आले. त्या धिप्पाड रखवालदाराला शंकरचे नाव कळताच त्याने नेमक्या झोपडीत त्याला पोचवले. तेथे अंतोबाची भेट होताच त्या दोघांना आनंदाचे भरते येऊन दिवस उजाडेपर्यंत ते गप्पा मारीत बसले.

दिवस उजाडल्यावर अंतोबाबरोबर तो साऱ्या कारखान्यातून हिंडला. बेळगावहून आलेले जुने कामगार सोडले, तर येथे नव्यानेच घेतलेले कामगार म्हणजे त्यांच्याच वयाची, आजूबाजूच्या खेड्यांतील शेतकऱ्यांची मुलं होती. अंतोबाने त्यांची शंकरला ओळख करून दिली. सगळे खेडवळ साधे; परंतु त्यांच्याबद्दल शंकरला मात्र फार आपलेपणा वाटला. कॉलेजच्या स्वप्नसृष्टीपेक्षा हे जग किती निराळे! स्वत:च्या हाताने निरनिराळी कामे करणाऱ्या या माणसांना लिहिता-वाचता येत नसेल, त्यांची भाषा, वागणे, अडाणी व खेडवळ असले, तरी ज्या उद्योगात ती गुंतली आहेत त्याचे केवढेतरी महत्त्व आहे, असे त्याच्या मनात आले.

Hits: 91
X

Right Click

No right click