पैशाचे झाड - २
काकांनी आपल्या दवाखान्यासाठी-राहण्यासाठी एक मोठी कोठी घेतली होती. तिच्या निम्म्या भागात सुप्रसिद्ध चित्रकार आर. डी. देऊसकर यांचे बिऱ्हाड व स्टुडिओ होता. तेथे त्यांनी काढलेली सुंदर चित्रे लावलेली असत. इटलीत दोन वर्षे राहून ते कलेचे उच्च शिक्षण घेऊन आले होते. फार सरळ मनाचे व सदैव उत्साही असे ते एक कलावंत. त्यांच्या कपाटात चित्रकलेवरची पुस्तके दाटीने भरलेली होती. देऊसकर चित्रे काढू लागले की शंकर एक खुर्ची घेऊन त्यांच्याजवळ बसायचा. त्याला चित्रकलेची नाद आहे हे माहित असल्यामुळे शंकरबरोबर त्याविषयी त्यांच्या गप्पागोष्टी चालायच्या अशा वातावरणात रुक्ष अभ्यासाकडे मन कसे लागणार?
शंकरने मॅट्रिक पास होण्याची अपेक्षा सोडून दिली होती; पण रिझल्ट लागला त्यात त्याचे नाव पास झालेल्या यादीत झळकले आणि मोठ्या डौलाने तो पुण्याच्या डेक्कन कॉलेजात दाखल होण्यासाठी निघाला. सन १९०९ च्या सुरुवातीला शंकर पुणे स्टेशनवर ट्रंक, वळकटी व लगेजमधील सायकल घेऊन उतरला. त्या दिवशी टांग्याची तपासणी असल्यामुळे टांगे आले नव्हत. त्याचप्रमाणेच आणखी दोघे विद्यार्थीही स्टेशनवर उतरले. तेहो डेक्कन कॉलेजला जाणारेच होते म्हणून एका खटाऱ्यात सर्वांचे सामान घालून तिघेजण स्स्त्याला लागले.पाश्चात्य धर्तीची रचना असलेली डेक्कन कॉलेजची भव्य इमारत पाहून विद्यार्थ्यांच्या मनावर त्याचा एक विशेष परिणाम होत असे. शंकरचा सोलापूरचा जिवलग मित्र विश्वनाथ दाणीही कॉलेजात आला होता. औंधचे राजपुत्र व बेळगांवचे काही जुने मित्रही शंकरला तेथे भेटले.
सातारचे वाग्भट देशपांडे, नाथ घाणेकर, विजापुरचे देसाई बंधू, हुबळीचे गोखले, टेंबे यांचीही नतर ओळख झाली. थोड्या दिवसांनी गिरसप्पाच्या सहलीसाठी हैद्राबाद, सोलापूर, बेळगांव, मुंबई येथील सर्व नातलग मंडळी निघाली. काकांच्या कडून मिळालेल्या कॅमेऱ्यामुळे एक चांगली कला हस्तगत करण्याची संधी शंकरला मिळाली. त्या सहलीचे फोटो शंकरने नेटकपणाने घेतले, त्यामुळे सर्व स्थळांचे निसर्गदर्शन सर्वांना फोटोमधून होऊ लागले.
कॉलेजच्या मैदानात क्रिकटची प्रॅक्टिस सुरू झाली त्याच दिवशी शंकर व दाणीला कॉलेजच्या टीममध्ये घेतले. टेनिसच्या सामन्यातही शंकर ज्युनिअर चॅपियन ठरला क्रिकटची आवड असणाऱ्यांना पुण्यात एका पर्वणीचा योग आला. या खेळात जगभर नाव मिळवून अजरामर झालेले रणजितसिंह पुण्यात आल. लोकांच्या आग्रहाला मान देऊन एक मॅच खेळण्याचे त्यांनी मान्य केले. वय बरेच झालेले, अंगहो सुटलेले, तथापी मैदानात उतरल्यावर त्यांनी अशा लीलेने प्रत्येक चेंडूचा समाचार घ्यायला सुरुवात केली की तो खळ पाहणारांच्या डोळ्याचे पारणे फिटावे. त्याच्याविरुद्ध उभी असलेली शंकरची टीम म्हणज एखाद्या ढाण्या वाघापुढे उभी असलेली उंदाराची पिले.
डेक्कन कॉलेजच्या छोट्या जीवनात शंकरला क्रीडानैपुण्यात वाखाणले गेले; पण वर्गात बसले की रोमन इतिहास शिकताना स्वाऱ्या आणि सीझरची कारकीर्द डोक्यात प्रोफेसर कशाला कोंबताहेत. असे शंकरला वाटे. तीच तऱ्हा इंटिग्रल कॅलक्युलस व बायनॉमिअल थिअरमची! पण शेक्सपियरचं मर्चंट ऑफ व्हेनिस हे नाटक किंवा कालिदासाचे वेणीसंहार, रघुवंश, मेघदूत शिकताना त्यातील बहारीची वर्णने वाचताना शंकरला वाटायचे. हा कवी कालीदास होण्याऐवजी चित्रकार झाला असता तर किती बहार आली असती! आणि संस्कृतच्या वर्गात प्रोफसरांच्या व्याख्यानांची टिपणे घेण्याऐवजी शंकर त्याच्या वहीत स्वयंवराचा देखावा, यक्षपत्नीची विरहावस्था, नारदाची पुष्पमाला, इंदुमतीच्या देहावर पडताना, असे प्रसंग रेखाटीत असे.
Hits: 88