पैशाचे झाड - १
उन्हाळ्याची सुट्टी आली. शंकरचे तीन काकाही सोलापूरला आले, वर्षातून चार दिवस एकत्र येऊन ते घरगुती गप्पागोष्टी करीत बसत. एक दिवस धाकट्या काकांनी शंकरला तेथे बोलावून घेतले व ते म्हणाले, ''शंकर! तू आता मोठा होत चाललास, तेव्हा आपला पुढचा विचार तुला करायला पाहिजे. समज, या सुट्टीतच काहीतरी काम करून पोटापुरते पैसे मिळवायला आम्ही तुला सांगितले, तर तू काय करशील?''
असल्या विचित्र प्रश्नाला काय उत्तर द्यायचे असा विचार करताना मनात एक कल्पना येऊन शंकर म्हणाला, ''त्यात काय मोठंस! फोटो काढून मला हवे तितके पैसे मिळविता येतील!'' सारेजण त्याच्याकडे पाहून हसू लागले! पण बाबा म्हणाले,
''मग दाखव तू किती पैसे मिळवतोस ते! ''
''दाखवीन! पण त्यासाठी सामान लागेल व अंतोबा माझ्या बरोबर पाहिजे.''
ती मंजुरी ताबडतोब मिळाली. सुट्टी होताच त्यांची दुक्कल फोटोच्या सामानाने भरलेल्या ट्रंकसह हुबळीच्या वाटेला लागली. तिथे शंकरचे मामा होते. त्यांना शंकरचा हेतू समजताच ते म्हणाले, ''शहाणेच दिसता तुम्ही दोघेजण! पैसे असे झाडाला लागलेले असतात अशी तुमची कल्पना आहे काय?''
तो अनुभव दोघांनाही यायला उशीर लागला नाही. अंतोबाच्या गळ्यात कॅमेऱ्याची पिशवी व शंकरच्या हातात कॅमेरा ठेवण्याचे तिपाटणे असे दोघे गिऱ्हाईकांच्या शोधार्थ दिवसभर भटकायचे! पण सगळीकडे नकारार्थी उत्तर. असे आठ-दिवस गेले. दोघांची निराशा वाढत चालली. तितक्यात एक कल्पना शंकरच्या डोक्यात चमकली. तो अंतोबाला म्हणाला, ''उचल कॅमेरा! थोड्याच वेळात दोघे हुबळीतील मराठी शाळेजवळ आले. तिथल्या फाटक नावाच्या मास्तरांशी शंकरची पूर्वीची ओळख होती. त्यांना शंकर काढलेले, फोटो दाखवले व म्हणाला, ''तुमच्या वर्गातील मुलांना प्रत्येकी दोन पैसे आणायला सांगाल, तर त्यांचा व तुमचा मिळून एक छान फोटो मी काढून देईन!'' ही गोळी बरोबर लागू पडली. त्या फोटोने शाळेत खळबळ उडवून दिली. तो फोटो पाहताच शाळेत जणू फटाक्याची माळ लागली. त्या शाळेतले सर्व वर्गांचे फोटो काढून झाल्यावर दोघेजण दुसऱ्या शाळेकडे वळले मग ऑर्डरीना तोटा उरला नाही. त्यांच्या धंद्याला एकदम तेजी आली. खिशात पैसे खुळखुळू लागले. ते रोज पुन:पुन्हा मोजून पाहायचे. सारी रक्कम ऐंशो रुपये झाली तेव्हाचा आनंद काय वर्णावा? पैज जिंकली. हुबळी सोडताना शंकर मामाना म्हणाला, '' तुम्ही आमची थट्टा केलीत; पण आम्हाला सापडलं की नाही पैशाचं झाड?''
त्यांच्या या यशस्वी दौऱ्याचे सर्वांनी अर्थात कौतुक केले, पण त्याचा सर्वांत मोठा फायदा अंतोबाला झाला. त्याचे विशेष शिक्षण वगैर झालेले नव्हते. त्यामुळे हुबळीत फोटोग्राफीचे शिक्षण घेण्याची जी संधी त्याला मिळाली, तिचा उपयोग करून त्यानेही आजऱ्याला फोटोग्राफी सुरू केली. काकांनी त्याला एकदा नांगराचे फोटो काढून देण्यास सांगितले व त्याची हुशारी पाहिल्यावर त्याची कारखान्यातच फौंड्रीमनच्या जागेवर नेमणूक केली.
मॅट्रिकची परीक्षा जवळ येत चालली तेव्हा शांतपणे अभ्यास कणण्यासाठी शंकर हैद्राबादचे काका डॉ. गंगाधरपंत किर्लोस्कर यांच्या घरी गेला. त्यांच्या पत्नी सौ. काशीबाई या शंकरच्या मावशीही होत्या. दुहेरी नात्याने-म्हणून हैद्राबादला जायला तो एका पायावर तयार असायचा.
Hits: 77