पहिली जाहिरात
याच सुमारास शंकरला हवा तसा एक सोबती मिळाला - अनंत फळणीकर- त्याच्याच वयाचा. काकूंच्या माहेरी प्लेगच्या साथीत घरातली करती सवरती माणसे दगावली, म्हणून अंतोबाची आई आपली दोन मुले घेऊन मुलीकडे जावईबुवांच्या आश्रयाला आली. अंतोबा फार हुशार आणि शरीराने दणकट. मोठ्या माणसासारखे तो पाणी काढणे, लाकडे फोडणे असली कामे करायचा. शंकरने त्याला सायकलवर बसायला शिकवले आणि अंतोबाने शंकरला पोहायला शिकवले.
शेजारच्या झोपडीत शनिवारी शनिमहात्म्य पोथीचे वाचन व्हायचे. त्यातील भिंतीवरील हार हंसाने गिळणे, कलींगडाची शीरकमळ होणे असले अद्भूत प्रकार ऐकून शंकरचा त्यावर विश्वास कसा बसणार? शनि हा एक ग्रह आहे. त्याच्याभोवती असलेले कडे हे त्याचे वैशिष्ट्य आहे, हे तर सोलापूरच्या बाबांनी दुर्बिणीतून दाखवलेच होते ना! लाखो मैल दूर असलेल्या ग्रहाचा आपल्यावर बरा-वाईट कसला संबंध? या भाकडकथांवर मोठी माणसे कशी विश्वास ठेवतात असा शंकरला प्रश्न पडे.
एक दिवस बातमी समजली की, काकांची बढती होऊन त्यांची डेप्युटी एज्युकेशनल इन्स्पेक्टर या पदावर विजापुरास बदली झाली आहे. शंकरच्या डोळ्यांत एकदम पाणी उभे राहिले. त्याची बेळगांवची ३ वर्षे केव्हा गेली हे त्याला कळलेच नाही. काका-काकू, लहान भांवडे, अंतोबा-ठळक वाडीतील न्हाव्याची मुले, शाळेतील मित्रमंडळी, साठे, नरगुंदकर या सर्वांना सोडून परत सोलापुरास जायचे शंकरच्या खरोखर जिवावर आले. पण तशाच जड मनाने सर्वांचा निरोप घेऊन त्याने बेळगांव सोडले.
सोलापूरच्या नॉर्थकोट हायस्कूलच्या चौथ्या इयत्तेतील विद्यार्थी म्हणून १९०४ साली शंकरची सुरुवात झाली. सोलापूर अठरापगड जातीचे गाव, त्यामुळे शंकरच्या मित्रात हिंदु, मुसलमान, पारशी, लिंगायत, जैन असा भरणा असे. सर्वांशी त्याचे सारखेच सख्य.
सोलापुरात येऊन थोडे दिवस झाले नाहीत तोच देशात स्वदेशीच्या चळवळीचा जोर वाढत चालला. ह्या सुमारास लोकमान्य टिळक सोलापुरात येणार असल्याचे समजताच विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे विलक्षण वातावरण पसरले. सिद्धेश्वराच्या देवळापुढील पटांगणात त्यांचे जाहीर व्याख्यान होणार असल्याचे कळले; पण शंकरच्या शाळेचे हेडमास्तर पडले दांडगे राजनिष्ठ पण या व्याख्यानाला काही विद्यार्थी गेलेच व ते दुसऱ्या दिवशी त्याबद्दल एकेक रुपया दंड भरून वर्गात आले; पण या शिक्षेचे उट्टे कसे काढावे हे त्यांचे विचार चालू राहिले. त्यांच्या अंगात स्वदेशीचे वारे चांगले भरले व स्वदेशीची गाणी ते गाऊ लागले.
परदेशी व्यापारी आमच्या देशास लागल्या जळवा
शोषुनी रक्तची घेतो त्यास बहिष्कार साधने पळवा
स्वदेशीच्या प्रचारासाठी शंकरने एक खास युक्ती काढली.
''सद्गृहस्थ हो! स्वदेशी माल वापरा.''
''स्वदेशी माल वापरणारा देशभक्त, न वापरणारा देशद्रोही.''
'इंग्रजांची हकालपट्टी करण्यासाठी स्वदेशी वापरा.''
अशा मजकुराच्या पुष्कळ चिठ्ठ्या विद्यार्थ्यानी लिहून काढल्या आणि संध्याकाळ झाल्यावर रस्त्यावरून जाणाऱ्या माणसांच्या हातात त्या गुपचूप देऊ लागले; पण या गडबडीत एक चिठ्ठी मास्तरांच्या हातात पडली, त्यांनी शंकरचे अक्षर ओळखले. त्याचे बक्षिस दुसऱ्या दिवशी वर्गात त्याच्या हातावर उमटवले.
शंकरचे वडील रिपन हॉल क्लबचे सभासद असल्याने त्यांच्याच नावावर वाचनालयातील चांगली चांगली पुस्तके वाचायला मिळत, त्यामुळे वर्गातल्या पुस्तकांपेक्षा शंकरचे बरेच अवांतर वाचन होई. इंग्रजी चवथीतला मुलगा इंग्रजी मासिके वाचतो ही गोष्ट खरी वाटणार नाहो, पण भाषेची पूर्ण ओळख चांगल्या गुरूकडून झाल्यावर भराभर प्रगती करणे सोपे जाते. या वाचनाने जगाविषयी शंकरच्या सर्वसामान्य ज्ञानातही पुष्कळ भर पडली.
यानंतर शंकरच्या शाळेचे गॅदरिंग करायचे ठरले. शंकरला सेक्रेटरीपद मिळाले. सर्वांकडून पाठिंबा असल्याने संमेलन खूप धडाक्याने पार पडले. शेवटचे आकर्षण पुण्याचे प्रसिद्ध नकलाकार भोंडे यांच्या नकला होत्या. त्यांनी प्रथम बावळट विद्यार्थी, रॅंगलर परांजपे, अशा काही नकला केल्या. कुजबुज सुरू झाली. तोच पडदा वर गेला आणि लोकमान्य टिळकांची स्वारी सर्वांना दिसली. त्यांचे स्फृर्तिदायक भाषण झाले आणि टाळ्यांचा कडकडाट. पण पुढच्या रागेतील एक व्यक्ती दोन्ही हाताने डोके धरून खाली पाहत राहिली होती. ते होते शंकर व मित्र यांना दंड करणारे हेडमास्तर.
बेळगावला असताना धाकट्या काकांकडून बक्षिस मिळालेला क्लिटो कॅमेरा आतापर्यंत तसाच धूळ खात पडला होता. आता कुणाजवळ तरी फोटोग्राफी शिकून त्याचा वापर करावा असे शंकरच्या मनात वरचेवर येऊ लागले. फोटोग्राफी जमली तर लहान- थोरांचे फोटो काढता येतील, प्रवासातील दृश्ये टिपून घेता येतील असे शंकरला वाटले. फोटोग्राफी हा आता पोरखेळ झाला आहे; पण ९० वर्षापूर्वी तिची माहिती असणारे लोक फार थोडे होते आणि तेही आपले ज्ञान लपवून ठेवीत. तरीपण अण्णा टिकेकरांनी सोलापुरातील प्रमुख फोटोग्राफर केशवराव दिवेकर यांची शंकरला ओळख करून दिली. केशवरावांच्या हाताखाली काम करू लागल्यावर शंकरने फोटोग्राफीची इंग्लिश पुस्तके व मासिकेही वाचण्यास सुरुवात केली व आपल्या क्लिटो कॅमेऱ्याने शंकर फोटो घेऊ लागला हे पाहून केशवरावांनी पट्टशिष्याचे कौतुक केले.
मराठी मासिकांमध्ये व्यंगचित्रे काढायची सुरुवात शंकरराव किर्लोस्कर यांनी केली आणि विनोदांमधूनसुद्धा वाचकांना सुधारण्याची संधी मिळू शकते.