चाफेकर नि रानडे यांजवरील फटका - २
चाफेकर नि रानडे यांजवरील फटका -२
(जाति : स्वरगंगा)
हां हां म्हणता क्षणाभीतरीं असंख्य गवसति काळ-करीं ।
अुदास दुःखित जनांस छळुनी न्यायाची पर राळ करी ॥ १
प्रेताजवळी गिधाड धडके जसा त्वरेने धावतसे ।
भुतावलीसम मृतालयाते सोजिरगण हा पावतसे ॥ २
क्रौयें अुद्धत शुद्ध भैरवचि मद्यधुंदिने धुंद सदा ।
आप्तवियोगें युक्तजनातें सक्त भाषणें छळति तदा ॥ ३
प्लेग मृताते असो वा नसो वसोच परि धनि अटकावी ।
शिरा घरामधि करा लूट हो कोण तुम्हांला हटकावी ॥ ४
हवे ते गृही सवेच शिरती धन्या पकडती हे वरती ।
हव्या वस्तुते लुबाडोनिया निरंकुशत्वे वावरती ॥ ५
जया मंदिरी पाय टाकिता म्लेंच्छ तच्छिरा छाटविती ।
हा! हा! अुद्धट सोजिर त्यांसी डोळ्यादेखत बाटविती ॥ ६
पतितव्रतांते कुठे गाठुनी बाटविती हे हाय! अरे! ।
अधमाधम हो! काळ स्थिर नसे सव्याज मुद्दल देअु बरें ॥ ७
आर्या छळिता खुशाल माता तुम्हांस आता माज चढे ।
परंतु होता प्रकट नृसिंहहि लपाल जंबुक कुणीकडे ॥ ८