चाफेकर नि रानडे यांजवरील फटका - ९
चाफेकर नि रानडे यांजवरील फटका - ९
छळित परोपरि गरिब जनांला म्लेंच्छ पुनरपी या समया ।
तया भिउनिया स्वये सांगती जन-माया जनकासमया ॥ १
'सूड अुगविण्या प्रिय बंधूंचा द्रविडवधाला करणारा ।
वासुदेव तो मीच होय जो सज्ननछलना हरणारा ॥ २
मित्रालागी लागोपाठी गाठी द्रविडा अधमाला ।
मीच रानडे सुमित्रापुढे कस्पटसम मत्प्राण मला' ॥ ३
न्याय-नाटकी थाट अुडाला वाटना मिळे रतिभर ती ।
मूर्ति मनोहर अवलोकुनिया जनकुतूहला ये भरती ॥ ४
चकित टकमका सर्व पाहती धन्यचि छाती मग म्हणती ।
कुणी धाडसी, कुणी पिसे वा कुणी वीरवर त्यां गणती ॥ ५
फाशी ठरली तरी न फिरली देशहिताची दृष्टी ती
राजकीय कट संबंधाला मुळी न थारा ते देती ॥ ६
धन्य जाहला येरवड्याचा तुरुंग सज्ननसंगतिने ।
शतनमनें त्या कालगतीला भला भरविला रंग तिने ॥ ७
फाशी चढती प्राणपाखरू देहपिंजऱयातुनी अुडे ।
वीर कृतीने राष्ट्रामाजी पराक्रमाचे तेज चढें ॥ ८