चाफेकर नि रानडे यांजवरील फटका - ८

Parent Category: मराठी पुस्तके Category: स्वातंत्र्यवीर सावरकर समग्र कविता Written by सौ. शुभांगी रानडे

चाफेकर नि रानडे यांजवरील फटका - ८

द्रवीड कोपे दाह होतसे ज्वाला नेत्रांतुनि सुटती ।
लाही झाली दाहि दिशाते 'सूड' अक्षरें हीं अुठतीं ॥ १

करकर चावी अधर, चोळितो करांसि, निश्चल पळ बसला ।
'सूड' शब्द कर्णात गुंगतो, वासुदेव मग स्मित हसला ॥२

बोले, 'मत्ता मशका, दुखवुनि सिंह सुटाया धडपडशी ।
यमनगरीला बदली करितो अचल जलद चल तव पडशी ॥ ३

चिरुन तुझ्या देहास करिन शतखंड पुन्हाही विखंड हा ।
दंडम रेड्या डंवचळलासी, गड्या, व्याघ्र त्वा प्रचंड हा ॥ ४

सत्यदेश-हितकर्ता जो का, चोरा, छळिलें त्या थोरा ।
अधम कृतघ्ना, लाच खाअुनी जाहलासि मम भाग खरा' ॥५

श्रीचाफेकर तसे रानडे मित्र परस्पर ते होते ।
द्रविड-होम-निश्‍चया ठरवुनी उभय जाहले मग होते ॥ ६

अधम-शांति-सिद्ध्यर्थ बांधिले धाडस कंकण शुद्ध सदा ।
स्नेहबांधवप्रेमा क्रत्विज्‌ चपल असिलता दर्भ तदा ॥ ७

कोप-हुताशन भडाड भडके द्रवीड पूर्णाहुति पडे ।
झालें अवभूथस्नान रुधिरजलि घोर प्रतिज्ञासिद्धि घडे ॥ ८

Hits: 85
X

Right Click

No right click