चाफेकर नि रानडे यांजवरील फटका - ६
चाफेकर नि रानडे यांजवरील फटका - ६
(जाति : स्वरगंगा)
'फितुर' 'फूट' ही दुष्ट जनांच्या पाट्यावरती पूज़ियली ।
नष्ट अक्षरें कष्टमय जिहीं राष्ट्रदेवि बहु गांजियली ॥ १
द्रवीडबंधु द्वाड श्वान जे स्वोदरपूर्तिस्तव नाना ।
चार आचरिति फितुरि कराया शरम वाटली यांना ना ॥ २
देशासाठी झटति शूर जे, पकडुनी द्याया नरवर ती ।
सिद्ध होअुनी अनर्थकारी दहा सहस्त्रा सावरिती ॥ ३
सकळांच्या डोळ्यांत येउनी प्राणकंटका वरि धरिला ।
वरिला रे फायदा काय तरि नित्य अकीर्ति-ध्वज पुरला ॥ ४
छळक छळ करी परी मजा की वरी कीर्ति जो छळलेला ।
चाफेकर यश-यत्न झळकवी द्रवीड अंध:कार भला ॥५
श्री चाफेकर त्वरे अटकले फरासखान्यामाझारी ।
तदा अंतरी करिति विचारा, 'कबूल व्हा धडगती तरी ॥ ६
ज्याच्यासाठी प्राणसंकटी लोटियलें म्या अठाअुठी ।
कठिण काळ मद्देशबंधुजन मत्कृत्यां तव कां कंठी? ॥ ७
सज्जन संघावरी कोसळति दु:खाद्रीचे थोर कडे ।
दहा जणांच्या हितार्थ जावू एक काय मग त्यांत नडे!' ॥ ८