चाफेकर नि रानडे यांजवरील फटका - ५
चाफेकर नि रानडे यांजवरील फटका - ५
(जाति : स्वरगंगा)
आजवरी किति तरी मारिती म्लेंच्छ मदाने वदा प्रजा ।
सजा न त्यांना मुळी होय हे न्यायदेवते काय मजा ॥ १
परी पहा तो राजदूत ना प्लेगदूत जनछळ करितो ।
भरितो प्रायश्चित्त ठीक जै कोण कोप हा पर धरितो ॥ २
योग ईश्वरी किंवा रँडचि दृढसंकल्पी खरा असे ।
पिसें करितसे मेल्यावरही होत सळो का पळो असे ॥ ३
पिसाळलें 'सरकार' खुनाने वसकन् डसलें भल्या भल्या ।
भल्या अर्पिल्या सुमनांजलि ज्या शतकोशतकी न लाभल्या ॥ ४
कधी फडकले जादा पोलिस, कधी पकडलें नातूंना ।
जली स्थली त्या दिसू लागला रॅडवधासह तो 'पूना' ॥५
देशवीर महाराज शूर श्री टिळक तयांचें क्षेम असो ।
खरा हिरा हा कसासि अुतरे काळभीति 'बाळा'सि नसो ॥ ६
सायंकाली सवे चमकती बहुत काजवे आणि शशी ।
तशाच न्याये टिळक-सुधाकर ठरत तोलता इतरांशी ॥ ७
रणांगणावरि खरे राहतील कितीक ठोकुनि दंड खडे ।
तसेच असती देशद्रोही कवण तोहि उलगडा पडे ॥ ८