मलयाळम् भाषा

Parent Category: भाषांतर Category: इतर भारतीय भाषा Written by सौ. शुभांगी रानडे

Following article is small part of language information article. Pleae refer to https://vishwakosh.marathi.gov.in for font images, complete article and info about literature in this language.

द्राविडी भाषासमूहातील मलयाळम् ही केरळ राज्याची राज्यभाषा आहे. भारतीय राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीतही या भाषेचा समावेश आहे. १९७१ च्या जनगणनेनुसार मलयाळम् भाषकांची संख्या १,७०,१५,७८२ आहे. मलयाळम् भाषकांनी व्यापलेला प्रदेशही पांगलेला आहे. भारतात केरळ व इतर भागांव्यतिरिक्त मलयाळम् भाषक अंदमान, इराण, आखाती देश, नायजेरिया, मलाया व जगातील इतर अनेक भागांत पसरलेले आहेत.

द्राविडी भाषासमूहात मलयाळम् ही महत्वाची वाङ्‌मयसमृद्ध भाषा आहे[⟶ द्राविडी भाषासमूह]. द्राविडी भाषासमूहात ज्या भाषांना अनेक शतकांची प्राचीन वाङ्‌मयीन परंपरा आहे अशा प्रमुख भाषा म्हणजे तमिळ, कन्नड, मलयाळम् आणि तेलुगू. एकाच भाषासमूहातील या चार भाषांपैकी तमिळमध्ये बरेच प्राचीन असे वाङ्‌मय आहे. यांतील सर्वांत प्राचीन ज्ञात असे लेख इ.स.सु. दुसऱ्‍या-तिसऱ्या शतकापासून आढळतात. केरळच्या पूर्व व दक्षिण सीमेवर मलयाळम्‌चा तमिळशी संपर्क येतो. तसेच उत्तर व ईशान्येकडे तिचा कन्नडशी संपर्क येतो. मलयाळम् ही तमिळची भगिनी आहे, कन्या आहे, बोली आहे, की द्राविड भाषासमूहापैकी स्वतंत्र भाषा आहे, याबद्दल विद्वानांत एकमत नाही.पण या वादविवादात न शिरता येथे सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे दोन गोष्टींबद्दल सर्वांचे एकमत आहे. एक म्हणजे तमिळ व मलयाळम् यांत फार सारखेपणा आहे आणि दुसरे म्हणजे मलयाळम् ही आजतरी एक स्वतंत्र भाषा आणि तमिळची भगिनीही मानली जाते. प्राचीन शिलालेखांतील पुराव्यांवरून मलयाळम्‌ची प्राचीनता दहाव्या शतकापर्यंत मागे जाते. मलयाळम् तमिळपासून वेगळी झाली आणि त्या भाषेत वाङ्‌मयनिर्मितीही होऊ लागली. विशेषतः नवव्या-दहाव्या शतकांतील कोरीव लेखांवरून आणि नंतर एकोणिसाव्या शतकातील पश्चिम किनाऱ्‍यावरील कोरीव लेखांवरून ती एक स्वतंत्र भाषा मानलेली आहे असे आढळते. चौदाव्या शतकानंतर मात्र हे कोरीव लेख मलयाळम् लिपीत  लिहिलेले आढळतात. तमिळ व मलयाळम्‌मधला मुख्य फरक म्हणजे तमिळमध्ये धातूंच्या आख्यात रूपात पुरूषवाचक प्रत्यय येतात, तर सध्याच्या मलयाळम्‌मध्ये बहुतेक क्रियापदांच्या शेवटी केवळ कालनिदर्शक प्रत्यय येतात.

मलयाळम्‌चा इतिहास : मलयाळम्‌च्या इतिहासासंबंधी अनेक मते प्रचलित आहेत. इतर अनेकांच्या मतांपेक्षा ए. आर्. राजराजवर्मा     यांचा दृष्टिकोन अधिक ग्राह्य वाटतो. त्यानुसार मलयाळम्‌च्या इतिहासाचे तीन कालखंड पडतात : (१) प्रार्चीन मलयाळम्‌(८२५ ते १३२५), (२) मध्य मलयाळम्‌(१३२५ ते १५७५) आणि (३) अर्वाचीन मलयाळम्‌(१५७५ नंतर), त्यांच्या मते पुरूषवाचक प्रत्ययाचा लोप, वचन व लिंगभेद आणि अनुनासिकत्व ह्या गोष्टी प्राचीन मलयाळम्‌मध्ये दिसू लागल्या. मलयाळम्‌मधील पहिली महत्वाची साहित्यकृती रामचरित्रम्‌ ही प्राचीन कालखंडाच्या शेवटी निर्माण झाली. तीतही हे विशेष आढळतात. मध्य मलयाळम्‌ काळात स्थानिक बोलीतून सुरूवातीचे संस्कृत तद्‌भव शब्द आले पण त्याचे बाह्य स्वरूप फारच बदललेले होते. अर्थात यावेळेपर्यंत केरळमध्ये इंडो-आर्यन भाषा बोलणारे ब्राह्मण यायचे होते. नंतर इंडो- आर्यन भाषा बोलणाऱ्‍या- ब्राह्मणांच्या सहवासाने मलयाळम्‌ने काही इंडो-आर्यन शब्द घेतले [⟶ इंडो-आर्यन भाषासमूह]. मलयाळम्‌ने घेतलेले हे शब्द मुख्यतः धार्मिक चालीरीती, सामाजिक रूढी व यातू यांसंबंधीचे हे सगळे शब्द तद्‌भवच होते. नवव्या शतकापासून पंधराव्या शतकापर्यंतच्या काळात घेतलेले शब्द हे कायदा, वैद्यक, ज्योतिष यांसंबंधीचे होते. आता भाषेने तद्‌भवाबरोबरच तस्सम शब्दही आत्मसात केले. पंधराव्या शतकानंतर मात्र फक्त तत्सम शब्दच भाषेत आले. पंधराव्या शतकानंतर तमिळच्या वर्चस्वापासून मलयाळम्‌ मुक्त झाली, इतकेच नव्हे तर आर्यएळुत्तू लिपीचा वापरही मलयाळम्‌साठी होऊ लागला [⟶ वट्टेळुत्तू लिपि]. मध्य मलयाळम्‌ युगाच्या सुरूवातीला मलयाळम्‌ने पाच वैशिष्ट्ये आत्मसात केली. ती पुढीलप्रमाणे : (१) अनुनासिकत्व (नासिक्यरंजन), (२) तालव्यरंजन, (३) स्वरसंकोच, (४) पुरूषवाचक प्रत्यय गाळणे आणि (५) पुराण रूपे कायम ठेवणे.

या काळात वाङ्‌मयाचे दोन संप्रदाय होते : (१) पाट्‌टू संप्रदाय (वाङ्‌मयीन तमिळचा प्रभाव असलेला ) आणि (२) मणिप्रवाळ (संस्कृतमिश्रित मलयाळम्‌). के. एम्. जॉर्ज यांनी ‘पच्च मलयाळम्‌’ म्हणून तिसरा संप्रदाय सांगितला आहे. याला ‘ शुद्ध मलयाळम्‌’ संप्रदाय असेही म्हणता येईल. तो कोणत्याही भाषेचा प्रभाव नसलेल्या बोली भाषेला जवळचा आहे.

अर्वाचीन मलयाळम्‌ही एळुत्तच्छन (सु. सोळावे शतक) पासून सुरू होते हे सर्वच विद्वानांना मान्य आहे. के.एम्. जॉर्ज यांनी कृष्णगाथे च्या आधारे दाखवून दिले आहे, की अर्वाचीन मलयाळम्‌ ही एळुत्तच्छनच्या कित्येक दशके आधी प्रचारात आहे. पण एळुत्तच्छनने पाट्‌टू व मणिप्रवाळ या दोन शैलींच्या एकीकग्णातून वाङ्‌मयीन निर्मितीस योग्य असे नियम तयार केले.

लीलातिलकम्‌ (चौदावे शतक) हा संस्कृत भाषेत लिहिलेला मलयाळम्‌ भाषेच्या व्याकरणाचा आद्य ग्रंथ आहे. नंतर जवळजवळ सहा शतकांनी मलयाळम्‌ व्याकरणाचा महत्वाचा ग्रंथ केरळमध्ये तयार झाला तो म्हणजे केरळपणिनीयम्‌. हा ए.आर्‌. राजराजवर्मा यांचा सर्वमान्य असा व्याकरणग्रंथ. लीलातिलकम्‌नंतर कोवुण्णी नेदुड्गदी, शेषगिरिप्रभू अशा स्थानिक तसेच इतर परदेशी विद्वानांचे मलयाळम्‌भाषेवर ग्रंथ झाले.

बोली : इतर भाषांप्रमाणेच सामजिक स्तर, प्रदेश, जात व व्यवसाय यावंरून मलयाळम्‌ भाषेच्याही बोली निर्माण झाल्या. पैकी सामाजिक स्तर व जात यांवर आधारलेल्या बोली महत्वाच्या आहेत. लीलातिलकम्‌ या आद्य व्याकरणातही याचे पुरावे मिळतात. ‘उत्कृष्ट’ व ‘अपकृष्ट’ असे शब्द सुशिक्षित उच्च जाती व अशिक्षित हलक्या जाती यांच्या भाषेतील फरक दाखविणारे असून ते वरील ग्रंथात वापरले आहेत. 


इतर अनेक कारणांप्रमाणेच जात व धर्म यांमुळे भाषेत फरक पडतो व लोकांच्या भाषिक वर्तनावर त्यांचा प्रभाव दिसतो. थोडक्याच असे म्हणता येईल, की ब्राह्मणांच्या बोलीत संस्कृत शब्दांचे प्रमाण जास्त असते. तर हरिजनांच्या बोलीत संस्कृतप्रचुरता कमी प्रमाणात आढळते. ख्रिस्ती बोलीवर इंग्लिंश, लॅटिन, सिरियॅक व पोर्तुगीज भाषेतील शब्दांचा प्रभाव दिसतो. याशिवाय मलयाळम्‌ची प्रमाणभाषा व मुस्लिम बोली यांतील फरकही जाणवण्यासारखा आहे. कारण मुस्लिम बोलीवर अरबी किंवा फार्सीचा प्रभाव जाणवतो.

केरळ विद्यापीठाच्या भाषाविज्ञान विभागाने केलेल्या १९७४ च्या पाहणीच्या वृत्तांतावरून असे दिसते, की ‘ईळव’ जातीच्या बोलीच्या आधारे मलयाळम्‌चे बारा प्रमुख भाषिक प्रदेश पडलेले आहेत. ते पुढीलप्रमाणे : (१) दक्षिण त्रावणकोर, (२) मध्य त्रावणकोर, (३) पश्चिम वेग्पानाड, (४) उत्तर त्रावणकोर, (५) कोचीन, (६) दक्षिण मलबार, (७) आग्नेय पालघाट, (८) वायव्य पालघाट, (९) मध्य मलबार, (१०) वयनाड, (११) उत्तर मलबार, (१२) अन्नमलई डोंगरप्रदेश. ईळवांच्या या बारा प्रमुख बोली आणि उपप्रदेश, जाती, धर्म यांवर आधारलेले उपभेद मिळून ३२ भेद होतात.

लक्षद्वीप बेटांतील मलयाळम्‌च्या बोलीत या बेटांच्या भौगोलिक दुराव्याचे प्रतिबिंब दिसते. अरबी समुद्रातील ही बेटे मलयाळम्‌चे अवशेषक्षेत्र मानता येईल. येथील भाषिक परिस्थितीचे चित्र केरळच्या आदिवासी जमातींच्या बोलीचा नीट अभ्यास झाल्यावरच स्पष्ट होईल.

लेखनपद्धती : प्रारंभापासून दोन वर्णमाला उपयोगात आणल्या जातात. एक म्हणजे प्राचीन तमिळ किंवा मप्पिल वर्णमाला. मप्पिल लोक अजूनही तिचा वापर करतात. ‘वट्‌टेळुत्तु’ (गोलाई असलेली अक्षरे असणारी) हे तिचे नाव. दुसरा प्रकार ‘कोळेळुत्तु’ (टोकदार कोरलेली अक्षरे असणारी). राजदरबारची कागदपत्रे लिहिण्यासाठी हिचा वापर होतो. तिसरा लोकप्रिय प्रकार म्हणजे आता प्रचलित असणारी मलयाळम्‌ वर्णमाला ‘आर्येळुतु’. पूर्वी संस्कृतसाठी हिचा वापर करत आता ती सर्वत्र वापरली जाते. एळुत्तच्छन नावाच्या लेखकाने ती सुरू केली. ग्रंथ लिपीपासून ती आली (ग्रंथ लिपी म्हणजे तमिळ प्रदेशातील संस्कृत वर्णमाला.). एळुत्तु हा एळु किंवा आळू (कापणे, खोदणे) यावरून साधलेला शब्द असून त्याने प्राचीन काळची दगडावर किंवा ताम्रपटावर लेख लिहिण्याची पद्धत सूचित होते.

पदव्याकरण : ह्या भाषेच्या व्याकरणातील महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्ययांचा वापर. शब्दक्रमावरून शब्दांची व्याकरणमधील कार्ये स्पष्ट होतात. व्याकरणातील प्रमुख शब्दप्रकार म्हणजे नाम (वचन, लिंग, विभक्ती असे रूपभेद), सर्वनाम, विशेषण, संख्याविशेषण, क्रियापद (अकर्मक, सकर्मक, प्रयोजक हे उपप्रकार काळ, नकारार्थी, वृत्ती, कृदन्त असे रूपभेद) आणि अव्यय (शब्दयोगी, क्रियाविशेषण, केवल प्रयोगी हे उपप्रकार).

मलयाळम्‌मध्ये दोन वचने आहेत : (१) एकवचन, (२) अनेकवचन. वचनाचा प्रत्यय प्रथम पुरूषी, द्वितीय पुरूषी, निजवाचक सर्वनामाच्या अंगाला लागतो. -ण हा लिंगवाचक एकवचनी प्रत्यय. हा प्रथम पुरूषी, द्वितीय पुरूषी किंवा निजवाचक सर्वनामाला लागतो. उदा.- ‘ञ’-ण प्रथम पुरूष आणि ‘टा’ -ण द्वि.पु. (एकवचन)-कळ, -मार, -अर, -कार हे अनेकवचनी  प्रत्यय आहेत.

लिंग व वचन ही एकमेकांत गुंतलेली आहेत. मलयाळम्‌ची लिंगपद्धती इंग्रजीप्रमाणे अर्थानुसारी आहे. मलयाळम्‌मध्ये तीन लिंगे आहेत : पुल्लिंग, स्त्रिलिंग, नपुसकलिंग. -अण हा सर्वसाधारण पुल्लिंगाचा प्रत्यय आहे. -अळ, -इ, -च्चि हे स्त्रिलिंगाचे प्रत्यय. – टु हा नपुसकलिंगी प्रत्यय.

मलयाळम्‌मध्ये आठ विभक्ती आहेत. एकवचन व अनेकवचनासाठी सारखेच विभक्तीप्रत्यय वापरले जातात. एकवचनाचे बाबतीत बहुतांशी प्रत्यय हे विकारांगाला लावले जातात. अनेकवचनाचे बाबतीत विभक्तिप्रत्यय अनेकवचनी प्रत्ययानंतर लावले जातात.बाबतीत बहुतांशी प्रत्यय हे विकारांगाला लावले जातात. अनेकवचनाचे बाबतीत विभक्तिप्रत्यय अनेकवचनी प्रत्ययानंतर लावले जातात.

(१) प्रथमा विभक्तीसीठी कोणतेही विशेष चिन्ह नाही. (कर्ता, प्रत्यक्ष कर्म). प्रथमा बहुवचन विकारांगाला बहुवचनी प्रत्यय लागून तयार होते. उदा.,-‘कुट्टि’-मूल (ए.), ‘कुट्टिकळू’ – मुले (बहु.). (२) जी विकारांगे व्यंजनान्त असतील त्यांना-ए प्रत्यय लागून द्वितीया विभक्ती तयार होते. स्वरान्‍त नामांना विभक्तिप्रत्ययापूर्वी- य लावला जातो. विभक्तिप्रत्ययापूर्वी-इण हा एक दुवा जोडला जातो. उदा., ‘मकण्-ए’ (मुलाकडून), ‘कुट्टि-य-आय्’ (मुलाकडून), ‘विरल-इण-आल्’ (बोटाकडून). (३) सर्व विकारांगांना-आल्’ प्रत्यय लागून तृतीया विभक्ती होते. यातून माध्यमाची (करण) किंवा साधनाची कल्पना व्यक्त होते. (४)-उ,-कु,-क्‌कु हे चतुर्थीचे प्रत्यय. व्यंजनान्त नामांना-उ प्रत्यय लागतो, तर स्वरान्त नामांना -कु,-क्‌कु प्रत्यय लागतात. (५) षष्ठी विभक्ती ‘स्वामित्व’ दर्शविणारी आहे. सर्व व्यंजनान्त नामांना-रे हा प्रत्यय लागतो. –उचे हा प्रत्यय स्वरान्त नामांना लागतो. (६)-ओ, अ हा प्रत्यय सर्व नामांना लागून होणाऱ्या विभक्तीचे कार्य ‘च्या बरोबर’ हा अर्थ दाखविणे हे आहे. (७)-इल् हा सप्तमीचा प्रत्यय. (८) संबोधनाचे बाबतीत स्वरान्त नामाचा शेवटचा स्वर लांबवला जातो किंवा विकल्पाने-ओ,-ए प्रत्यय लागतात. व्यंजनान्त नामांना ए प्रत्यय लागतो.

शब्दसंग्रह : सर्व द्राविड भाषांत मलयाळम्‌वर संस्कृतचा अधिक प्रभाव आहे. (कॉल्डवेल, पृ.१९) या भाषेने मध्य इंडो-आर्यन आणि अर्वाचीन इंडो-आर्यन भाषांतूनही काही शब्द घेतलेले आहेत. (१) संस्कृत शब्द व अर्थ यात बदल करून किंवा जसेच्या तसे स्वीकारले आहेत. फरक इतकाच, की अन्त्य स्वर ऱ्हस्व केला आहे. उदा., (गोदावर्मा, १९४६, पृ. १-३) धर्म &gt धर्मम्‌ (कर्तव्य, अधिकार), मनस्‌ &gt मनसस्‌ (मन), माला &gt माळ, नदी &gt नदि (नदी). (२) संस्कृत शब्दांच्या अर्थात बदल करून घेतले−अवकाश &gt अवकाशम्‌ (जागा, संधी), भंगी &gt भंगि (सौंदर्य). (३) संस्कृत शब्दांत मलयाळम्‌ उच्चारपद्धतीशी सुसंगत असे बदल करून घेतले. उदा., घान &gt कणम्‌ (वजन), जेष्ठ चेट्‌टण (मोठा भाऊ). (४) मध्य इंडो-आर्यन शब्द (पाली किंवा प्राकृत). प्राकृतः अण्ठि &gt अण्टि (मगज, कठीण बीज, कवची), मद्दल &gt मद्दलम्‌(बोटांनी वाजवायचे लांबट ढोलके). पाली : अय्य &gt अय्यण्‌ (ईश्वर, तमिळ ब्राह्मणाला उद्देशून वापरायचे गौरवसूचक), उम्मार &gt उम्मारम्‌(घरासमोरील व्हरांडा). (५) अर्वाचीन इंडो-आर्यन शब्द-मुख्यतः हिंदी किंवा मराठी. हिंदी : तोला &gt तोल (सोन्या- चांदीचे वजन, तोळा), पूची &gt पूच्चि (कीटक, फुलपाखरू). मराठी : चटणी &gt चट्टिणि (चटणी), पटेमारी &gt पट्टेमारि (एक प्रकारचे शिडाचे होडके).

 

मलयाळम्‌वर तमिळ, तेलुगू, कन्नड, सिंहलीसारख्या भाषांचाही प्रभाव पडला आहे. उदा., अम्बलम्‌ (विश्रांतीगृह), पेंड (चेंडू). तसेच अरबी, फार्सो आणि पोर्तुगीज यांचाही प्रभाव आहे. उदा., सवाळ ‘मोठा कांदा’. पण संस्कृत आणि इंग्रजीचा जास्त प्रभाव आहे. असे दिसते, की पंधरा टक्के शब्द इंग्रजीतून उसने घेतले आहेत.

संदर्भ :  1. George, K.M. Ramacaritam and the Study of Early Malayalam: A Study in Dravidian Linguistics, Kottayam, 1956.

             2. Godavarma, K. Indo-Aryan Loanwords in Malayalam, Mavelikkara, 1946.

             3. Gundert, H. A Malayalam English Dictionary, Mangalore, 1872.

             4. Iyer, L. A. K. Social History of Kerala, Vol. I Pre-Dravidians Vol. 2, Dravidian: an Anthropological Study, Madras, 1968, 1970

             5. Iyer, L. V. R. The Evolution of Malayalam Morphology, Ernakulam, 1936.

             6. Iyer, L. V. R.”A Brief Account of Malayalam Phonetics”: Journal of the Dept. of Letters, Vol. XIV, Calcutta, 1927.

             7. Iyer, L. V. R. “A Primer of Malayalam Phonology.” Bulletin of RR Institute, Vol. V, 1937 Reprinted In: Collected Papers of LVR, Vol. II, Annamalainagar, 1959.

             8. Menon, Sreedhara A. A Survey of Kerala History, 1967.

             9.Sekhar, A. C. Evolution of Malayalam, Pune, 1953.

            10. Subramoniam, V.I Dialect Survey of Malayalam (Ezhava-Ti Hiya), Trivandrum, 1974.

            11. Subramoniam, V.I.” Malayalam”. In: Current Trends in Linguistics, Vol. 5, Linguistics in South Asia PP., 372-381, The Hague, 1969.

दळवी, इंदिरा राजेंद्र (इं.) रानडे, उषा (म.)

Hits: 196
X

Right Click

No right click