तेलुगु भाषा

Parent Category: भाषांतर Category: इतर भारतीय भाषा Written by सौ. शुभांगी रानडे

Following article is small part of language information article. Pleae refer to https://vishwakosh.marathi.gov.in for font images, complete article and info about literature in this language.

लोकसंख्येच्या दृष्टीने आंध्रची प्रादेशिक भाषा तेलुगू ही द्राविड भाषासमूहातील पहिल्या क्रमांकाची भाषा आहे. भारतातील भाषांत ती दुसऱ्या क्रमांकाची भाषा असून ती हिंदीनंतर व बंगालीपूर्वी येते. तिच्या दक्षिणेस तमिळ, पश्चिमेस कन्नड व मराठी आणि उत्तरेस मराठी, हिंदी व ओडिया या भाषा आहेत.

तेलुगूचा सर्वांत प्राचीन शिलालेख ६३३ मधील आहे. तिचा पहिला लेखक अकराव्या शतकातील असून त्यांनी एक व्याकरण लिहिले आणि महाभारताचे भाषांतर केले.

भारतीतील तेलुगू भाषिकांची संख्या १९६१ च्या जनगणनेप्रमाणे ३,७६,६८,१३२ होती. त्यापैकी आंध्र प्रदेशात ३,०९,३४,८९८ होती. उरलेल्या पैकी तामिळनाडूत ३३,६३,८३४ महाराष्ट्रात ६,४०,७९५ कर्नाटकात ४,३१,७९३ ओरिसात ३,९३,४५३ आणि बाकीचे इतर राज्यात होते अनेक तेलुगू भाषिक मजुरीनिमित्त परदेशातही आहेत पण त्यांची संख्या तमिळ भाषिकांइतकी मोठी नाही.

लेखन व उच्चार : तेलुगू लिपी ब्राह्मीचे रूपांतर होऊन आलेली आहे. तिचे कन्नड लिपीशी अतिशय साम्य आहे. तिच्यात अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, लृ, लृ्, ए, (ऱ्हस्व व दीर्घ), ऐ, ओ, (ऱ्हस्व व दीर्घ), औ हे सोळा स्वर आहेत. व्यंजने क, ख, ग, घ, ङ, च, छ, ज, झ, ञ, ट, ठ, ड, ढ, ण, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म, य, र, ल, व, श, ष, स, ह, ळ अशी चौतीस असून क्ष व ज्ञ यांनाही स्वतंत्र चिन्हें आहेत. स्वरांपैकी ऋ, ऋ‌ृ, लृ हे तत्सम शब्दांच्या लेखनापुरतेच आहेत. दीर्घ लृ हा तर स्वरांच्या ऱ्हस्वदीर्घत्वांच्या तत्त्वानुसार केवळ अक्षरमालेत स्थान असणारा आहे. ऋचा उच्चार रु असा होतो.

तालव्य स्वर इ, ए आणि अर्धस्वर य हा च–ज नंतर आल्यास या व्यंजनांचा उच्चार तालव्य (मराठीतील ‘चक्र’–‘जय’ यांतील च–ज सारखा) आणि इतरत्र दंत्य (मराठीतील ‘चणा’– ‘जर’ यांतील च–ज सारखा) होतो. श आणि ष या दोहोंचाही उच्चार तालव्य (श सारखा) होतो.

संयुक्त व्यंजने लिहिण्याची पद्धत किचकट आहे. साधारणपणे नंतरचे व्यंजन आधीच्या व्यंजनाखाली लिहिले जाते.( टव प्रमाणे).

तेलुगूमधील शब्द स्वरान्त असतात. याबाबतीत तिचे प्राकृतशी साम्य आहे.

उच्चारसुलभतेसाठी काही संधीनियम पाळले जातात.स्वरादी प्रत्ययापूर्वी शब्दान्ती असलेल्या उ चा लोप होतो. आणि इ किंवा ए यांच्यापूर्वी य आणि उ किंवा ओ यांच्यापूर्वी व येतो, हे संधिनियम लक्षात ठेवण्यासारखे आहेत.

व्याकरण : नाम : नामात तीन लिंगे व दोन वचने आहेत. नामाच्या एकवचनाला लु हा प्रत्यय लागून अनेकवचन मिळते : कलमु ‘लेखणी’–कलमुलु ‘लेखण्या’. पण थोडे अपवादही आहेत. चेयि ‘हात’–चेतुलु ‘हात’ नूयि ‘विहीर’–नूतुलु ‘विहिरी’. नामाला विभक्तीप्रत्यय लागून तसेच काही शब्दयोगी अव्यये लागून त्यांचे वाक्यातील स्थान व वाक्यातील इतर शब्दांशी असलेला त्यांचा संबंध निश्चित होतो. साधारणपणे ही अव्यये षष्ठीच्या रूपानंतर किंवा क्वचित द्वितीया अथवा चतुर्थी यांच्या रूपांनंतर येतात.
क्रियारुपाला मु हा प्रत्यय लागून आज्ञार्थी एकवचन व दु हा प्रत्यय लागून अनेकवचन मिळते : व्रायुमु ‘लिही’–वायुदु ‘लिहा’ चेयुमु ‘कर’–चेयुदु ‘करा’.

नकारवाचकासाठी स्वतंत्र प्रत्यय आहेत : नेनु पोवुचुन्नानू ‘मी जातो आहे.’–नेनु पोवुतलेदु ‘मी जात नाही’. म्हणजे चुन्नानु हा होकारवाचक प्रत्यय असून तलेदु हा नकारवाचक आहे. तसेच चेयकुमु ‘करू नको’–चेयकुदु ‘करू नका’.

मिश्र काळांची रूपे सहायक क्रियापदांचा उपयोग करून मिळतात.

‘हो’ किंवा ‘नाही’ उत्तर असणारी प्रश्नवाचक रूपे क्रियापदाच्या शेवटी आ हा प्रत्यय जोडल्याने मिळतात. इतर विधानांत प्रश्नवाचक अव्ययांचा किंवा सर्वनामांचा उपयोग होतो.

अव्यय : अव्ययाचा सामान्य प्रत्यय गा असून तो नामाला किंवा विशेषणाला लागतो : सुखमुगा ‘सुखाने’ त्वरगा ‘लौकर, घाईने’. कधीकधी तो शब्दयोगी अव्ययालाही लागतो. लो ‘त’–लोगा ‘आत’.

वाक्यरचना : वाक्यरचना जवळजवळ मराठीसारखीच आहे. काही उदाहरणे पुढीलप्रमाणे :

नेनु कचेरीकि पोवुचुन्नानु ‘मी कचेरीला जातो आहे’.

नेनु कागितमु व्रायुचुन्नानु ‘मी कागदावर लिहितो आहे’.

नेनु ना कलमुतो व्रायुचुन्नानु ‘मी माझ्या लेखणीने लिहितो आहे’.

मीरु एवरिनि पिलुवुचुन्नारु ‘तू कोणाला बोलवतो आहेस?’

नेनु कूडा वत्तुनु ‘मीसुद्धा येईन’.

नेनु अक्कड कूरगायलु पंडलु कांदुनु ‘मी तिथे भाज्या (आणि) फळ विकत घेईन’.

आयु मंचि जंतुवु. अदि मनकु पालु इच्चुनु ‘गाय (हे) चांगलं जनावर (आहे). ते आपल्याला दूध देतं.’

मीरु इक्कडकु एप्पुडु वच्चितिरि ‘तुम्ही इकडे केव्हा आलात?’

अप्पुडु मीरु न पुस्तकमु चुचितिरा ‘तेव्हा तुम्ही माझं पुस्तक पाहिलं का?’

पहिले दहा अंक असे : ओक्टी ‘एक’, रेंडु ‘दोन’ मुडु ‘तीन’ नालुगु ‘चार’ऐदु ‘पाच’, आरु ‘सहा’, एडु ‘सात’ एनिमिदि ‘आठ’, तोम्मिदि ‘नऊ’ पदि, ‘दहा’.

शब्दसंग्रह : तेलुगूच्या शब्दसंग्रहात संस्कृतचा भरणा मोठ्या प्रमाणात आढळतो. ती मराठीची एक निकटवर्ती भाषा असल्यामुळे मराठीतही तिच्यातून आलेले पिल्लू, चचणे (मरणे) याअर्थी इ. शब्द आढळतात.

संदर्भ : 1. Arden, A. A. A Progressive Grammar of the Telugu Language, Madras, 1927.

2. Cohen, Marcel Meillet, Antoine, Les langues du monde, Paris, 1952.

3. Samtasiva Rao, B. Telugu Made Easy, Secunderabad, 1953.

कालेलकर, ना. गो.

Hits: 186
X

Right Click

No right click