तमिळ भाषा
Following article is small part of language information article. Pleae refer to https://vishwakosh.marathi.gov.in for font images, complete article and info about literature in this language.
लोकसंख्येच्या दृष्टीने तमिळचा क्रमांक द्राविड भाषांत तेलुगूनंतर असला आणि तिचा क्षेत्रविस्तारही त्याच प्रमाणात असला, तरीही ती सर्वांत प्राचीन व समृद्ध द्राविड भाषा आहे. तिचा भाषिक पुरावा (संस्कृत व प्राकृत सोडल्यास) इतर कोणत्याही भारतीय आर्य भाषेपेक्षा जुना आहे. तमिळ भाषेचे ब्राह्मी लिपीतील शिलालेख इ. स. पू. तिसऱ्या शतकापासून आणि तमिळ लिपीतील शिलालेख ख्रिस्तोत्तर सहाव्या शतकापासून उपलब्ध आहेत. तिचे सर्वांत प्राचीन साहित्य ‘संघम्’ या नावाने प्रसिद्ध आहे.
तिच्या भाषिकांची भारतातील एकंदर संख्या १९६१ च्या जनगणनेप्रमाणे ३,०५,६२,७०६ होती. त्यापैकी २,८०,१६,१४७ तमिळनाडू राज्यात होते. उरलेल्यांपैकी कर्नाटकात ८,५९,१७३, केरळात ५,२७,७०८, आंध्रात ५,११,६०४, महाराष्ट्रात १,६७,६९४ व बाकीचे इतर राज्यांत होते. उत्तर श्रीलंकेत ती बहुसंख्य लोकांची मातृभाषा आहे. अनेक तमिळ भाषिक जुन्या काळात मॉरिशस, फिजी बेटे, वेस्ट इंडीज, द. आफ्रिका, मलाया इ. प्रदेशांत मजुरी करण्यासाठी जाऊन स्थायिक झालेले आहेत. या दृष्टीने भारतातील एक आंतरराष्ट्रीय दर्जाची भाषा म्हणून तमिळचा उल्लेख करता येईल.
लेखन व उच्चार : तमिळ भाषेची लिपी ब्राह्मीचे रूपांतर होऊन आलेली आहे. परंतु त्यातील स्वतःच्या भाषिक व्यवहाराला आवश्यक अशी व एवढीच चिन्हे तमिळने स्वीकारली आहेत. तमिळ लिपीवरून किंवा तिच्या रोमनीकृत स्वरूपावरून प्रचलित असलेले गैरसमज भाषाशास्त्रज्ञांच्या परिचयाचे आहेत. म्हणून तिची नीट माहिती असणे फार जरूरीचे आहे.
तमिळ लिपीत बारा स्वर व अठरा व्यंजने आहेत. स्वर अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए (ऱ्हस्व व दीर्घ), ओ (ऱ्हस्व व दीर्घ), ऐ, औ हे असून व्यंजने क, ङ्, च, ञ, ट, ण, त, न, प, म, य, र, ल, व, ड़, ळ, ऴ, न ही आहेत. याचा अर्थ असा नव्हे, की तमिळमध्ये एवढेच उच्चार आहेत. मराठीत ज्याप्रमाणे ‘च’, ‘ज’ इ. अक्षरे प्रत्येकी दोन ध्वनी व्यक्त करतात, त्याचप्रमाणे काही तमिळ अक्षरांचेही आहे. मात्र तमिळमधील अक्षर व उच्चार यांचा संबंध अधिक नियमबद्ध आहे.
तमिळ स्वरांसंबंधी विशेष असे काही सांगण्यासारखे नाही. फक्त ‘ए’ व ‘ओ’ हे स्वर ऱ्हस्व व दीर्घ असतात हे लक्षात ठेवले पाहिजे.
केवळ व्यंजन दाखवायचे झाले, तर व्यंजनाच्या चिन्हावर शिरोबिंदू दिला जातो. म्हणजे जे काम मराठीत व्यंजनाचा पाय मोडून होते ते इथे शिरोबिंदू देऊन होते. व्यंजनसंयोग किंवा संयुक्त व्यंजन दाखवताना अंत्य व्यंजनाशिवाय इतरांवर शिरोबिंदू दिला म्हणजे झाले. उदा., मराठी क्रम = तमिळ कंरम म. पक्का = त. पकंका इत्यादी. या पद्धतीमुळे तमिळचे संयुक्त व्यंजन लिहिणे अतिशय सोपे झाले आहे.
व्यंजनांचा अभ्यास केला तर असे दिसून येईल, की या भाषेत मराठीप्रमाणे ख, ग, घ, छ, ज वगैरे महाप्राण अघोष, अल्पप्राण सघोष व महाप्राण सघोष उच्चार दर्शवणारी अक्षरचिन्हे नाहीत. त्याचप्रमाणे ह हे व्यंजनही नाही. पण तमिळच्या ज्या मूळ ध्वनिपद्धतीसाठी तिची लिपी ठरविण्यात आली तिचे काम या चिन्हांनी भागत होते. मात्र संस्कृतमध्ये नसलेली पण तमिळच्या लेखनाला आवश्यक अशी ऱ, ऴ, ऩ ही नवी चिन्हे तिच्यात आहेत.
आद्य द्राविड भाषेत महाप्राण व्यंजने नाहीत आणि सघोष व्यंजने शब्दारंभी येत नाहीत. तिथे फक्त अघोष व्यंजन येऊ शकतो. म्हणून ‘गार’ व ‘घार’हे शब्द तमिळमध्ये‘कार’असेच लिहिले जातील, तर ‘शिका’ व ‘शिखा’ हे शब्द ‘चिका’असे लिहिले जाऊन त्याचा उच्चार ‘चिगा’,‘शिगा’ किंवा ‘सिगा’ होईल. म्हणजे अघोष व्यंजनाच्या दोन्ही बाजूला स्वर, किंवा आधी त्याच वर्गातील अनुनासिक व्यंजन व नंतर स्वर आला, तर त्याचा सघोष उच्चार होतो. उदा., लेखन ‘अङ्क’ –उच्चार ‘अङ्ग’, लेखन ‘काक’- उच्चार ‘काग’ इत्यादी. या पद्धतीनुसार ‘गांधी’ हा शब्द लेखनात ‘कान्ती’ आणि उच्चारात ‘कांदी’ असा होईल.
व्यंजनांतील ऱ, ऴ आणि ऩ या चिन्हानी दर्शविलेले ध्वनी मराठीला अपरिचित आहेत. त्यांचे उच्चार पुढीलप्रमाणे : ऱ–तालव्य र. जिव्हाग्र र च्या उच्चारात असते त्यापेक्षा मागे खेचले जाऊन कंप होणारा र. जवळजवळ ड सारखा, पण कंपित. ऴ–जिव्हाग्र तालुशिखराच्याही मागे नेऊन उच्चारला जाणारा ळ हा पार्श्विक. ऩ–न आणि ण यांच्या मध्यावरचा दंतमूलीय न.
ह हा उच्चार मुळ भाषेत नसला, तरी परिवर्तनाच्या ओघात स्वरमध्यस्थ क चा ह झालेला आहे. अनेकवचनाच्या क् या प्रत्ययापूर्वी स्वर आल्यास तो स्वर व क मधील अ यामुळे क चा आधी ग, नंतर घर्षक घ व शेवटी ह झालेला आहे.
संधिनियम : बहुतेक संधिनियम उच्चारसुलभतेसाठी आहेत. उदा., स्वरान्त शब्दानंतर स्वरादी शब्द आल्यास मध्ये य् किंवा व् येणे स्वरान्त शब्दानंतर व्यंजनादी शब्द आल्यास त्या व्यंजनाचे द्वित्व होणे इत्यादी.
व्याकरण : नाम : नामांचे दोन मुख्य वर्ग आहेत. एक श्रेष्ठ वर्ग (उयर्/तिणै) व दुसरा कनिष्ठ वर्ग (अल्/तिणै). श्रेष्ठ वर्गात देव, मनुष्य यांचा समावेश होतो. त्यामुळे त्यात पुल्लिंग व स्त्रीलिंग असे भाग आहेत. कनिष्ठ वर्गात निर्जीव पदार्थ, मनुष्येतर प्राणी, झाडे, कल्पना, गुण इत्यादींचा समावेश असून या सर्वांचे एकच असे नपुसकलिंग असते.
वरील आशयगर्भ वर्गीकरणाव्यतिरिक्त काही प्रत्ययांनीही लिंग व्यक्त होते. न्, अन् किंवा आन् हे पुल्लिंगी नामांचे एकवचन दाखवतात ळ्, अळ्, आळ्, इ किंवा ऐ हे स्त्रीलिंगी एकवचन दाखवतात दु किंवा अदु नपुसकलिंग दाखवतात : अवन्, ‘तो’, अवळ् ‘ती’, अदु‘ते’ मगन् ‘मुलगा’, मगळ ‘मुलगी’ इत्यादी. ज्या नामांच्या शेवटी हे प्रत्यय येत नाहीत, त्यांचे लिंग त्याच्या अर्थावरूनच समजून घ्यावे लागते.
श्रेष्ठवर्गीय नामांचे अनेकवचन र्, अर् किंवा कळ् (गळ्, हळ्) हे प्रत्यय लागून होते. न् किंवा ळ् शेवटी असलेल्या नामांना र् किंवा अर् हा प्रत्यय लागतो. इतर नामांना र्, अर् किंवा कळ् हे प्रत्यय लागतात: तेवन्, ‘देव’– तेवर् ‘देव’ मगन् ‘मुलगा’– मगर् ‘मुलगे’. हा प्रत्यय लागण्यापूर्वी अंत्य न् किंवा ळ् चा लोप होतो.
दु शेवटी असलेल्या नपुसकलिंगी नामाचे अनेकवचन हा दु काढून टाकून अथवा त्याऐवजी न किंवा वै हा प्रत्यय लावून होते. इतर नपुसकलिंगी नामांना कळ् हा प्रत्यय लागतो : चिरियदु ‘थोडे’–चिरिय, चिरियन किंवा चिरियवै पांबु ‘साप’–पांबुगळ् ‘साप’ पसु ‘गाय’–पसुक्कळ् ‘गाई’.
विभक्ती: विभक्ती आठ आहेत. त्यांचे प्रत्यय असे : प्रथमा–शून्य द्वितीया–ऐ तृतीया–आल्, ओदु चतुर्थी–उक्कु, उक्काग पंचमी–इल्, इलिरुंदु, इनिंदु षष्ठी–उडैय, इन्, अदु सप्तमी–इल्, इदत्तिल् संबोधन–ए.
हे प्रत्यय सर्व नामांना एकवचनात किंवा अनेकवचनात लागतात. सर्व विभक्तिप्रत्यय स्वरादी आहेत. त्यामुळे ते नामांना लावताना विशिष्ट संधिनियम पाळावे लागतात.
संख्यावाचक :पहिले दहा आकडे पुढीलप्रमाणे :
ओन्रु ‘एक’ इरंडु ‘दोन’ मूनरु ‘तीन’ नालु ‘चार’ अइंदु ‘पाच’ आरु ‘सहा’ एडु ‘सात’ एट्टु ‘आठ’ ओनबदु ‘नऊ’ पत्तु ‘दहा’.
संख्यावाचकांना ‘आम्’ किंवा ‘आवदु’ हा प्रत्यय लावून क्रमवाचक विशेषण मिळते. मात्र ओन्रु ‘एक’ याचे क्रमवाचक मुदल्, मुदल्–आम् किंवा मुदल्–आवदु होते. मागे दशकवाचक शब्द आल्यास ते ओराम असे बनते. मुप्पदु ‘तीस’, मुपत्तोराम ‘एकतीस’.
क्रियापद : क्रियापदात वर्तमान, भूत आणि भविष्य हे तीन मुख्य काळ आहेत. धातूला कालवाचक चिन्ह लावून नंतर पुरुष व वचन दर्शक प्रत्यय लावल्याने क्रियापदाचे रूप सिद्ध होते. वर्तमानकाळाचे कालवाचक चिन्ह किर्, भूतकाळाचे त्त् आणि भविष्यकाळाते प्प् हे आहे. या सर्वांचे नकारवाचक रूप एकच होते ते धातूला कोणतेही चिन्ह न लावता एकदम प्रत्यय लावल्याने सिद्ध होते.
शब्दसंग्रह : तमिळच्या साहित्यनिर्मितीची सुरुवात ख्रिस्तशकाच्या प्रारंभाइतकी जुनी आहे, तमिळ विद्वानांनी भाषेच्या अभ्यासाकडेही लक्ष पुरवले होते. त्यामुळेच वृत्ताच्या संदर्भात कित्येकदा वापरावे लागणारे कृत्रिम किंवा क्लिष्ट शब्द आणि लोकांच्या तोंडी असणारे नैसर्गिक किंवा परिचित शब्द असे शब्दांचे वर्गीकरण त्यांनी प्राचीन काळीच केले आहे. तोल्काप्पियम् हा व्याकरणग्रंथ ख्रिस्तशकाच्या आरंभाच्या आसपासच्या काळातील असून संस्कृतमधून घेतलेले शब्द तमिळ ध्वनिपद्धतीला अनुसरूनच वापरले जावेत, असे त्यात म्हटलेले आहे. संघम् काळात संस्कृतमधून घेतलेले शब्द फार नव्हते पण शैव, वैष्णव, जैन व बौद्ध धार्मिक प्रचाराच्या काळात हे प्रमाण पुष्कळच वाढले. धार्मिक व तत्त्वज्ञानपर ग्रंथांत हे प्रमाण मोठे असले, तरी साहित्यिक ग्रंथरचनेत ते अतिशय मर्यादित आहे.
संदर्भ: 1. Cohen, Marcel Meillet, Antoine, Les langues du monde, Paris, 1952.
2. Wickremasinghe, M. deZilva, Tamil Grammar Self-Taught, London, 1906.
सारांश लेख --- कालेलकर, ना. गो. - स्रोत - मराठी विश्वकोश
Hits: 165