प्रकाश
प्रकाश म्हणजे आशेचे किरण! उन्हामुळे सावलीचं आणि अंधारामुळे प्रकाशाचे महत्व कळते हेच खरे !प्रकाश म्हटले की उजेड असे चित्र साकारते! एक किरण सूर्यापासून निघालेला क्षणात अवघे भूमंडळ उजळून टाकतो .त्याच्या एका किरणात सप्तरंगी इंद्रधनुष्य सामावलेले !एखाद्या संध्याकाळी जेव्हा ते क्षितिजावर अवतीर्ण होते ,तेव्हा मन सुखावून जाते .एकतेतून विविधता आणि विविध तेतून एकता दिसते. दुसरं काय! प्रकाशाची एकच रेषा झरोका तिरीप आल्यामुळे मन प्रसन्न होते. रोज सूर्यनारायण आपल्याला एवढा प्रकाश देत असतो पण त्याची जाणीव अतिपरिचयात अवज्ञा अशीच! रात्री विजेचा लपंडाव सुरू झाला मग अगतिकतेने मेणबत्ती इत्यादीतून प्रकाश केव्हा मिळेल म्हणून आसुसतो .
या प्रकाशाचा मुख्य स्त्रोत सूर्य देवता !यामुळे प्राचीन काळापासून या सौरशक्ती चे महत्व अनेक श्लोक ,स्तोत्र इत्यादीतून वर्णिली आहे .वेदांची अक्षरे पोथीत सापडतात तर वेदांचा अर्थ जीवनात शोधता येतो. उदाहरणार्थ शांतीपाठ ओम भद्रम करणेभिःभद्रम पश्ये.....इ ओम शांती ओम शांती शांतीः याचा अर्थ प्रकाशाचे संरक्षक कवच माझ्याभोवती निर्माण झाले आहे .मी सुरक्षित आहे. आणि त्यामुळेच मी खुशीत आहे .माझे बांधवही संरक्षित आहेत. प्रकाश सर्व विश्वात पसरला आहे. हा तेजस्वी शुभ्र प्रकाश परत माझ्या अंतःकरणात आला आहे. यामुळे जीवन उजळून जात आहे. करोना च्या काळात मनाला उभारी येण्यासाठी हा एक सकारात्मक स्व संदेशचआहे!
प्राचीन काळापासून प्रकाश आलेख प्रगत होत गेलेला आहे. घरात दिवटी पासून पुढे पणती ,समयी कंदील , बत्ती आणि आजची बिजली !संपूर्ण आसमंत उजळून टाकणाऱ्या या सुविधा!! त्याच्यांत काळानुसार स्वरूपात बदल होत गेला आहे .अगदी दिवाळीपासून, दीप अमावस्या ,कर्नाटक राज्यातील म्हैसूर दसरा किंवा सण समारंभ प्रकाश डोळे दिपवून टाकणारे!! पणती,आणि समईच्या शुभ्र कळ्या मनाला शांती देऊन हव्याहव्याश्या !!"ज्योतीने तेजाची आरती "च जणू! या सगळ्यांचे मनोगत काय तर," एकच ठावे काम मला ,प्रकाश द्यावा सकलांना ।कसलेही मज रुप मिळो, देह जळो,अन् जग उजळो !"केवढा बीज मंत्र हा जीवनासाठी !!"तमसो मा ज्योतिर्मय "मला अंधारातून प्रकाशात ने." ही मागणी आश्चर्यचकित करते. हेलन किलर स्वतः अंध !अंधांवर चित्रपट काढला .जगातील अंधांना आत्मनिर्भर होण्याचे स्वप्न देणारी, त्यांना जगण्याची ऊर्जा देणारी, शिकण्याची प्रेरणा देणारी ,एक स्फूर्तीर्ज्योतीच !
एकदा एका धनिकाने आपल्या मुलांची परीक्षा घेण्यासाठी चारही मुलांना एकत्र बोलावले आणि सांगितले की ही रक्कम तुम्हा चौघांना सारख्या प्रमाणात देतो. जो कोणी या तून मला घरभर पदार्थ आणून देईल त्याला मी माझा उत्तराधिकारी नेमणार! झालं !मुलं विचार करू लागली काय आणता येईल? कोणाला काही सुचेना. सर्वात धाकट्या मुलाला एक कल्पना सुचली .तो बाबांना म्हणाला चला मी घरभर पदार्थ आणला आहे .घरात एक मेणबत्ती लावून सर्वत्र प्रकाश पसरला आणि घरभर पदार्थ सर्वांनाच मिळाला .वडील मुलाची ही हुशारी पाहून खुश झाले. मग सांगा, छान आहे ना गोष्ट! प्रकाश काय काय देतो हे सांगणारी !!
---प्रा. सौ. सरोज गोळे, विश्वस्त, ज्ञानदीप फौंडेशन, सांगली
Hits: 181