ज्ञान - व्यापक संकल्पना

Parent Category: मराठी साहित्य Category: लेख Written by सौ. शुभांगी रानडे

ज्ञान - व्यापक संकल्पना

ज्ञानाचे समाजशास्त्र ही समाज-शास्त्राची उपशाखा नाही. मात्र ज्ञान ही संकल्पना किंवा वस्तुस्थिती व्यापक आहे, विविध क्षेत्रांना लागू पडणारी आहे. ज्ञान प्राचीन आहे आणि आधुनिकही. कोणत्याही शास्त्रांचा आधार ज्ञान नाही, असे होऊ शकत नाही. म्हणूनच ज्ञानाचे समाजशास्त्र अनुप्रयुक्त आहे. त्याचा संबंध ज्ञान आणि सामाजिक पायाभूत गोष्टी यांच्याशी आहे. धर्म, अर्थव्यवस्था, राजनीती, शिक्षण आणि संस्कृती यांच्याशी आहे. यांतील रूढी, परंपरा, संहिता यांच्या जडणघडणीत ज्ञानाचा प्रभाव असतो किंवा ज्ञानाचा प्रभाव पडेल, याकडे दुर्लक्षही केले जाते. उदा., सर्व धर्मांची शिकवण मानवताप्रधान असूनही ज्ञान मानवतेचे संस्कार करण्यात अपुरे पडते आणि समाजातील विविध धर्मांचे लोक आपापसांत भांडताना दिसतात. गौतम बुद्ध यांचा मूर्तिपूजेवर विश्र्वास नव्हता, पण प्रत्यक्षात मात्र असे आढळते की, जगात बुद्धाच्या मूर्ती सर्वांत जास्त आहेत. ज्ञानाचा आगह जेवढा हिंदू धर्मात धरण्यात आला, तेवढा विचार इतर धर्मांत नाही. परंतु अज्ञानी जन जेवढे हिंदूंमध्ये आहेत, तेवढे इतर धर्मात नाहीत. या विसंगती कशाच्या दयोतक आहेत ? तर ज्ञानाचा पाठपुरावा या समाजामध्ये झाला नाही आणि त्यामुळे विचार आणि मानसिकता, मानसिकता आणि कृती यांमधील विसंगती टिकून राहते.

ज्ञान

ज्ञान हा विषय अनेक सिद्धांतांमार्फत अनेक समाजशास्त्रज्ञांनी अनेक प्रकारे मांडला आहे. एमील द्यूरकेम यांच्या मते त्यांचा धर्माबद्दलचा सिद्धांत असे दर्शवितो की, आपण समाजात अनेक मानसिक प्रकारांमार्फत व उपायांमार्फत समाजाला वळण लावू शकतो. उदा., भक्ती, प्रवचन, प्रार्थना, देवळांची उभारणी, उपास-तापास, जत्रा, भंडारा ही गावोगावी विविध स्वरूपांत असतात. ज्यामार्फत समाजातील समूहांना वळण लागते. अनेक आर्थिक व्यवहारांना धार्मिक रूढींचा आधार दिला जातो. उदा., एखादे अंतराळयान सोडण्यापूर्वी पृथ्वीवर त्याची पूजा केली जाते. चंद्रावर पहिले पाऊल ठेवल्यावर व तेथून सुखरूप परतल्यावर अंतराळवीर प्रथम चर्चमध्ये गेले आणि तेथे प्रार्थना करून उपकृत झाले. संशोधन आणि संशोधकांना समाजात माणसाने उभारून ठेवलेल्या धार्मिक-सांस्कृतिक केंद्रांच्या मानसिक पाठबळाची आजही आणि भविष्यातही आवश्यकता आहे. त्यांची गरज किती, कोणाला आणि कशी भासते, याचे संशोधन सातत्याने करावयास हवे.

फँकफुर्ट स्कूल आणि त्यावेळच्या इतर शास्त्रज्ञांच्या मते ज्ञानाच्या समाजशास्त्र या स्वतंत्र विषयापेक्षा त्याच्या विशिष्ट रचनेला महत्त्व आहे; कारण या समाजरचनेत संस्कृती, धर्म, राजनीती, अर्थव्यवस्था, नीतिशिक्षण ही विशिष्ट क्षेत्रे असतात. तेथील नियम, संहिता इत्यादींना विशिष्ट अर्थ प्राप्त होतो. १९३२ च्या आसपास कार्ल मानहाइम याने मार्क्सवादा-पेक्षा भिन्न असा आदर्शवादी आणि वैचारिक मुद्दा मांडला. एक स्वतंत्र उपक्षेत्र म्हणून ज्ञानाच्या समाजशास्त्राची मांडणी कार्ल मानहाइमच्या वेळी सुरू झाली आणि त्याचबरोबर संपली; कारण त्याने ज्ञान व समाजरचना यांतील परस्परसंबंध पुरेसे विशद केले नाहीत.

नंतरच्या काळात आधुनिकता, धर्म आणि विज्ञान यांमध्ये मानहाइमच्या विचारधारेचे काही उल्लेख आढळतात. शेवटची चर्चा ‘सांस्कृतिक सापेक्षतावाद’चा परामर्श घेतल्याशिवाय राहत नाही. बहुजिनसी समाजात ज्ञान व समाजरचना यांचा परस्परसंबंध असतो. शीलरच्या मते ज्ञान हे केवळवर्गसंबंधांवर अवलंबून नसते, तर ज्ञानाचा समाजातील विविध घटनांशी संबंध येतो. ज्ञान एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संकमित होत राहते. ज्ञान हे विभिन्न प्रकारचे असते. कल्पना आणि वस्तुस्थिती यांची परस्परकिया एकमेकांवर झाल्यामुळे ज्ञान कधी वाढते, तर क्वचित कधी सुटतेही.

रॉबर्ट मर्टनने एक प्रश्नावली केली व त्याव्दारे निरनिराळ्या विचारसरणींचा अभ्यास करून ज्ञानाच्या समाजशास्त्राचा अभ्यास करण्याचे सुचविले. त्याने ज्ञानाच्या समाजशास्त्राच्या अभ्यासासंबंधी एक चौकट तयार केली. नैतिक श्रद्धा, तत्त्वप्रणाली, कल्पना, तत्त्व, धार्मिक विधी, सामाजिक संकेत इत्यादींचा संबंध सामाजिक रचनेशी कसा येतो, याचा अभ्यास या शास्त्रांतर्गत येतो. सोरोक्यिनने सुद्धा निरनिराळ्या तृहेच्या संस्कृती कल्पिल्या व त्यांच्या अनुरोधाने ज्ञान व संस्कृती यांचा संबंध प्रतिपादला.

एडवर्ड एव्हान्स-प्रिचर्डने (१९०२-७३) सामाजिक मानवशास्त्र हे अधिकतर मानवी समाजशास्त्र आहे व शास्त्रशुद्घ तर्कशास्त्र कमी आहे. त्याने मानवशास्त्राच्या अभ्यासापेक्षा समाजातील रूढींच्या समाजासाठी असलेल्या भूमिकांचा अभ्यास अधिक खोलात जाऊन केला. यामुळे एका सांस्कृतिक समूहातील व्यक्तींना दुसऱ्या भिन्न समूहातील जीवन समजून घेणे, हे ज्ञानाच्या समाजशास्त्रामुळे शक्य झाले. रॅडक्लिफ-बाऊन आणि एव्हान्स-प्रिचर्ड या दोघांचेही योगदान ज्ञानाच्या समाजशास्त्रासाठी अमूल्य होते.

ज्ञानाचे समाजशास्त्र उपयोजित आहे, अनुप्रयुक्त आहे आणि म्हणून समाजातील सर्व थरांपर्यंत पोचणारे ज्ञान कोणते व ते कसे उपयुक्त ठरू शकते, याचेही विवेचन झाले पाहिजे.

लेखिका: सुधा काळदाते

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

Hits: 187
X

Right Click

No right click