ज्ञानदीप फौंडेशन - सहयोगी व्यक्ती आणि संस्था

Parent Category: मराठी साहित्य Category: डॉ. सु. वि. रानडे यांचे लेख Written by सौ. शुभांगी रानडे
ज्ञानदीप इन्फोटेक आणि ज्ञानदीप फौंडेशन या दोन संस्थांच्या स्वरुपाबद्दल आणि कार्यपद्धतीबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असल्याचे माझ्या लक्षात आले. त्यामुळे तो खुलासा आधी करत आहे.



ज्ञानदीप इन्फोटेक प्रा. लि
ज्ञानदीप इन्फोटेक प्रा. लि. ही व्यावसायिक संस्था असून तिची स्थापना इ. स. २००० मध्ये करण्यात आली.माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात   जागतिक स्तरावर वााय टू के समस्येमुळे ज्यावेळी भारतीय अभियंत्यांना प्रचंड मागणी निर्माण होऊन अनेक आताच्या नावाजलेल्या संस्था उदयास आल्या त्यावेळी  परदेशात  न जाता भारतात अभियंत्यांना संधी उपलब्ध व्हाव्यात हा हेतू त्यामागे होता.

ही संस्था आमच्या खाजगी मालकीची असून तिचा उद्देश वस्तू निर्मिती आणि सेवा पुरवून नफा मिळविणे हा आहे. तिचे कार्य पूर्णपणे व्यावसायिक तत्वावर चालते.

 अर्थात   परदेशी आणि महानगरांतील आकर्षक पगाराच्या ओढीने या संस्थेची अवस्था केवळ स्टेपिंग स्टोनसारखी झाली व संस्थेतील हुषार अभियंते बाहेर जात राहिले. अगदी आमच्या कुटुंबातील व्यक्तींचाही त्याला अपवाद नव्हता. शिवाय मी आणि माझी पत्नी शिक्षक व्यवसायातील असल्याने व्यवसाय चालवायचे कौशल्य व धूर्तपणा आमच्याकडे नव्हता. आमचे उद्दीष्टही तसे अगदी आदर्श व भाबडे होते.

शिवाय शिक्षकी पेशामुळे आम्हाला सरळीकडे मान मिळायचा पण काम मिळत नसे. लोकांकडे कॉम्प्युटरच नव्हते मग इंटरनेटची बातच सोडा. त्यावेळी बीएसएनचे अधिकारी मला म्हणाले होते. कशाला हा आटापिटा करताय. अजून आम्हाला फोन विकतानाही अडचणी येत आहेत.
असो. त्यातूनही संस्था पुढे वाटचाल करू लागली.

ज्ञानदीप फौंडेशन
माझे पर्यावरण क्षेत्रातील काम, माझे अनेक मानाची पदे भूषविणारे विद्यार्थी आणि पर्यावरण क्षेत्राचे वाढते महत्व लक्षात घेऊन मग आम्ही आमच्या शिक्षकी पेशाला अनुसरून ज्ञानदीप शिक्षण व संशोधन संस्थेची २००५ मध्ये सार्वजनिक संस्था म्हणून स्थापना केली, विद्यार्थ्यांच्या सक्रीय सहभागामुळे आमच्या या संस्थेची प्रगती वाढत गेली व एक मोठा मित्र व हितचिंतक परिवार त्यातून निर्माण झाला. २००५ पासून दरवर्षी प्रशिक्षण वर्ग व सेमिनार घेत १०० वर अभियंते व आर्किटेक्ट यांच्यासह परदेशात अभ्यास दौरे व सेमिनार घेण्यात संस्थेला यश आले.

ही संस्था सार्वजनिक संस्था म्हणून नोंदलेली असल्याने  संस्थेवर माझी किंवा कोणा एकाची यावर मालकी नाही. कोणीही याचे नेतृत्व करू शकतो. हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे. या संस्थेचे कार्य ना नफा, ना तोटा पा तत्वावर चालते व सर्व आर्थिक व्यवहार कोणालाही केव्हाही पाहण्यास मिळू शकतात. सध्या या फौंडेशनमध्ये शिक्षण व विज्ञान प्रसार क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती विश्वस्त म्हणून काम करीत आहेत. दर पाच वर्षांनी निवडणूक होऊन नवी कार्यकारिणी निवडण्यात येते.

आमच्या कार्यामुळे अनेक मान्यवर तज्ज्ञ व्यक्ती, शिक्षण व संशोधन संस्था ज्ञानदीप फौंडेशनच्या कार्यात सहभागी झाल्या काही नव्या संस्था उदयास आल्या. ज्ञानदीप इन्फोटेकही यात एक सहयोगी मातृसंस्था या नात्याने  फौंडेशनच्या कार्यात सहभागी झाली आहे.

आता या सर्व संस्था आणि व्यक्तींची ओळख करून देण्याचे व त्यांचे कार्य  अधिक वृद्धींगत कसे होईल यासाठी प्रयत्न करण्याचे नवे उद्दिष्ट फौंडेशनने हाती घेतले आहे. फौंडेशनने आपल्या घटलेत दुरुस्ती करून या सर्वांना प्रत्यक्ष सहभागी करून घेण्यासाठी वार्षिक व आजीव सदस्यत्वाची सोय करण्याचे योजिले आहे.

सध्या कार्यरत असणा-या सहयोगी संस्था
  • ज्ञानदीप इन्फोटेक प्रा. लि,
  • मराठी विज्ञान प्रबोधिनी, सांगली
  • परिसर संरक्षण व संशोधन संस्था ( Environmental Protection Research Foundation)
  • आंतरराष्ट्रीय पर्यावरण प्रशिक्षण संस्था ( International School of Environment Management Studies)
  • वालचंद कॉलेज माजी विद्यार्थी संघटना ( Association of Past Students, WCE, Sangli)
  • निसर्ग प्रतिष्ठान ( Nature Foundation)
  • नवनिर्मिती आणि स्वयंउद्योजक प्रोत्साहन केंद्र ( Center of Innovation & Entrepreneurship)
  • स्वाधीन उर्जा
  • पंढरपूर कॉलेज ( SVERI, College of Engg., Pandharpur)
इतरहीअनेक संस्था व व्यक्ती ज्ञानदीप फौंडेशनच्या कार्यात सहभागी होत आहेत.

या सर्वांची सविस्तर माहिती ज्ञानदीप फौंडेशनच्या संकेतस्थळावर (वेबसाईटवर) विनामूल्य प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

ज्या व्यक्ती वा संस्थांना ज्ञानदीप फौंडेशनच्या कार्यात सहयोगी वा प्रत्यक्ष सहभागी व्हायचे असेल त्या सर्वांनी आपला परिचय व कार्य यांची माहिती पाठवावी असे मी फौंडेशनच्या वतीने आपणास आवाहन करीत आहे.



.


Hits: 141
X

Right Click

No right click