सुटाबुटाची कार्पोरेट संस्कृती
आमच्या वेळी शाळा कॉलेजमध्ये गणवेशाची पद्धत नव्हती. नंतर प्राथमिक शाळांमध्ये गणवेश सुरू झाला तो गरीब श्रीमंतात भेद दिसू नये या उद्देशाने. पण आजकाल सर्व सभासमारंभात सुटाबुटांत लोक वावरताना पाहिले की आपण भारतात आहोत की परदेशात असा संभ्रम पडतो.
सुदैवाने मला कधी कॉलेजमध्ये सूट बूट घालावा लागला नाही. नाही म्हणायला लग्नात सूट शिवला होता पण तो लग्नानंतर तसाच कपाटात झुरत राहिला. आमच्या वालचंद कॉलेजमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक दोघांनाही पोशाखाबद्दल पूर्ण स्वातंत्र्य होते. मी कानपूरला पीएचडीसाठी गेलो असताना देखील तेथे क्वचितच कोणी सुटाबुटात असायचा. माझे गाईड डॉ. जी. डी. आगरवाल तर बर्कले विद्यापिठातही लेहेंगा शर्ट वापरत. आयआयटीमध्ये डायरेक्टर झाल्यानंतरही त्यांच्या वेषभूषेत काही फरक पडला नव्हता. माझा विद्यार्थी आणि नंतर कानपूरमध्ये एमईसाठी आलेला दामोदर कुत्ते सांगलीतील एका प्रसिद्ध सिव्हील कॉंट्रॅक्टरचा मुलगा असूनही नेहमी शर्ट लेहेंगा वापरत असे. त्यांच्या घरातील सर्वच साधेपणाने रहात. आजही त्याचा तोच पेहेराव असतो.
किर्लोस्कर कन्सल्टंट्स मार्फत मी एका मिटींगला चंदीगडला गेलो होतो. किर्लोस्कर कन्सल्टंटचे अधिकारी यांनी मला टाय घालायला सांगितला. माझ्याकडे तो नसल्याने त्यांनी तो माझ्या गळ्यात नीट बांधून दिला नंतर त्यांच्या लक्षात आले की माझ्याकडे बूट नसून चप्पल आहे. त्यांना माजी कीव आली. मग त्यांनी टायशिवाय मला मिटींगला नेले.
पुढे बॅंकॉकला ट्रिपवर गेलो असताना दोन दिवसात सूट शिवून मिळत असल्याने मित्रांच्या आग्रहाखातर मी सूट शिवला खरा. पण नंतर वापरलाच नाही.
सध्या इंग्रजी माध्यमातील शाळा आणि नव्या हायफाय कॉलेजातील मुले कडक उन्हातही टाय, कोट, बूट वापरून शिकत असल्याचे पाहून आपले काहीतरी चुकते आहे असे वाटते. मोठ्या कॉन्फरन्समध्येतर परदेशी तज्ज्ञ आणि आयआयटीमधील प्राध्यापक टीशर्ट किंवा साधा ड्रेस केलेले तर विद्यार्थी आणि प्राध्यापक सुटाबुटात असे विचित्र दृष्य पहायला मिळते.
अमेरिकेत मी कित्येक दिवस आहे. येथेही लोक साध्या पोशाखातच वावरतात ऑफिसमध्ये जातात. भारतातील कार्पोरेट क्षेत्र आणि नवशिक्षणसंस्था यांनी मात्र ब्रिटीशांचा हा वारसा मोठ्या अभिमानाने व मोठेपणाचे प्रतीक म्हणून जपला आहे.
महात्मा गांधी आणि इतर नेत्यांनी यांनी भारतीय पोशाखाचा आग्रह धरला होता. आता सर्वांनाच कार्पोरेट क्षेत्राचे अनुकरण करावेसे वाटत आहे. मान पोशाखामुळे मिळतो असे त्याना वाटत असावे.- सु. वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली.
Hits: 141