भारतातील आयटी कंपन्यांनी ग्रामीण भागात विकेंद्रीकरण करावे

Parent Category: मराठी साहित्य Category: डॉ. सु. वि. रानडे यांचे लेख Written by सौ. शुभांगी रानडे

भारतात तंत्रज्ञानाचा वेगाने विकास व्हावा या हेतूने सरकारने निवडक ठिकाणी आयआयटी स्थापन करूनत्यांना भरीव अरथसाहायाय केले. कल्पना अशी होती की तेथे विकसित होणारे ज्ञान भोवतालय्या विद्यापिठांतून सर्व महाविद्यालयांपर्यंत पोहोचेल. प्रत्यक्षात तेथे शिकणारे विद्यार्थी प्रामुख्याने भारतात न राहता परदेशात जात राहिले. देशातील हुषार विद्यार्थ्यांना परदेशात जाण्यसाठी नवी प्रवेशद्वारे तयार झाली. 

उद्योगासाठी लागणा-या पायाभूत सुविधा निर्माण करून प्रदेशाचा सर्वांगीण विकास व्हावा या हेतूने मोछ्या शहरांचे स्मार्ट सिटीत रुपांतर करण्यासाछी सरकारने असेच कोट्यावधी रुपये खर्च केले. मात्र याचा परिणाम नेमका उलटा झाला. भोवतालच्या प्रदेशातील हुषार विद्यार्थी आणि उद्योजक शहराकडे येऊन प्रदेश होता त्यपेक्षा भकास आणि दुर्लक्षित बनत गेला.

बीपीओ आणि केपीओ या नव्या व्यवस्थापनाचा उद्देश शक्य तेवढे काम बाहेरून करून घेण्याचा असल्याने बहुराष्ट्रीय कंपन्यांनी भारतात आपले सर्वदूर जाळे विणले.

बीपीओ म्हणजे बिझिनेस प्रोसेस आउटसोर्सिंग ( उद्योग/व्यवसायातील कामे बाहेरून करून घेणे). प्रथम उत्पादन क्षेत्रातील कामांसाठी हे तंत्र वापरले गेले. ( कोका कोलाने हे तंत्र प्रथम वापरले.) नंतर कामगारआधारित कामे, जमाखर्चासारखी आर्थिक आकडेमोडीची कामे बाहेरच्या कंपन्यांकडून करून घेण्यास सुरुवात झाली. आता कामगार भरती, खरेदी, उत्पादन, विक्री, विक्रीनंतरची सेवा अशा उद्योगातील बहुतेक सर्व कामांसाठी बीपीओचा वापर केला जातो. बीपीओमुळे उद्योगास कामगार, वेळ व भांडवली खर्चात बचत करता येते व आपले उत्पादन बदलत्या परिस्थितीप्रमाणे बदलणे सहज शक्य होते.

परदेशातून काम करून घेतले तर त्याला ऑफशोअर आउटसोर्सिंग म्हणतात तर माहिती तंत्रज्ञानातील कामे बाहेरून करून घेतली तर त्याला नॉलेज प्रोसेस आउटसोर्सिंग ( केपीओ) म्हणतात.

भारताचे परदेशातील कंपन्यांकडून आयटी क्षेत्रातील बीपीओमार्फत मिळालेले उत्पन्न मुख्यत्वे मोठ्या शहरांच्या विकासाकडे वापरले गेले. त्यामुळे ग्रामीण भागातून हुषार सुशिक्षित तरुणांचा कल एशा मोठ्या शहरात स्थलांतर करण्याकडे झाला. यामुळे घ्रमीण भागातील शेती व्यवसायाकडे दुर्लक्ष झाले. ग्रामीण भागात राहण्यास कोणीच तयार होईना. विवाहासाठी मुलीही शहरात राहण्याची अट घालू लागल्या. एकूणच या शहरीकरणामुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले. शहरातही प्रचंड लोकसंख्या वाढीमुळे अनेक नव्या समस्या निर्माण झाल्या. झोपडपट्टीची वाढ आणि पायाभूत सुविधांचा अपुरेपणा यामुळे तेथील जीवनही असुरक्षित, धकाधकीचे व प्रदूषणयुक्त झाले. महागाईत प्रचंड वाढ झाली. पगारही त्याप्रमाणे वाढावे लागले. उद्योगांचेही त्यामुळे नुकसानच झाले.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे या सर्व प्रश्नांना एक वेगळेच महत्व प्राप्त झाले आहे. घर्दीच्या शहरापासून दूर निसरिगाच्या सानिध्यात राहण्यातील सुख आणि सुरक्षितता आता सर्वांना पटू लागली आहे. सुदैवाने इंटरनेट आणि मोबाईल क्रातीमुळे कोठेही राहून आयटी क्षेत्रातील काम करणे आता सहज शक्य झाले आहे. जर आयटी क्षेत्रातील कंपन्यांनी आपले सर्व काम ग्रामीण भागात करून घेण्यासाठी आवश्यक पावले उचलली आणि छोट्या संगणक कंपन्यांना सशक्त करून त्यांना घुणवत्तापूर्ण काम करण्याचे प्रशिक्षण दिले तर एक स्थायी स्वरुपाची सर्वंकष प्रगती साधमारी क्रांती भारतात घडू शकेल.

आज भारतात इंजिनिअरिंग उद्योगांमध्ये सुट्या भागांच्या उत्पादनाचे काम छोट्या उद्योगांकडून करून घेतले जाते. बहुतेक सर्व मोठॆ उद्योग बीपीओचा वापर करून आपल्या कामाचे विकेंद्रीकरण करतात. महाराष्ट्रात ग्रामीण भागात असणार्‍या औद्योगिक वसाहतीतील व एमआयडीसीतील बरेचसे उद्योग अशा सुट्या भागांच्या निर्मितीवर आधारलेले आहेत. उद्योगाची व त्याद्वारे राज्याची सर्वांगीण प्रगती होण्यासाठी अशा बीपीओची फार गरज असते.

सध्या भारतात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठ्या कंपन्या जागतिक मंदीमुळे अडचणीत आल्या आहेत. आतापर्यंत परदेशातून बीपीओच्या माध्यमातून मोठे प्रकल्प व प्रचंड पैसा मिळत असल्याने भरपूर पगार देऊन आयटी क्षेत्रातील पदवीधारकांची भली मोठी फौज आपल्या पदरी ठेवून या कंपन्यांनी बलाढ्य साम्राज्ये उभी केली व सर्व अर्थ व्यवस्थेला चांगली गती दिली. मात्र जागतिक मंदीमुळे ऑफशोअर आउटसोर्सिंग करणार्‍या देशातील उद्योग बंद पडून बेरोजगारी वाढल्याने त्यांना असे प्रकल्प मिळणे कमी झाले व त्याचा फटका ना बसला. खर्चात काटकसर करायची तर पगार कपात वा नोकरकपात करावी लागणार. मात्र या उद्योगांचे शेअर भांडवल जनतेतील जनतेतील उद्योगाविषयी असणार्‍या प्रतिमेवर अवलंबून असल्याने काटकसरीचे उपाय न करता तोटा होत असूनही तो दडविण्याकडे व ‘सर्व आलबेल आहे’ असे दर्शविण्याचे प्रयत्न सुरू झाले. परदेशातील ‘ल्हेमन ब्रदर्स’ काय व इथले ‘सत्यम‌ कॉम्पुटर्स’ काय, दोन्हीकडे असे बलाढ्य उद्योग बंद पडले. आज भारतात सुस्थितीत दिसत असणार्‍या उद्योगांची खरी स्थिती काय आहे हे त्यांच्याशिवाय इतर कोणालाच माहीत नाही. मात्र नवीन नोकरभरतीत झालेली घट परिस्थिती बिकट असल्याचे दर्शविते.

यावर उपाय हा बीपीओच ठरू शकतो. या कंपन्यांनी आपले बहुतेक काम ग्रामीण व निमशहरी भागातील छोट्या कंपन्यांना आउटसोर्स केले तर बीपीओचे वर वर्णन केलेले सर्व फायदे या कंपन्यांना मिळू शकतील. निम्याहून कमी खर्चात प्रकल्प पूर्ण करता येतीलच याशिवाय सर्वात महत्वाचे म्हणजे ग्रामीण व निमशहरी भागातील छोट्या संगणक कंपन्यांना नवसंजीवनी मिळून अनेक सुशिक्षित संगणक तज्ज्ञांना आपल्या गावीच काम मिळेल. त्या भागाचा विकास होईल. शहरीकरण व त्यातून येणारी महागाई व प्रदूषण टळेल.

आतापर्यंत या आयटी कंपन्यांनी केवळ सेवा व मनुष्यबळ देण्याचे काम केले त्यांना आता सेवा व मनुष्यबळ छोट्या कंपन्यांकडून घेण्याचीही भूमिका पार पाडावी लागेल. याबाबतीत बीपीओविषयी छोट्या कंपन्यांना प्रशिक्षित करणे, त्यांना भांडवल पुरवणे, शैक्षणिक संस्थांमधून पदवी घेऊन बाहेर पडणार्‍या विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण व त्यांचा मानसिक कल बदलणे ही कामे करावी लागणार आहेत. परदेशातील उद्योगांना भारतात काम देताना जी ‘माहितीची गुप्तता राखणे’, ‘कामाचा दर्जा उत्तम ठेवणे’, ‘वेळेचे गणित पाळणे’ व ‘विश्वासार्हता’ या गोष्टींची काळजी वाटते तशीच काळजी भारतातील मोठ्या उद्योगांना वाटणे स्वाभाविक आहे. अशा उत्तम दर्जाच्या छोट्या संस्था तयार करणे हेही एक मोठे आव्हान आहे ते मोठ्या उद्योगांनी पेलायला हवे. ज्ञानदीप फौंडेशनच्या मते भारतातील शिक्षणसंस्था, छोटे उद्योग, मॊठे उद्योग अशी परस्परपूरक व परस्परावलंबी साखळी तयार करता आली तर या संगणक उद्योगाचा चिरस्थायी व विकेंद्रित विकास होऊ शकेल.

आयटी क्षेत्राच्या विकासात महिला पार मोठे योगदान देऊ शकतात. आजही मोठया आयटी कंपन्यांत महिलाची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र त्यांना पुरुषांप्रमाणे दररोज १०/१२ तास काम करावे लागते व घरातील जबाबदार्‍या सांभाळाव्या लागतात त्यामुळे त्यांना मानसिक व शारिरिक त्रास सहन करावा लागतो व लग्नानंतर तर परिस्थिती अधिकच बिकट .होते अनेक महिला नोकरी सोडतात. नोकरी न केल्यामुळे व आपल्या शिक्षणाचा काही उपयोग करता येत नाही अशा विचाराने निराश होणार्‍या अशा महिलांना काम देण्याची काहीतरी व्यवस्था करणे आवश्यक आहे. सुदैवाने माहिती तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे घरी बसून ऑफिसमधील काम करण्याची सोय उपलब्ध झाली आहे. मोठ्या कंपन्यांनी अशा महिलांना अर्धवेळ वा घरी राहून काम करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली तर महिलांचे फार मोठे मनुष्यबळ या कंपन्यांना कमी पगारात उपलब्ध होऊ शकेल. महिला सशक्तीकरणालाही यामुळे चालना मिळेल. आपल्या कुटुंबाला हातभार लावल्याचे समाधान महिलांना मिळेल.

मंदीमुळे नोकरी न मिळालेल्या वा नोकरी गमवावी लागलेल्या संगणकतज्ज्ञांचा मोठा वर्ग निर्माण झाला आहे. महिलांचा व या कुशल मनुष्यबळाचा उपयोग छोट्या कपन्यांना करून घेता येईल. यासाठी बीपीओच्या कार्यपद्धतीचा सर्वांनी अभ्यास करणे व वापर करणे आवश्यक आहे.

ज्ञानदीप फौंडेशनशी संलग्न असणार्‍या ज्ञानदीप इन्फोटेक प्रा. लि. कंपनीने परदेशातील अनेक प्रकल्प बीपीओतर्फे यशस्वीरीत्या पूर्ण केले आहेत. ज्ञानदीपचा अनेक शिक्षण संस्थांशीही निकटचा संबंध आहे. बीपीओचे महत्व लक्षात घेऊन ज्ञानदीप फौंडेशनने याबाबतीत जनजागृती करण्याचे ठरविले आहे. सर्व शिक्षण संस्था, महिला व घरी संगणकावरील काम करण्याची असणार्‍यांसाठी दूरस्थ शिक्षणाद्वारे प्रशिक्षण वर्ग घेण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू करून शिक्षण आणि पर्यावरण क्षेत्रातील अनेक तज्ज्ञ व्यक्तींना आपल्या उपक्रमात सहभागी करून घेतले आहे. . परदेशात राहणार्‍या संगणकतज्ज्ञांनाही यात सामावून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

अधिक माहितीसाठी https://dnyandeep.net या फौंडेशनच्या वेबसाईटला भेट द्यावी तसेच या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन मी आपणास करीत आहे.आपल्या या बाबतीत काही सूचना असतील तर त्यांचे स्वागत आहे. आपणासर्वांच्या सक्रीय सहयोगातूनच हा प्रकल्प काही थोडेफार यश मिळवू शकेल . - सु. वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली..

Hits: 150
X

Right Click

No right click