किर्लोस्कर घराणे

Parent Category: मराठी उद्योग Category: उद्योजक आणि व्यावसायिक Written by सौ. शुभांगी रानडे

भारतीय उद्योगधंद्यांच्या क्षेत्रातील एक प्रसिद्ध कारखानदार घराणे. लक्ष्मण काशीनाथ किर्लोस्कर (२० जून १८६९—२६ सप्टेंबर १९५६) हे किर्लोस्कर उद्योगसमूहाचे संस्थापक. जन्म गुर्लहोसूर येथे. धारवाड व कलादगी येथे प्राथमिक शिक्षण. अठराव्या वर्षी मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून चित्रकलेचा अभ्यास पूर्ण केला. पुढे व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये प्रथम चित्रकला-शिक्षक व नंतर बाष्प-अभियांत्रिकीचे अध्यापक. १८९७ मध्ये ते मुंबई सोडून बेळगावला आले. थोरल्या भावाच्या मदतीने त्यांनी सायकल, पवनचक्की, कडवा कापणीयंत्र, लोखंडी नांगर वगैरे वस्तूंच्या उत्पादनास प्रारंभ केला. १९१० साली औंध संस्थानाधिपतींकडून सर्व प्रकारच्या सवलती मिळाल्याने लक्ष्मणरावांनी कुंडलच्या निर्जन व निर्जल माळावर `किर्लोस्कर ब्रदर्स’ या नावाने कारखाना उभारला व किर्लोस्करवाडीच्या वसाहतीस प्रारंभ केला. ह्या कारखान्यातून लोखंडी नांगर, चरक, मोटा, रहाट वगैरे कृषिअवजारांचे उत्पादन सुरू झाले. भांडवल वाढविण्यासाठी १९२० साली कारखान्याचे मर्यादित कंपनीत रूपांतर करण्यात आले. तीमध्ये विविध प्रकारचे हात पंप, लहानमोठे यांत्रिक पंप, घरगुती लोखंडी फर्निचर, लेथ इत्यादींचे उत्पादन होऊ लागले.

१९३४—३८ मध्ये लक्ष्मणराव औंध संस्थानचे दिवाण होते. १९४५ मध्ये ते कारखान्याच्या संचालकपदावरून निवृत्त झाले. १९५३ साली प्रथमच ‘मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज’ चे सन्माननीय सदस्यत्व लक्ष्मणरावांना देण्यात आले. वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांचे पुणे येथे निधन झाले.

लक्ष्मण काशीनाथ किर्लोस्कर
लक्ष्मण काशीनाथ किर्लोस्कर

औद्योगिक कारखाने चालविण्याचे व्यावसायिक शिक्षण घेतलेले नसताही लक्ष्मणरावांनी सर्व गोष्टी अतिशय परिश्रमाने साध्य केल्या. त्यांना वाचनाचा अतिशय नाद होता. विश्वासू व कर्तबगार सहकारी निर्माण करण्याची त्यांची हातोटी विलक्षण होती. लक्ष्मणरावांच्या यशाचे रहस्य म्हणजे ग्राहकांच्या गरजांची पूर्वजाणीव आणि वस्तूच्या उत्कृष्ट गुणवर्त्तेचा आग्रह. कणखर शिस्त, पद्धतशीर काम, जगभर आपला माल लोकप्रिय करण्याची तीव्र आकांक्षा, हे त्यांचे वर्तनसूत्र होते. किर्लोस्करवाडीची रचना करताना `कॅडबरी’ किंवा `नॅशनल कॅश रजिस्टर’ ह्या सुविख्यात पश्चिमी कंपन्यांनी बांधलेल्या औद्योगिक वसाहती त्यांच्या नजरेसमोर होत्या. कारखान्याचे स्वतःचे एखादे मासिक असावे, हीही त्यांची एक आधुनिक कल्पना होती. लक्ष्मणराव यांत्रिकीकरणाचे कट्‌टे क्षेत्रात शिरण्याची स्फूर्ती मिळाली. १९६९ साली भारत सरकारने लक्ष्मणरावांची जन्मशताब्दी देशभर साजरी केली त्या निमित्ताने टपाल खात्याने वीस पैशांचे एक तिकिटही काढले.

लक्ष्मणरावांनंतर त्यांचे चिरंजीव शंतनुराव (२८ मे १९०३ — ) किर्लोस्कर उद्योगसमूहाचे अध्यक्ष आणि प्रमुख सूत्रधार बनले. सध्या विसांहून अधिक कारखान्यांचे ते संचालक आहेत. सोलापूर येथे जन्म, शालेय शिक्षण औध व पुणे येथे. अमेरिकेतील ‘मॅसॅचूसेट्‌स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ हया जगद्विख्यात संस्थेत अभियांत्रिकीमधील बी. एस्‌सी. ही पदवी मिळविली. १९२६ साली किर्लोस्करवाडीच्या कारखान्यात कामास सुरूवात. १९३५ मध्ये किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडचे उपव्यवस्थापक. १९४१ नंतर हरिहर, खडकी, पुणे, बंगलोर, हुबळी, देवास, हडपसर, कोथरूड, कराड, नासिक इ. ठिकाणी विविध यांत्रिक सामग्रीचे किर्लोस्कर कारखाने स्थापण्यात पुढाकार. एंजिने व इतर यंत्रसामग्री आशिया, आफ्रिका, यूरोप, अमेरिका हया खंडांतील देशांस मोठ्या प्रमाणावर निर्यात करण्यात त्यांनी यश मिळविले. ‘मराठा चेंबर ऑफ कॉमर्स ऍंड इंडस्ट्री’चे अध्यक्ष (१९६५–६६) ‘बोर्ड ऑफ ट्रेड’चे सदस्य ‘इंडो-अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स’चे पहिले अर्ध्यक्ष अनेक सरकारी समित्यांवर औद्योगिक सल्लागार. कलकत्ता येथील ‘इन्स्टिट्यूट ऑफ प्रॉडक्शन एंजिनिअर्स’च्या ‘इंडिया कौन्सिल’ने दिलेल्या ‘सर वॉल्टर पुकी पारितोषिका’चे मानकरी. १९६५ मध्ये भारत सरकारने शंतनुरावांना पद्‌मभूषण पदवी देऊन गौरविले. त्यांनी दिलेली व्याख्याने जेट युगातला मराठी माणूस (१९६८) या पुस्तकारूपात गुंफलेली आहेत. ‘कमिटी फॉर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट इन इंडिया’ या समितीचे अध्यक्ष. कलकत्त्याच्या ‘एंजिनिअरिंग असोसिएशन ऑफ इंडिया’ या संस्थेने १९७२ मध्ये त्यांना ‘कर्म वीरोत्तम’ ही पदवी दिली.

किर्लोस्कर घराण्यातील तिसरी कर्तबगार व्यक्ती म्हणजे शंकरराव वासुदेव किर्लोस्कर (८ ऑक्टोबर १८९१ — १ जानेवारी १९७५) ही होय. यांचे शालेय शिक्षण बेळगाव व सोलापूर येथे झाले. पुढे पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये एक वर्ष काढून त्यांनी मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये चित्रकलेचा अभ्यास केला. १९१४ सालापासून किर्लोस्करवाडीस विक्री-व्यवस्थापक, प्रचारक व कार्यालय-व्यवस्थापक म्हणून काम सुरू केले. लंडनमध्ये त्यांनी विक्रीशास्त्राची पदविकाही मिळविली (१९२३). (१९२०) मध्ये किर्लोस्कर छापखान्याची स्थापना झाली. त्यातूनच किर्लोस्कर (१९२०), स्त्री (१९३०) व मनोहर (१९३४) या मासिकांचे संपादन व प्रकाशन करण्यास त्यांनी प्रारंभ केली. मराठीत ही तिन्ही मासिके अनेक दृष्टींनी क्रांतिकारक ठरली. विशेषतः मासिक-प्रकाशनाचे निकाप असे व्यवसायीकरण करून ते यशस्वी करण्यात शंकररावांचा वाटा फार मोठा आहे. या मासिकांतून सतत पुरागामी दृष्टिकोनाचा व तशाच प्रकारच्या ललित व वैचारिक लेखनाचा त्यांनी पुरस्कार केला. चित्रे, छायाचित्रे व इतर सजावट यांनी मासिकांना आकर्षक व कलात्मक असे रूप देण्यातही शंकररावांनीच पुढाकार घेतला. मराठीत अनेक लेखक व विचारवंत घडविण्याचे कार्य या मासिकांनी केले आहे. `डेक्कन मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन’ची स्थापना, `मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज’चे कार्य, `कोयना धरण योजने’चा प्रथमपासून पाठपुरावा इत्यादींतून शंकररावांनी केलेले कार्य महाराष्ट्राच्या औद्योगिकीकरणास चालना देणारे ठरले. दक्षिण महाराष्ट्रातील साहित्य, रंगभूमी, शिक्षण यांसारख्या सांस्कृतिक क्षेत्रांत त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला. ते स्वतः उत्कृष्ट चित्रकारही होते. शंषाकीय (१९७४) हे त्यांचे आत्मकथन म्हणजे एका उत्कृष्ट आत्मचरित्राचा नमुना होय. किर्लोस्कर घराण्याच्या औद्योगिक कार्यास शंकररावांनी सामाजिक आणि सांस्कृतिक उत्तरदायित्त्वाचे अधिष्ठान प्राप्त करून दिले.

किर्लोस्कर उद्योगसमूहात पुढील कंपन्या आहेत : (१) किर्लोस्कर ब्रदर्स लि. (२) द म्हैसूर किर्लोस्कर लि. (१९४१) (३) किर्लोस्कर इलेक्ट्रिक कंपनी लि. (१९४८–४९) (४) किर्लोस्कर ऑईल एंजिन्स लि. (१९४६) (५) एफ्‌. एच्‌. शूले जी. एम्‌. बी. एच्‌.-किर्लोस्कर ऑईल एंजिन्सची दुय्यम कंपनी, भातसडीच्या यंत्रोत्पदनात अग्रेसर (६) किर्लोस्कर न्युमॅटिक कं. लि. (१९६२) (७) किर्लोस्कर कमिन्स लि. (१९६२) (८) किर्लोस्कर एसिआ लि. (१९६२) (९) किर्लोस्कर कन्सल्टंट्‌स लि. (१९६३) उद्योगधंद्यांबाबतच्या तांत्रिक, आर्थिक, व्यवस्थापन व विपणन यांविषयी सल्ला व मार्गदर्शन करणारी कंपनी (१०) शिवाजी वर्क्स लि. – किर्लोस्कर ऑईल एंजिन्सची दुय्यम कंपनी (११) किर्लोस्कर प्रेस- किर्लोस्कर ब्रदर्स लि.ची एक शाखा. किर्लोस्कर व स्त्री ही मासिके आणि मनोहर हे साप्ताहिक किर्लोस्कर प्रेसतर्फे निघते. सध्या ह्या नियतकालिकांचे संपादन शंकररावांचे चिरंजीव मुकुंदराव करतात. किर्लोस्कर प्रेसतर्फे ग्रंथप्रकाशनाचेही कार्य चालते. वरील उद्योगांशिवाय गेल्या दोन-तीन वर्षांत ट्रॅक्टर व पेट्रोल एंजिने यांचे उत्पादन करणारे दोन कारखाने या समूहाने नव्याने उभारले आहेत. `किर्लोस्कर प्रतिष्ठाना’मुळे देशातील शंभरांहून अधिक छोट्या कारखानदारांना साह्य मिळाले आहे.

भारतातील चार राज्यांत पसरलेल्या किर्लोस्कर उद्योगसमूहात सु. १८,००० लोक काम करतात. देशातील विजेच्या मोटारी, डीझेल एंजिने व सेंट्रिफ्युगल पंप यांच्या एकूण उत्पादनापैकी अनुक्रमे ३६, ६५ व ४० टक्के उत्पादन किर्लोस्करांकडून होते. ह्या समूहाचे एकूण वार्षिक उत्पादन ६३ कोटी रूपयांचे आहे. जगातील साठ देशांत त्याची निर्यातपेठ आहे. किर्लोस्कर उद्योगसमूहात सेंट्रिफ्युगल पंप, व्हर्टिकल लेथ, स्लुइझ व्हॉल्व्ह्‌ज, शेंगा फोडण्याची यंत्रे, सील्ड काँप्रेसर्स युनिट, मशीन टूल्स, विद्युत्‌मोटारी, ३ ते ८०० अश्वशक्तीची वॉटरकूल्ड डीझेल एंजिने, भातसडीची यंत्रे, एअर काँप्रेसर, रेफ्रिजरेशन काँप्रेसर, स्विचगिअर, मोटर कंट्रोल गिअर, ट्रॅक्टर, कास्टिंग वगैरे यंत्रांचे उत्पादन होते. आता हा समूह तांत्रिक ज्ञानाचीही परदेशात निर्यात करू लागला आहे. फिलिपीन्स आणि मलेशिया ह्या देशांत अनुक्रमे वॉटरकूल्ड एंजिने आणि विद्युत्‌मोटारी ह्यांचे उत्पादन किर्लोस्करांच्या सहकार्याने होऊ लागले आहे. भारतातील औद्योगिकीकरणाच्या इतिहासात किर्लोस्कर घराण्याचे कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे.

संदर्भ : १. किर्लोस्कर, शं. वा. यांत्रिकाची यात्रा, किर्लोस्करवाडी, १९५८.

२. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, संपदा : लक्ष्मणराव किर्लोस्कर जन्मशताब्दि विशेषांक, पुणे, जुलै, १९६९.

Hits: 810
X

Right Click

No right click