अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ

Parent Category: ROOT Category: संस्था परिचय Written by सौ. शुभांगी रानडे

१९६० साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. १९६१ मध्ये महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, मुंबई मराठी साहित्य संघ मुंबई, मराठवाडा साहित्य परिषद औरंगाबाद आणि विदर्भ साहित्य संघ नागपूर ह्या त्या त्या प्रदेशात काम करणा-या प्रातिनिधिक चार संस्था एकत्र आल्या आणि त्यांनी मराठी भाषेचे, मराठी वाङमयाचे व मराठी संस्कृतीचे काही समान प्रश्न सोडवण्यासाठी एक शिखर संस्था निर्माण करावी असे ठरवले. ती संस्था म्हणजेचअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ होय.

या चारही संस्थांनी मिळून स्थापन केलेल्या या संस्थेचे पहिले अध्यक्ष प्रा. दत्तो वामन पोतदार हे होते. १९६२मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात आणि बृहन्महाराष्ट्रात वापरल्या जाणाऱ्या मराठी भाषेच्या लेखनात एकसूत्रीपणा आणण्यासाठी भाषा लेखनाचे काही नियम तयार केले तेच मराठी शुध्दलेखनाचे नियम होत. हे नियम १९६२ मध्ये तेंव्हाचे मुख्यमंत्री श्री. यशवंतराव चव्हाण यांनी सरकारच्यावतीने स्वीकारले. हे महामंडळानी केलेले भाषाविषयक पहिले काम होय.

महामंडळाच्या स्थापनेपर्यंत मराठीची जी साहित्य संमेलने भरत होती ती पुण्याच्या म.सा.प.च्यावतीने भरवली जात होती. या संमेलनांना 'महाराष्ट्र साहित्य संमेलन` असेच तोपर्यंत म्हटले जात होते. साहित्य महामंडळाने काम सुरू केल्यानंतर शक्यतो दरवर्षी एक साहित्य संमेलन भरवावे असा निर्णय १९६४मध्ये मडगांवमध्ये झालेल्या ४५व्या साहित्य संमेलनात घेतला आणि १९६५ मध्ये हैदराबाद येथे जे ४६ वे साहित्य संमेलन झाले ते महामंडळाचे पहिले साहित्य संमेलन होय.

प्रत्यक्षात ते महामंडळाचे पहिले साहित्य संमेलन असतांनाही महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते नवे रूप असल्यामुळे क्रम मात्र जुनाच चालू ठेवण्यात आला आणि पुढील संमेलनांना महामंडळाचे “अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन “ असे नाव देण्यात आले.

महामंडळाची स्थापना झाल्यानंतर महाराष्ट्राबाहेर असलेल्या महाराष्ट्रालगतच्या ज्या साहित्य संस्था आंध्रप्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश या राज्यांमध्ये काम करीत होत्या, त्या साहित्य संस्थांनी महामंडळामध्ये समाविष्ट होण्याची इच्छा व्यक्त केली. त्या संस्थांच्या इच्छेचा मूळ चार घटक संस्थांनी गंभीरपणाने विचार करून त्यांना साहित्य महामंडळात समाविष्ट करुन घेण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार मराठी साहित्य परिषद, आंध्रप्रदेश ही हैद्राबादची संस्था १९६४ मध्ये पहिल्यांदा साहित्य महामंडळात समाविष्ट झाली. त्या नंतर नजीकच्या काळात कर्नाटक राज्य साहित्य परिषद आणि मध्यप्रदेश साहित्य संघ या दोन संस्थाही समाविष्ट झाल्या. या तिन्ही संस्था समाविष्ट झाल्यानंतर साहित्य महामंडळाचे रुपांतर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळात झाले.

साहित्य महामंडळाची स्थापना झाल्यानंतर बरीच वर्षे दत्तो वामन पोतदार हेच महामंडळाचे अध्यक्ष होते. काही वर्षांनंतर महामंडळाचे पदाधिकारी निवडणुकीने ठरू लागले. आणखी काही वर्षे गेल्यांनतर महामंडळाचे कार्यालय एकाच ठिकाणी ठेवण्याऐवजी ते चारही घटक संस्थांकडे म्हणजे मूळ संस्थांकडे फिरते असावे असा निर्णय महामंडळाने घेतला आणि त्यांनतर प्रत्येक तीन वर्षांनी संस्थांच्या जेष्ठतेनुसार पुणे, नागपूर, मुंबई आणि औरंगाबाद या क्रमाने हे कार्यालय दर तीन वर्षांनी स्थलांतरीत होणे सुरू झाले.
आतापर्यंत दत्तो वामन पोतदार, (एक महिन्याकरिता वि.भि.कोलते) कवि अनिल, गंगाधर गाडगीळ श्री.पु.भागवत, राजेंद्र बनहट्टी, सुरेश द्वादशीवार, डॉ. सुधीर रसाळ, वसुंधरा पेंडसे-नाईक, गं.ना.जोगळेकर, मनोहर म्हैसाळकर हे अध्यक्ष झालेले आहेत.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने, ज्या महत्वाच्या लेखकांची किंवा विद्वानांची अध्यक्ष होण्याची इच्छा नाही अशा लेखकांचा सन्मान करावा म्हणून, गेल्या सुमारे १५ वर्षांपासून, आपल्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात महनीय वक्ता म्हणून त्याला/तिला सन्मानपूर्वक निमंत्रित करून सत्कार करण्यास सुरुवात केली. या प्रसंगी एखाद्या वाङमय प्रकाराचा किंवा त्या त्या कालखंडाचा गंभीरपणे विचार करण्यात येतो.
महाराष्ट्रात वेळावेळी भाषाविषयक किंवा संस्कृतीविषयक जे प्रश्न निर्माण होतात त्या प्रश्नांचा समाजाकडे किंवा शासनाकडे पाठपुरावा करून ते प्रश्न सोडविण्यासाठी महामंडळ प्रयत्न करीत असते.

Hits: 209
X

Right Click

No right click