महास्वयम’ वेब पोर्टल - रोजगाराची गुरुकिल्ली
देशामध्ये लोकसंख्येच्याबाबतीत महाराष्ट्र हे दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. भारताला मानव संसाधनाची (Human Resource) राजधानी बनविण्याचे धोरण प्रधानमंत्री यांनी जाहीर केले आहे. या धोरणाला अनुसरुन महाराष्ट्र शासनाने सन २०२२ पर्यंत सुमारे चार कोटी पन्नास लाख कुशल मनुष्यबळ निर्माण करण्याचे धोरण निश्चित केले आहे. यासाठी विविध योजना, उपक्रम हाती घेण्यात आल्या आहेत. या योजनेचा एक भाग म्हणून, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या पूर्वीच्या www.maharojgar.gov.in (महारोजगार) या संकेतस्थळाचे (वेब पोर्टलचे)अद्ययावतीकरण करण्यात आले असून www.mahaswayam.in (महास्वयम्) या एकात्मिक संकेतस्थळामध्ये त्याचे विकसन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनातर्फे या संकेतस्थळावर राज्यातील युवकांसाठी रोजगार (EMPLOYMENT) टॅबअंतर्गत JOBSEEKER रोजगार इच्छूक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने नावनोंदणी व शैक्षणिक पात्रता वाढ सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच नोकरी शोध सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. उद्योजकता (ENTREPRNEURSHIP) टॅब अंतर्गत स्वयंरोजगाराची व कौशल्य विकास (SKILL DEVELOPMENT) टॅब अंतर्गत कौशल्य प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
उद्योजकांसाठी (EMPLOYER) टॅब अंतर्गत कायम/तात्पुरती रिक्त पदे, रोजगार मेळावा, रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम (ईपीपी) अंतर्गत ऑनलाईन पद्धतीने पदे अधिसूचित करण्याची सोय करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे या सर्व रोजगारासंदर्भातील सेवा विनामूल्य पुरविण्यात येत आहेत. खाजगी आस्थापना आणि शासकीय कार्यालयातील रिक्त पदांचा तपशील दर तीन महिन्यांनी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाला सादर करणे बंधनकारक आहे. या संदर्भातील सेवायोजन तिमाही विवरणपत्रेसुध्दा (ER-1) ऑनलाईन भरण्याची सुविधा www.mahaswayam.in वेब पोर्टलवरउपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. याद्वारे उद्योजक त्यांच्याकडील मनुष्यबळाची मागणी पूर्ण करुन घेऊ शकतात. ज्या उद्योजकांनी अद्याप आपापल्या आस्थापनांची नोंदणी या वेबपोर्टलवर केलेली नाही, त्यांनी तत्काळ नोंदणी करुन घेऊन उपलब्ध सुविधांचा आवश्य लाभ घ्यावा.
कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या अद्ययावत www.mahaswayam.in (महास्वयम्) या एकात्मिक संकेतस्थळाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच लोकार्पण करण्यात आले. रोजगार इच्छूक उमेदवार व उद्योजक यांनी या संकेतस्थळाचा लाभ घेऊन आपला रोजगार निश्चित करावा, असे आवाहन या विभागाच्या सहाय्यक संचालकांनी केले आहे.
या वेब पोर्टलसंदर्भात अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राशी संपर्क साधावा. हे अत्याधुनिक संकेतस्थळ रोजगार मिळवू इच्छिणाऱ्यांसाठी रोजगाराची गुरुकिल्ली ठरेल यात शंका नाही.
लेखक: जयंत कर्पे
माहिती स्रोत: महान्युज
Hits: 256