डॉ. आंबेडकरांचा अभ्यास हे मोठे संशोधन!

Parent Category: ROOT Category: वार्तापत्र Written by सौ. शुभांगी रानडे

विद्यापीठातील संशोधन केंद्राच्या कोनशिलेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण संदर्भ - लोकसत्ता टीम | December 7, 2020

डॉ. बाबासाहेब आंबेडकर नेमके आपल्याला कळलेत की नाही हे तपासावे लागेल. ते एक व्यक्ती होते पण त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंचा अभ्यास करणे हेही एक मोठे संशोधन ठरेल, असे उद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी काढले.

मुंबई विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्राच्या कोनशिलेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. दृकश्राव्य माध्यमातून झालेल्या या कार्यक्रमाला विविध मान्यवर उपस्थित होते.

मुंबई विद्यापीठाचे माजी विद्यार्थी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२९ व्या जयंतीचे औचित्य साधून मुंबई विद्यापीठात ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र’ शैक्षणिक वर्ष (२०२०-२०२१) पासून सुरू करण्यात येत आहे. या केंद्राचा कोनशिला अनावरण समारंभ त्यांच्या महापरिनिर्वाणदिनी रविवारी ६ डिसेंबर रोजी आभासी पद्धतीने पार पडला. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, बाबासाहेबांनी एकीकडे परकीयांशीही लढा दिला, तर दुसरीकडे समतेसाठी स्वकीयांशी लढा होता. पण यातही त्यांनी आपला व्यासंग जतन केला. बाबासाहेबांचे वडील रामजीबाबा मिळतील तिथून पैसे जमवून बाबासाहेबांना पुस्तके विकत आणून द्यायचे. बहिणींचे दागिनेही पुस्तकांसाठी विकले. व्यासंगापायी घर विकावे लागले होते. ज्या  व्यक्तीला अभ्यास करण्यासाठी इतके कष्ट घ्यावे लागले, त्याच व्यक्तीविषयीचा अभ्यास करण्यासाठी आज संशोधन केंद्र सुरू करावे लागले आहे. तेही आंतरराष्ट्रीय स्तरावरचे, हा एक चमत्कारच आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

या केंद्रातील संशोधन उपक्रमात आता लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सने सहकार्य दिले आहे. पण डॉ. बाबासाहेब जगभर ज्या ज्या ठिकाणी अभ्यासासाठी गेले, त्या संस्था-विद्यापीठांना या आंतरराष्ट्रीय केंद्रांशी संलग्न व्हावे, असे वाटेल असे काम या केंद्रात करावे लागेल, असाही सल्ला मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला.

डॉ. बाबासाहेब अष्टपैलू होते. विविध क्षेत्रात वेगवेगळी माणसं मोठी होतात, काम करतात. पण डॉ. बाबासाहेब हे एकटेच असे होते, की त्यांचा विविध क्षेत्राचा अभ्यास होता. त्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग देशासाठी केला. त्यातून देशाला संविधान दिले. वेगवेगळ्या गोष्टीत विखुरलेल्या आपल्या देशाला संविधान देऊन एकसंधपणाची ताकद काय असते हे दाखवून दिले. डॉ. बाबासाहेब यांच्या महानतेपुढे नतमस्तक होण्यासाठी आपण इंदू मिल स्मारक येथील त्यांच्या पुतळ्याची उंची साडेतीनशे फूट करतो आहोत. त्यांच्या पुतळ्याची उंची वाढविता येईल. पण त्यांच्या व्यक्तित्वाची उंची आपल्याला गाठता येणार नाही, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

शरद पवार यांनी डॉ. आंबेडकरांच्या व्यक्तिमत्त्वातील पैलू उलगडून दाखवले. धरणांची उभारणी, पाण्याचे समान वाटप, विद्युत निर्मिती, कामगारांचे अधिकार अशा विविध क्षेत्रात बाबासाहेबांनी फार महत्त्वाचे योगदान दिल्याचे निदर्शनास आणले.

या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार,  केंद्रीय राज्यमंत्री  रामदास आठवले, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, मंत्री पर्यावरण, पर्यटन आणि राजशिष्टाचार आदित्य ठाकरे, राज्यमंत्री उच्च व तंत्रशिक्षण प्राजक्त तनपुरे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर, प्र-कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी आदी उपस्थित होते.

केंद्राविषयी 

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या संशोधन केंद्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची लोकशाही मूल्याधिष्ठित सामाजिक पुनर्रचनेची जीवनदृष्टी केंद्रस्थानी ठेवून सामाजिक न्याय आणि मानव्यविद्या या अभ्यास क्षेत्रांसाठी मार्गदर्शक ठरतील अशी ‘ध्येयधोरणे आणि विकासाची दिशा’ या संदर्भातील संशोधनावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. त्यादृष्टीने राज्यातील तसेच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधन केंद्रांशी जोडून घेत विविध पदव्युत्तर व प्रमाणपत्र अभ्यासक्रम येथे राबविले जाणार आहेत. ज्यामध्ये आंबेडकर स्टडीज, बुद्धिस्ट थॉट्स, डेव्हलपमेंट स्टडीज आणि सामाजिक धोरण या विषयात पदव्युत्तर पदवी करता येणार आहे. त्याचबरोबर आंबेडकरी विचार आणि तत्त्वज्ञान या विषयाचा देखील अभ्यास ऑनलाइन पद्धतीने आंतरराष्ट्रीय संशोधकांना संशोधनासाठी उपलब्ध करून देण्याची सोय आहे. तसेच ‘सामाजिक शास्त्रे आणि मानव्यविद्या’ आदी विषयांतही आंतरशाखीय संशोधनाची संधी उपलब्ध करून देत आंतरराष्ट्रीय स्तरावरील उत्तम दर्जाचे संशोधन केंद्र म्हणून हे केंद्र उभे करण्याचा मुंबई विद्यापीठाचा मानस आहे. या आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्राचे समन्वयक प्रा. मृदुल निळे आहेत.

Hits: 181
X

Right Click

No right click