५२. पुणे १९७७ - पु. भा. भावे
माणसावर पहिला संस्कार शब्दांचा आणि भाषेचाच होत असतो. नुकत्याच जन्मलेल्या मुलाशी आई सारखी बोलत असते. त्याला गाणी म्हणत असते मातेचे बोलणे ऎकता ऎकता मूल भाषा शिकून जाते. संस्कार ग्रहण करीत असते. मुलाला मुळाक्षरे येत नाहीत, व्याकरण येत नाही, तरीही ते व्याकरणशुद्ध भाषा बोलू लागते. हे सगळे ऎकून ऎकून होते. प्रखर बुद्धीची मुले आठ-दहा महिन्यात बोलू लागतात. वर्ष-दोन वर्षात तर कोणतेही मूल कोणतीही भाषा आत्मसात करते. ही भाषा त्याला स्वत्व देते. भाषेच्या दाराने मूल माणसांच्या जगात- सुसंस्कृत माणसांच्या जगात प्रवेश करते. त्या भाषेला येणारे रसाळ फळ म्हणजे साहित्य!
शास्त्रज्ञामुळे माणूस चंद्रावर गेला हे तर खरेच पण त्यापूर्वीच लेखक चंद्रावर गेलेला होता. पुराणांतरीची आकाशवाणी ही कल्पना शास्त्रज्ञापूर्वीच लेखकाला सुचली होती. शास्त्रज्ञ, तत्वज्ञ, लेखक ह्या सार्यांचाच समाजाला उपयोग आहे. साहित्यिक आणि शास्त्रज्ञ ह्या दोघांनाही तीव्र कल्पनाशक्ती लागते. दोघांचीही काही दिवास्वप्ने असतात. गृहीतकृत्ये असतात. दोघेही कोणत्यातरी एका वेडाने म्हणा की ध्येयाने म्हणा झपाटलेले असतात आणि दोघेही आजन्म त्या ध्येयामागे धावत सुटतात. लेखक व शास्त्रज्ञ ही टोके शेवटी कुठेतरी एकत्र मिळतात. दोघेही एकमेकांना पूरक असू शकतात.