५१. कराड १९७५ - श्रीमती दुर्गा भागवत
१९७५ हे ‘स्त्रीमुक्ती वर्ष’ म्हणून जाहीर झाले होते. त्याचवेळी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष म्हणून दुर्गाबाई भागवतांची झालेली निवड हा एक योगायोगच म्हणायचा. १९७४ चा साहित्य अकादमीचा पुरस्कार दुर्गाबाईंच्या ‘पैस’ या कादंबरीला मिळाल्याने त्यांच्या अध्यक्षपदाबद्दल सर्वांनाच आनंद झाला होता. मराठी साहित्यासंबंधीचे आपले विचार दुर्गाबाईंनी अत्यंत परखडपणे मांडले. त्यांच्या मते पारतंत्र्याच्या काळात लेखकाला जेवढी प्रतिष्ठा होती तेवढी नंतर राहिली नाही. २५ वर्षापूर्वी लेखक हा वैचारिक अधिष्ठाता मानला जाई. नेत्याचे भाग्य त्याला लाभे. स्वातंत्र्योत्तर काळात मात्र तशी परिस्थिती राहिली नाही याची दुर्गाबाईंना फारच खंत लागून राहिलेली दिसली. त्यांच्या मते साहित्याचे दोन भाग असतात - एक म्हणजे अभ्यासू लेखन व दुसरे म्हणजे ललित लेखन. अभ्यासू लेखनात चेतन मन जागता पहारा ठेवून असतं तर ललित लेखनात स्वप्नभूमी तळातून वर आल्यासारखी वाटते. कल्पना, स्मृती, विचार व भान या सार्यांचं रसायन होऊनच ललित लेखनाची निर्मिती होते. त्या निर्मितीला अनुभवाचं अधिष्टान असतं. अनुभव जेवढा बलिष्ठ तेवढा त्याचा आविष्कार समर्थ. कवितेप्रमाणे ललित लेखनाला भाववृत्तीत डूब घेण्याची आवश्यकता असते. साहित्याची मूळ प्रेरणा म्हणचे ज्ञापकता किंवा जाणीव होय. यातच माणसाच्या आपल्या मनाशी होणार्या तादात्म्यातलं सूत्र आहे. लेखन करतानाही लेखक अलिप्तपणानं स्वत:कडे व स्वत:च्या कृतीकडे पाहू शकला तरच त्याच्या उक्तीला प्रत्यकारिता येते..
Hits: 426