३२. १९४९ पुणे आचार्य शं. द. जावडेकर
जुन्या जगाची स्तुतिस्तोत्रे गाणारे साहित्य केवळ सुंदर म्हणून कोणास प्रिय वाटणार नाही. इतकेच नाही तर कालक्रम होईल, त्या मानाने अशा स्शित्यातील सौंदर्यही वरकरणी, निर्जीव आणि कृत्रिम आहे असेच लोकांच्या प्रत्ययास येईल. म्हणून केवळ वरकरणी सौंदर्यावर आसक्त होऊन निर्माण केलेली कला खरे सौंदर्यदर्शनही घडवू शकणार नाही असे मला वाटते. म्हणून शास्त्रज्ञांनी व साहित्यिकांनीही संत व तत्वज्ञ यांच्याप्रमाणे या जागतिक क्रांतीचा प्रवाह कोणत्या दिसेला जात आहे, ती क्रांती कोणत्या जीवननिष्ठेने यशस्वी करण्याचा प्रयत्न केला असता तिच्यातून मंगल अशा नव्या जगाची निर्मिती होऊ शकेल याचे ज्ञान करून गेतले पाहिजे. शास्त्रज्ञ, साहित्यिक, संत व तत्ववेत्ते हे एकंदर समाजजीवनाशी जितके समरस झालेले असतील तितके कळत अथवा नकळत क्रांतिकारक बनतीलच आणि प्रतिक्रांतिकारक शक्तींना नकळत साहाय्य करण्याचा प्रमाद त्यांच्या हातून घडणार नाही. साहित्यपरिषदा, साहित्यसंमेलने, विद्यापीठे इत्यादी संस्थांनी असे वातावरण निर्माण केले पाहिजे. आपल्या समाजात निर्माण होणारे साहित्य आजच्या समाजाला व त्यात चालू असलेल्या संस्कृतिकार्याला पोषक व मार्गदर्शक बनावे यासाठी या संस्थांनी खटपट करावयाची असते.
Hits: 536