आवराआवरी

Parent Category: मराठी पुस्तके Category: सांगावा कवितासंग्रह Written by सौ. शुभांगी रानडे

आवराआवरी

गावाला जाताना प्रत्येकजण सामानाची आवराआवर करतो. पण परलोकी - देवाघरी जाताना मात्र सवड मिळतेच असे नाही. घरदार, सोनेनाणे, भांडीकुंडी, कपडेलत्ते इतकेच काय पण आपल्या म्हणणाऱ्या जवळच्या व्यक्ती कोणी सुद्धा सोबतीला येत नाहीत. सोबतीला येते ते केवळ देवाचे नाव. म्हणून सतत मनापासून देवाचे नाव घेत रहावे.

माझे माझे म्हणती जरी
संगे कुणी ना येती तरी
देवाजीच्या जाती घरी
सोडुनी सारे माघारी . . . १

परगावी जाता ती खरी
कितीतरी आवराआवरी
परलोकी जाता ती परि
सवड न राही क्षणभरी . . . २

संसाराच्या वाटेवरी
असती किती ती दरीखोरी
मृगजळाच्या पाठी परि
लागुनी ना हो बेजारी . . . ३

मायाजाळी माशापरि
गुंतू नको या संसारी
विचार थोडा करुनी तरी
परमेशाचे स्मरण करी . . . ४

Hits: 176
X

Right Click

No right click