अश्रूंचा डोह
अश्रूंचा डोह
आईची आठवण व अश्रूंचा पूर हे जणू समीकरणच बनले आहे. आठवण केंव्हा यावी याला जसे बंधन नसते तसेच त्यापाठोपाठ येणाऱ्या अश्रूंनाही दिवस किंवा रात्र हे बंधन नसते.
मोठे झालो उगाच वाटे
आजी म्हणती कुणी पणजी
तुझ्या चिंतनी गुंतुन जाता
मीही ना उरते माझी . . . . ।।१ ।।
घरे आमुची सुरेख सजली
करूनी सुंदरशी आरास
नयनापुढुनी मम जाईना
कष्टांची परि तुझ्याच रास . . . . ।।२ ।।
लहान मोठे गुंफून मोती
माला सुंदर केलीस ती
सूत्र त्यातले ओघळता ते
विखरुनी पडती भूवरती . . . . ।।३ ।।
लहानसहानही गोष्टींमधुनी
येती तुझ्या त्या स्मृति अजुनी
नयनामधले आसू न पुसती
वाट कुणाला रातदिनी . . . . ।।४ ।।
अश्रूंच्या त्या डोहामध्ये
बुडुनी मी जाता येसी
कवितारूपी माय माऊली
उचलुनी तू मजला घेसी . . . . ।।५ ।।
Hits: 145