यात्री
यात्री
आजकाल बरीच तरूण मंडळी शिक्षण किंवा नोकरीनिमित्त परदेशी जातात. आईवडीलही त्यांना आनंदाने पाठवितात. पण त्यांच्या एका डोळयात हसू तर एका डोळयात आसू असतात. अशा दूर राहणाऱ्या मुलांच्या आईवडिलांचे सुख-दु:ख समान असते. जणू काही ते सर्व एकाच बोटीतले प्रवासी असतात. देवाला स्मरून मनोमन शुभाशीष देणे एवढेच त्यांच्या हातात असते.
एका बोटीमधले यात्री, आपण हो म्हणुनी
मधुर हास्य ते ओठावरती, अन् आसू नयनी . . . १
लेकरांना शिकवुनी आपण, केले सज्ञानी
अमेरिकेचे दर्शन आपणा घडवियले त्यांनी . . . २
दोन ध्रुवावर तरीही आपण आज समाधानी
क्षणात कानी पडे ध्वनी तो दूरध्वनीमधुनी . . . ३
सुखदु:खे ही समान अपुली बुडुया आठवणी
गोकुळ जेंव्हा नांदत होते अपुल्या घरातुनी . . . ४
वासुदेव अन् श्रीलक्ष्मीसी सदा मनी स्मरूनी
आनंदचि हा देऊ घेऊ एकदुजा भरूनी . . . ५
आनंदाचा परिमल घेऊ दूर जरा राहुनी
आशीर्वचही देऊ त्यांना खरे मनापासुनी . . . ६
काळासचि त्या करूनी वंदन स्मितभरल्या वदनी
सुखी ठेव प्रभु पुढील पिढीला करूया विनवणी . . . ७
Hits: 175