एक खेडे
एक खेडे
आजकाल सर्वत्र धरणे बांधली जातात. परंतू त्या पाणलोट क्षेत्रात असलेली खेडेगावे. त्यांचे काय ? तेथील लोकांचे पुढे काय होते ? अशाच एका खेडेगावाचे वर्णन प्रस्तुत कवितेत केले आहे.
काळाशार शाळिग्राम माझ्या माईच्या घरचा
आप्त जसा माहेरचा . . . १
रोज रोज मज कथा एक नवीन ऐकवी
वाटे लिहून ठेवावी . . . २
पूजा करताना दिसे मज एक खेडेगाव
तिथे पुन्हा पुन्हा जावं . . . ३
नदीपल्याडच्या माळावर सात कोसांवर
उभे मायेचे ते घर . . . ४
सात डोंगरांच्या कुशीमध्ये विसावले गाव
भरपूर हो वर्षाव . . . ५
बांधावरती डोलती आंबाफणसाची झाडे
पाठी जांभूळसडा पडे . . . ६
जाळीतून डोकावते काळी डोंगरची मैना
हिरवाई सुखवी नयना . . . ७
चाफा पांढरा नि लाल घेती हातामध्ये हात
बेल तुळस दारात . . . ८
गाई म्हशी नि खिल्लारी जोडी बैलांची गोठ्यात
दूध दह्याची खैरात . . . ९
धरणाने उधळून सारी दिली शेतीभाती
दूर गेली ती वस्ती . . . १०
Hits: 149