काळ
काळ
मानव हा स्वत:ला सर्वश्रेष्ठ समजत असला तरी काळापुढे त्याची काही मात्रा चालत नाही. त्या काळामुळेच रावाचा रंक व रंकाचा राव होतो. होत्याचे नव्हते होऊ शकते. अशा ह्या सर्वशक्तिमान काळाला वंदन असो.
काळाचा खेळ निराळा रे बाळा
काळाचा खेळ निराळा . . . ध्रु. ।।
काळाच्या पुढे फिकाच पडे
सारा मानव चाळा रे बाळा
काळाचा खेळ निराळा . . . १
उंच डोंगरी वसे जो कधी
जाई सागर तळा रे बाळा
काळाचा खेळ निराळा . . . २
सागर तळाचा मासा इवला
भिडे निळया आभाळा रे बाळा
काळाचा खेळ निराळा . . . ३
सिंहासन मिळे कुणाला
कुणा बंदिशाळा रे बाळा
काळाचा खेळ निराळा . . . ४
पाण्याची कोठे भरती तळी
कोठे न थेंब तळा रे बाळा
काळाचा खेळ निराळा . . . ५
कोठे झुले तो पानमळा तर
कोठे ये पानगळा रे बाळा
काळाचा खेळ निराळा . . . ६
पिकाचा होई कधी भोपळा
कधी आणे सोळा रे बाळा
काळाचा खेळ निराळा . . . ७
उलघाल होई कोठे उन्हाळा
हुडहुडी थंडी हिवाळा रे बाळा
काळाचा खेळ निराळा . . . ८
काळाहाती मानव खुळखुळा
नमन करी त्या काळा रे बाळा
काळाचा खेळ निराळा . . . ९
काळाचा खेळ निराळा रे बाळा
काळाचा खेळ निराळा
Hits: 139