रसिकसम्राज्ञी

Parent Category: मराठी पुस्तके Category: सांगावा कवितासंग्रह Written by सौ. शुभांगी रानडे

रसिकसम्राज्ञी

साध्यासुध्या शब्दातून मनाच्या अंतर्भागात दडून बसलेला भावार्थ व्यक्त करण्यासाठी उस्फूर्तपणे बाहेर पडणाऱ्या कवितेचा रसिकसम्राज्ञी म्हणून केलेला यथोचित गौरव.

शब्दसुरांच्या अंगणी, साधीभोळीच मांडणी
तेथ लावण्याच्या खाणी, भेटती गे रात्रंदिनी . . . १

तया सौख्याच्या सदनी, नाना देशीच्या रमणी
येती नटूनी थटूनी, भास अप्सरा नयनी . . . २

आनंदाच्या वेलीमधुनी, पाहे पल्लवी वाकूनी
रसाळ ती ऐकुनी वाणी, तृप्ती होतसे श्रवणी . . . ३

घट अमृताचे भरूनी, अलगद पावलांनी
मेघांसवे येई गगनी, भासे राणी सौदामिनी . . . ४

अलंकार आभूषणांनी, सहजी ये मंडपी नटुनी
जणू रसिकसम्राज्ञी, तैशी कविता ये मनी . . .५

Hits: 132
X

Right Click

No right click