सांगावा - प्रस्तावना

Parent Category: मराठी पुस्तके Category: सांगावा कवितासंग्रह Written by सौ. शुभांगी रानडे

आपण जेव्हा कोणतंही काव्य वाचतो किंवा ऐकतो, तेव्हा त्यातून मिळणारा आनंद हा अनुभूतीच्या पातळीवर असतो. त्यामुळेच तो निर्मळ, विशुद्ध स्वरुपाचा असतो. या आनंदाचं वर्णन शब्दात करता येत नाही, त्याचं विश्लेषण करता येत नाही. सूर्याचं तेज पृथ्वीवर येऊन पोचतं, ते कोणत्याही माध्यमाशिवाय. तसं काव्य हे वाचकाच्या थेट हृदयाला जाऊन भिडतं. ते ही विचार, बुद्धी, तर्क, तंत्र-मंत्र या कोणाच्याही मदतीशिवाय.

काव्यविषयक विचार, वाचलेल्या काव्याचं शास्त्रीय विवेचन, त्याचं पृथःकरण, त्यातील सौंदर्यस्थळांचं रसग्रहण या सर्व गोष्टी नंतर येतात. यासाठी मात्र बुद्धी, अनुभव, उपजत जाण, काव्य या वाड्मयप्रकाराविषयीचं पुरेसं ज्ञान, त्यासाठी लागणारी विशिष्ट प्रकारची आकलनशक्ती ह्या गोष्टी आवश्यक असतात. त्यामुळेच असं विश्लेषण, पृथक्करण, रसग्रहण नुसत्या अनुभूतीच्या पातळीवर घडू शकत नाही. ते बुद्धीच्या पातळीवर घडतं. म्हणूनच 'सांगावा' हा काव्यसंग्रह हातात पडल्यावर आधी मी केवळ एक रसिक या नात्यानं तो वाचला.. अनुभूतीच्या पातळीवर त्याचा थेट रसास्वाद घेतला. पण ही प्रस्तावना लिहायला जेव्हा बसले, तेव्हा मात्र रसिकाचा चष्मा उतरवून समीक्षकाचा चष्मा लावून परत एकदा ह्या कविता वाचून काढल्या.

“सांगावा” ही या काव्य संग्रहातील एक कविता.. एक गाणं म्हणा हवं तर..खुद्द कवयित्रीच्या तोंडून पहिल्या प्रथम
ऐकण्याचा योग आला. त्या गाण्यानं मला भारून टाकलं.

कुणी माझ्या माहेरी धाडवा सांगावा
माय माऊलीच्या रुपे विठ्ठल भेटवा..

त्या नंतरच्या सगळ्याच कवितांमधे ही निरागस लय मला भेटली. मग लक्षात आलं.. कवयित्रीच्या मनात कविता गाण्याच्या रूपातच असते.. एक सुंदर लय घेऊन आलेल्या कवितेचं गाणं मनातून त्यांना सतत साद घालत असतं.

पूर्वीच्या कवितेमधे शब्दांच्या आणि भावाच्या जोडीनं गेयतेला अनन्यसाधारण महत्व असे. गाण्यामधील शब्दांना तशाच तोलामोलाच्या ठेक्याच्या साहाय्याने आशयघनता देण्याचं कसब त्य काळच्या कवींच्या अंगी होतं. पण नवे तरूण कवी अधिकाधिक प्रयोगशील होऊ लागले..चाल नसलेल्या, ताल नसलेल्या मुक्तछंदातील कविता लोकप्रिय होऊ लागल्या. हळूहळू हळू बाकीच्या क्षेत्राप्रमाणे काव्यातही क्रांती घडून आली, जागतिकीकरण आलें, इंग्रजी शब्द घुसले. त्यामुळेच
अलिकडच्या कविता वाचायला बसलं, की या नवकाव्याच्या गर्दीत जुन्या काळच्या भोळ्याभाबड्या कवितेचा आत्मा कुठेतरी हरवत चालला आहे असं वाटू लागतं.

पण तोच वाऱ्याच्या झुळकीसारखी या काव्यसंग्रहातील कवितांसारखी एखादी कविता वाचायला मिळते आणि मोहवून टाकते. कवयित्रीच्या निरामय, सात्विक आणि सुसंस्कारित मनाचं दर्शन पानोपानी घडतं. कवयित्री म्हणते:

उन्हे होता ती कलती
झाकाळुनी जाती नभा

भेटे मज कृष्णसखा
गोड हासत तो उभा

गोड हासत तो उभा

प्रत्येक मनुष्यप्राण्याच्या ठायी सृजनाची, नवनिर्मितीची ऊर्मी ही जन्मजात असते, व त्यानुसार सदानकदा त्याची नवनिर्माणाची धडपड चालूच असते. अगदी उत्तम स्वयंपाक करून आपल्या घरच्यांना जेवू घालणाऱ्या गृहिणीतही ती असते. तशीच ती लेखक आणि कवीच्या ठायीही असते. परंतु लेखक किंवा कवी हा वाचकांशिवाय नेहमी अपूर्ण असतो. म्हणूनच साहित्यिक हा साहित्य निर्मिती करत असताना समाजाचा विचार कधी सोडू शकत नाही. नुसत्या सुंदर सुंदर शब्दांची एकापुढे एक आकर्षक मांडणी करून छापली, म्हणजे ते साहित्य होत नाही. तर त्या शब्दांमधून कवी आपल्याला नकळत काही तरी संदेश देत असतो. ह्या कविताही त्याला अपवाद नाहीत. म्हणूनच कवयित्रीच्या स्वप्नात वाईची मांढरदेवी येते आणि म्हणते

सार्‍यांना सांग सखे, गाऊनी माझी ओवी..
कोंबडी बकरी आवडे न तिला, साधी गौरीपरी

गरिबाघरची बरी म्हणते, भाजी नि भाकरी..

या रचनेत काव्य निःसंशय आहे, पण केवळ - काव्यात्मक अनुभूती वाचकाला देणं एवढंच तिचं कार्य नाही. तर तरूण मनांवर संस्कार करणं हा हेतू त्यात आहे. म्हणूनच चिमुरड्या चिंगीच्या 'देव कोठे राहतो गे, कसा असे तो सांगे..'
अशा बालसुलभ प्रश्‍नाचं उत्तर देताना कवितेतली आई तिला सांगते

भुकेस देता भाकरी
तहानलेल्या पाणी तरी
समाधान ते विलसे वदनी
दिसतो तेथे श्रीहरी

कवयित्रीची भाषा, तिचे शब्द, तिने वापरलेली रूपके सरळ साधी आहेत. शब्दपांडित्याच्या नादी लागून विचारांना झाकोळून टाकण्यात आलेलं नाही. म्हणूनच वाचकाला चटकन ती कविता आपली वाटते.

काळाशार शाळिग्राम
माझ्या माईच्या घरचा,
आप्त जसा माहेरचा..

किंवा

फुले तोडा तुम्ही परि कळ्या नका तोडू,
लाडक्या ह्या बाळांची नीज नका मोडू..

जाता जाता किती सहजपणे कवयित्री जीवनाचं सार सांगून जाते.

परगावी जाता ती खरी
कितीतरी आवराआवरी

परलोकी जाता ती परि
सवड न राही क्षणभरी.

कवयित्रीचा हा दुसरा काव्यसंग्रह आहे. पहिला वहिला नवखेपणा आता लोपला आहे. कवयित्रीला आता स्वतःचा निश्‍चित सूर सापडला आहे. आणि आता ही वाटचाल अशीच चालू राहणार यात शंका नाही.
--- सौ. लीना सोहोनी
---कोल्हापूर

Hits: 422
X

Right Click

No right click